होमपेज › Kolhapur › आयपीएल क्रिकेट स्पर्धेचा उद्यापासून कोल्हापुरात थरार...

आयपीएल क्रिकेट स्पर्धेचा उद्यापासून कोल्हापुरात थरार...

Published On: May 18 2018 12:33AM | Last Updated: May 17 2018 11:17PMकोल्हापूर : क्रीडा प्रतिनिधी 

‘आयपीएल’ क्रिकेटचा थरार सर्वसामान्यांना अनुभवता यावा, या उद्देशाने  बीसीसीआयच्या वतीने ‘फॅन पार्क’ हा विशेष उपक्रम राबविला जात आहे. या अंतर्गत क्रीडानगरी कोल्हापूरला सलग तिसर्‍यांदा ‘फॅन पार्क’ आयोजनाची हॅट्ट्रिक साधली आहे. यंदा हा उपक्रम शनिवार, 19 व रविवार,  20 मे रोजी दुपारी 3 वाजल्यापासून रुईकर कॉलनी येथील मनपाच्या मैदानात होणार असल्याची माहिती ‘बीसीसीआय’चे प्रतिनिधी आनंद दातार व ‘केडीसीए’चे अध्यक्ष आर.ए.तथा बाळ पाटणकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.   

जगप्रसिद्ध ‘इंडियन प्रिमियर लिग’ (आयपीएल) च्या यशस्वी आयोजनाचे यंदा 11 वे वर्ष आहे. 7 एप्रिलपासून रंगलेली आयपीएल क्रिकेट स्पर्धा 27 मे पर्यंत सुरु राहणार आहे. प्रत्यक्ष स्टेडियममध्ये जाऊन सामना पाहणे प्रत्येकालाच शक्य नाही. यामुळे स्टेडियममधील सामन्याचा थरार सर्वसामान्यांना अनुभवता यावा आणि क्रिकेट खेळाचा विकास व्हावा या उद्देशाने बीसीसीआयच्यावतीने ‘फॅन पार्क’ ही विशेष मोहीम राबविली आहे. या अंतर्गत आयपीएलचे सामने भव्य स्क्रीनवर पाहण्याची संधी सर्वांसाठी मोफत व खुली करण्यात आली आहे. 

32 बाय 18 इंचाच्या भव्य एलईडी स्क्रीनवर क्रिकेट सामन्यांचे थेट प्रक्षेपण होईल. फॅन पार्कला स्टेडियमचा लूक असणार आहे. उपस्थितांसाठी स्पॉट गेम्स, लकी ड्रॉ अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याचा लाभ घेण्याचे आवाहन  पाटणकर यांनी केले. पत्रकार परिषदेस अभिजित भोसले, चेतन चौगुले, बापूसाहेब मिठारी, केदार गयावळ, नितीन पाटील आदी उपस्थित होते.   

असे असणार सामने...

19 मे : राजस्थान रॉयल वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळूर. 
सनरायझर्स हैद्राबाद वि. कोलकाता नाईट रायडर्स 

20 मे : दिल्ली डेअरडेव्हिल्स वि. मुंबई इंडियन्स. 
चेन्नई सुपरकिंग्ज वि. किंग्ज 11 पंजाब