Wed, Aug 21, 2019 15:05होमपेज › Kolhapur › इचलकरंजीत काँग्रेसमुळे ताराराणी आघाडीची कोंडी

इचलकरंजीत काँग्रेसमुळे ताराराणी आघाडीची कोंडी

Published On: Jan 08 2018 1:13AM | Last Updated: Jan 07 2018 11:07PM

बुकमार्क करा
इचलकरंजी : प्रतिनिधी

इचलकरंजी पालिकेवर भाजप, राष्ट्रवादीतील जांभळे गट व ताराराणी आघाडीची सत्ता आहे. गतवर्षी पाणीपुरवठा व बांधकाम या समित्या जांभळे गटाने पटकावल्या; पण राष्ट्रीय काँग्रेसने भाजपला विकासाच्या मुद्द्यावर पाठिंबा देण्याची तयारी दर्शवल्याने पालिकेच्या राजकारणात एकच वर्षानंतर सत्तेच्या फॉर्म्युल्याला सुरुंग लागला व ताराराणी आघाडीला पाणीपुरवठा समितीवर ‘पाणी’ सोडण्याची वेळ आली.

निवडणुकीत भाजपचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार विजयी झाला; पण भाजपला बहुमत मिळवता आले नाही. त्यामुळे भाजपने ताराराणी आघाडी व राष्ट्रीय काँगे्रसबरोबर एकत्रितपणे निवडणूक लढवलेल्या राष्ट्रवादीतील जांभळे गटाचा पाठिंबा मिळवत पालिकेतील बहुमताची उणीव पूर्ण केली. जांभळे गटाच्या पाठिंब्याच्या मोबदल्यात पाणीपुरवठा व बांधकाम या ‘मलई’दार म्हणून ओळख असलेल्या समित्या देण्यात आल्या, तर ताराराणी आघाडीला उपनगराध्यक्षपद देण्यात आले. तेव्हाच पुढील वर्षी पाणीपुरवठा समिती ताराराणीला देण्याचा निर्णय झाला होता.  

एक वर्षाच्या काळात बरेच पाणी पुलाखालून गेले. जिल्हास्तरावर आवाडे गटाने भाजपला जिल्हा परिषदेत पाठिंबा दिला. हुपरीतही आवाडे गटाने भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला आहे. दरम्यान, इचलकरंजी नगरपालिकेत एक वर्षातच सत्तारूढ गटात समित्यांच्या निवडीवरून कुरबुर्‍या वाढल्या. जांभळे गटाने पुन्हा बांधकाम व पाणीपुरवठा या समित्यांसाठी आग्रह धरला, तर ताराराणी आघाडीने ठरल्याप्रमाणे पाणीपुरवठा समिती मिळावी, यासाठी प्रयत्न सुरू केले. सत्तारूढ गटातील मतभेदांचा फायदा उठवत राष्ट्रीय काँग्रेसने भाजपला विकासाच्या मुद्द्यावर पाठिंबा देण्याची तयारी दर्शवली. यामुळे पालिकेतील सत्तासंघर्षात ताराराणी आघाडी बॅकफुटवर आली. 

दुसरीकडे, शाहू आघाडीनेही सत्तेत सहभागी होण्यासाठी प्रयत्न सुरू केले. भाजपचे ताराराणी आघाडीशी बिनसले असते, तर शाहू आघाडीने सत्तेत सहभागी होण्याची संधी साधली असती व राष्ट्रीय काँग्रेसनेही मतभेदांचा फायदा उठवत सत्तारुढांना पाठिंबा दिला असता. त्यामुळे ताराराणी आघाडीवर पाणीपुरवठा समितीवर पाणी सोडण्याची वेळ आली. त्यांना आता उपनगराध्यक्षपदावरच पुन्हा समाधान मानावे लागणार आहे.