होमपेज › Kolhapur › आयटीआय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू

आयटीआय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू

Published On: Jun 03 2018 1:14AM | Last Updated: Jun 03 2018 12:05AMकोल्हापूर : प्रतिनिधी

शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रियेस  दि.1 जून पासून प्रारंभ झाला आहे. 

आयटीआयमध्ये प्रवेश घेण्याकडे दरवर्षी विद्यार्थ्यांचा ओढा असल्याने प्रवेश प्रक्रिया सुरू होण्याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष असते. यावर्षी दहावीचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने प्रवेशाचे ऑनलाईन वेळापत्रक जाहीर केले आहे. कोल्हापूर शासकीय आयटीआयमध्ये 31 व्यवसाय अभ्यासक्रमाच्या 1319 जागांसाठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. एक वर्ष मुदतीचे अभियांत्रिकी व बिगर अभियांत्रिकी व्यवसायासाठी 612 जागा आहेत. दोन वर्ष मुदतीच्या अभियांत्रिकी व्यवसायासाठी 707 जागा उपलब्ध आहेत. दि. 1 जूनपासून ऑनलाईन अर्ज भरणे, अर्जात दुरुस्तीस प्रारंभ झाला आहे. दि. 4 जून रोजी अर्ज स्वीकृती केंद्रात मूळ कागदपत्रांच्या तपासणीनंतर प्रवेश अर्ज शुल्क भरून अर्ज निश्‍चित करण्यात येणार आहे. 

त्यादिवशी पहिल्या प्रवेश फेरीसाठी व्यवसाय व संस्थानिहाय विकल्प व प्राधान्य सादर करावे लागणार आहेत. प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्यांसाठी शासकीय व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये दि. 1 ते 30 जून या कालावधीत रोज सकाळी 10 ते 11 यावेळेत नि:शुल्क प्रवेश प्रक्रियेबाबत मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले आहे. प्रवेशाच्या पुढील फेर्‍याबाबत दहावीच्या निकालानंतर वेळापत्रक जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती कोल्हापूर शासकीय आयटीआयचे प्राचार्य यतीन पारगावकर यांनी दिली. 

उपलब्ध प्रवेश जागा, व्यवसाय अभ्यासक्रम...
एक वर्ष मुदतीचे अभियांत्रिकी व्यवसाय- 
यांत्रिक कृषित्र (63), नळ कारागीर (52), गवंडी (26), सुतारकाम (26), संघाता (84), पत्रेकारागीर (42), फौंड्रीमन (42), यांत्रिक डिझेल (42), प्लास्टिक प्रोसिसिंग ऑपरेटर (42). एक वर्ष मुदतीचे बिगर अभियांत्रिकी व्यवसाय- कर्तन व शिवणशास्त्र-मुले (21), कर्तन व शिवणशास्त्र-मुली (21), भरतकाम व विणकाम-मुली (21), बेसिक कॉस्मॉटोलॉजी-मुली (26), फ्रूट अँड व्हेजिटेबल प्रोसेसिंग-मुली (26), लघुलेखन-इंग्रजी (26), कॉम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग (52).

दोनवर्ष मुदतीचे अभियांत्रिकी व्यवसाय- 
यांत्रिक- कृषी व यंत्रसामुग्री (21), रंगारी (21), तारतंत्री (21), यांत्रिक मोटारगाडी (42), आरेखक यांत्रिकी (42), आरेखक स्थापत्य (26), वीजतंत्री (84), यांत्रिक प्रशितन व वातानुलीकरण (26), यंत्र कारागीर घर्षक (64), जोडारी (63), कातारी (96), यंत्र कारागीर (112), इन्फर्मेशन टेक्नॉ.अँड सिस्टीम (26), मेक मशिन टूल्स मेन्ट (21), टूल अँड डायमेकर (21), वीज विलेपक (21).