Sun, Oct 20, 2019 11:27होमपेज › Kolhapur › हुपरी न.प.साठी चुरशीने ८५ टक्के मतदान

हुपरी न.प.साठी चुरशीने ८५ टक्के मतदान

Published On: Dec 14 2017 2:18AM | Last Updated: Dec 14 2017 1:40AM

बुकमार्क करा

हुपरी : वार्ताहर

हुपरी नगरपालिकेच्या पहिल्याच निवडणुकीसाठी बुधवारी चुरशीने 85.18 टक्के मतदान झाले. पहिली नगरपालिका असल्याने मतदारांमध्ये मोठा उत्साह होता. गेल्या 13 दिवसांपासून तापलेल्या हुपरीच्या रणांगणात एकेक मतासाठी चुरस असल्याचे आज मतदानावेळी स्पष्ट झाले. काही ठिकाणी किरकोळ बाचाबाची वगळता मतदान शांततेत पार पडले.

प्रभाग क्र.3 मध्ये वृद्ध मतदाराला वाहनातून आणल्यामुळे आण्णासाहेब शेंडुरे व संभाजी हांडे यांच्यात बाचाबाची झाली. यावेळी एकाने दगड हातात घेतला. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यातच वीरकुमार शेंडुरे यांच्या पायावरून त्या वाहनाचे चाक गेल्याने त्यांना दुखापत झाली. प्रभाग 5 मध्ये मतदारांना पैसे वाटपाच्या संशयावरून विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दोघांना चोप दिला. ते दोघेही बाहेर गावचे असल्याचे समजते. याबाबतची नोंद कोठेही झाली नाही. 

हुपरीच्या या मैदानात नगराध्यक्षपदासाठी 5, तर नगरसेवकपदांसाठी 95 उमेदवार रिंगणात आहेत. सकाळी 7.30 वाजता मतदान सुरू झाले. सकाळी 11 पर्यंत मतदानासाठी मोठी गर्दी होती. सर्वच मतदान केंद्रांवर  नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या. महिलावर्गातही मोठा उत्साह होता. नगराध्यक्षपदाच्या भाजपच्या उमेदवार सौ. जयश्री गाठ, ताराराणी आघाडीच्या सौ. सीमा जाधव, शिवसेनेच्या सौ. विमल जाधव, श्री अंबाबाई आघाडीच्या सौ. गीतांजली पाटील, राष्ट्रवादी आघाडीच्या सौ.दीपाली शिंदे यांनी आपापल्या मतदान केंद्रावर मतदान केले. लक्ष्मीदेवी गर्ल्स स्कूल येथील मतदान केंद्रावर एव्हीएम मशिन बंद पडल्याने मतदारांनी नाराजी व्यक्‍त केली. या ठिकाणी तातडीने दुसरे मशिन बसवण्यात आले. त्यामध्ये 15 मिनिटे वाया गेली. 

प्रभाग तीन व सातकडे लक्ष  

प्रभाग 3 मध्ये भाजप नेते आण्णासाहेब शेंडुरे उभे आहेत. ताराराणी आघाडीच्या तातोबा हांडे यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरल्याने हा प्रभाग हायव्होल्टेज झाला. हांडे ताराराणी आघाडीच्या प्रचारात होते तर या मतदारसंघावर माजी सरपंच दौलत पाटील यांची मजबूत पकड आहे. त्यामुळे शेंडुरे यांचा करिश्मा येथे चालतो का, याकडे सर्वांचे लक्ष आहे.  
निवडणूक अधिकारी समीर शिंगटे, तहसीलदार सौ. वैशाली राजमाने, मुख्याधिकारी तानाजी नरळे यांनी मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडली, तर उपविभागीय पोलिस अधिकारी विनायक नरळे, सपोनि नामदेव शिंदे यांनी संपूर्ण शहरात मोठा पोलिस बंदोबस्त ठेवला होता.