Wed, May 22, 2019 06:58होमपेज › Kolhapur › शाहूकालीन जलविद्युत केंद्राला घरघर! 

शाहूकालीन जलविद्युत केंद्राला घरघर! 

Published On: Feb 04 2018 1:51AM | Last Updated: Feb 04 2018 12:29AM कौलव : राजेंद्र दा. पाटील

राज्यातील पहिले जलविद्युत केंद्र असणारे राधानगरीतील शाहूकालीन जलविद्युत केंद्र अखेरच्या घटका मोजत आहे. या केंद्राला जीवदान देण्याची मागणी होत आहे. या केंद्राच्या पुनरुज्जीवनासाठी ऊर्जा राज्यमंत्र्यांनी आश्‍वासन दिल्याने या केंद्राला जीवदान मिळणार काय? याकडे लक्ष लागले आहे.

राजर्षी शाहू महाराजांच्या दूरद‍ृष्टीतून साकारलेल्या राधानगरी धरणात 1949 साली प्रथमच 0.600 टी.एम.सी. पाणीसाठा करण्यात आला होता. त्यानंतर 1952 साली राज्यातील पहिले व देशातील दुसरे जलविद्युतनिर्मिती केंद्र सुरू करण्यात आले होते. प्रत्येकी 1.2 मेगावॅट क्षमतेची चार जनित्रे उभारण्यात आली होती. ही सर्व जनित्रे ब्रिटिश कंपनीच्या बनावटीची आहेत. पावसाळ्यात धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतरचे जादा होणारे पाणी, तसेच उन्हाळ्यात सिंचनासाठी सोडले जाणारे पाणी, यावर वीजनिर्मिती केली जाते. या केंद्राची वार्षिक वीजनिर्मिती क्षमता साठ लाख युनिटस् एवढी आहे. मात्र, या केंद्रातून क्षमतेपेक्षा जास्त वीजनिर्मिती होत होती. या केंद्रात 1973 साली बिघाड निर्माण झाला होता. 1998 मध्ये सर्व चार जनित्रांची दुरुस्ती करावी लागली होती. या वर्षीच एक कोटी युनिटपेक्षा जादा वीजनिर्मिती केली होती.

खासगी तत्त्वावरील वीजनिर्मितीचे धोरण अवलंबल्यानंतर या धरणाच्या पायथ्याशी राज्यातील पहिले खासगी वीजनिर्मिती केंद्र उभारले आहे. तत्कालीन करारानुसार जुने केंद्र बंद करण्याचा प्रस्ताव होता. मात्र, शाहूप्रेमी जनतेने हे केंद्र बंद करण्यास तीव्र विरोध केला होता. दरम्यानच्या काळात या केंद्राची देखभाल-दुरुस्ती रखडली होती. त्यामुळे हे केंद्रच बंद करण्याच्या हालचाली सुरू आहेत.

हा प्रकल्प जुना झाला असला, तरी आजही तो उपयुक्‍त आहे. खासगी प्रकल्पासाठी मुख्य दरवाजातून सोडले जाणारे पाणी 296 फूट पातळीपर्यंत सोडले जाते. मात्र, त्यापेक्षा खाली 280 फुटांपर्यंतचे पाणी नदीत सोडण्यासाठी जुन्या केंद्राचा वापर करण्याशिवाय दुसरा पर्यायच नाही. पावसाळ्यात वाहून जाणार्‍या पाण्याचा वापरही जुन्या केंद्रातून करता येतो. खासगी केंद्रातून सातत्यपूर्ण वीजनिर्मिती होत असताना, जुने केंद्र बंद करण्याचा हेतू तडीला नेण्यासाठी पडद्याआडून प्रयत्न सुरू आहेत. या केंद्राकडील कंत्राटी कर्मचारीही कमी केले आहेत. हे केंद्र बंद करण्यास जनतेचा तीव्र विरोध आहे. जनमताचा रेटा पाहून आमदार प्रकाश आबीटकर यांनी मध्यंतरी ऊर्जा राज्यमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन जुने केंद्र बंद करू नये, यासाठी साकडे घातले आहे. ना. बावनकुळे यांनी  याबाबत जलसंपदामंत्र्यांसह बैठक घेण्याचे आश्‍वासन देऊन संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांना तसे आदेश दिले आहेत. त्यामुळे हे शाहूकालीन केंद्र चालू राहण्याच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. त्यामुळे या केंद्राला जीवदान मिळणार काय? याकडे शाहूप्रेमी जनतेचे लक्ष वेधले आहे.

दीड ते दोन कोटी युुनिट वीजनिर्मिती

हे केंद्र बंद असल्याने देखभाल- दुरुस्ती रखडली आहे. एक जनित्र बंद आहे. मात्र, तीन जनित्रे सुस्थितीत आहेत. पासष्ट वर्षांपूर्वीची यंत्रणा असल्याने वारंवार बंद पडते व वीजनिर्मितीत खंड पडतो. सध्या या केंद्रातून सुमारे 30 लाख युनिट वीजनिर्मिती होते. यंत्रसामग्रीचे आधुनिकीकरण केल्यास या केंद्रातून वार्षिक दीड ते दोन कोटी युनिट वीजनिर्मिती शक्य आहे.