Thu, Dec 12, 2019 09:20होमपेज › Kolhapur › हुपरी नगराध्यक्षपदी भाजपच्या सौ. गाठ

हुपरी नगराध्यक्षपदी भाजपच्या सौ. गाठ

Published On: Dec 15 2017 2:44AM | Last Updated: Dec 15 2017 2:43AM

बुकमार्क करा

हुपरी : प्रतिनिधी

लोकलढ्यातून निर्माण झालेल्या हुपरी नगरपालिकेच्या पहिल्या ऐतिहासिक निवडणुकीत भाजपने बाजी मारून चंदेरीनगरीत कमळ फुलवले. प्रथम नगराध्यक्षपदाचा मान भाजपच्या सौ.जयश्री महावीर गाठ यांना मिळाला. भाजपला सात, ताराराणी आघाडीला पाच, शिवसेनेला दोन, श्री अंबाबाई आघाडीला दोन, अपक्षांना दोन ठिकाणी विजय मिळाला. हुपरी नगरपालिका भाजपकडे खेचून आणण्यात पालकमंत्री चंद्रकांत पाटील व आ. सुरेश हाळवणकर यांना यश आले. निकालानंतर विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी मोठा जल्लोष केला.

हुपरी नगरपालिकेच्या पहिल्या निवडणुकीसाठी 15 दिवसांपासून सभा, पदयात्रा आदींनी प्रचाराचा धुरळा उडाला होता. बुधवारी चुरशीने 85 टक्के मतदान झाले होते. नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ. जयश्री गाठ यांनी प्रतिस्पर्धी ताराराणी आघाडीच्या सौ. सीमा जाधव यांचा तब्बल 2050 मताधिक्क्याने पराभव केला. दरम्यान, भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवलेल्या रिपब्लिकन पक्षाने दोन जागांवर विजय संपादन केला.

अंबाबाई आघाडी आणि दोन अपक्षांच्या हाती सत्तेची चावी

भाजपला सात जागा मिळाल्या आहेत. त्यांना आणखी दोन जागांची आवश्यकता आहे. त्यामुळे उपनगराध्यक्षपद देऊन ते दोन अपक्षांना आपल्याकडे ओढू शकतात. दोन नगरसेवक त्यांच्या संपर्कात आहेत, असे समजते. मात्र, तसे न झाल्यास जनमताचा तिसरा कल दिलेल्या  दौलत पाटील यांना आपलेसे करून भाजप खेळी करू शकते. त्यादृष्टीने प्रयत्न सुरू झाल्याची शक्यता आहे.