होमपेज › Kolhapur › बलात्काराची तक्रार अन् पोलिसांनी लावले लग्न

बलात्काराची तक्रार अन् पोलिसांनी लावले लग्न

Published On: Jan 15 2018 1:48AM | Last Updated: Jan 15 2018 1:48AM

बुकमार्क करा
हुपरी : अमजद नदाफ  

लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक शोषण करणार्‍या प्रियकर आरोपीवर कारवाई करण्यासाठी दोन-तीन पोलिस ठाण्यांच्या पायर्‍या झिजवणार्‍या एका घटस्फोटित महिलेचा त्या प्रियकराबरोबर विवाह लावून देऊन त्या महिलेला न्याय देण्याचा प्रकार शनिवारी रात्री हुपरी पोलिस ठाण्यात घडला. सपोनि नामदेव शिंदे यांनी दोन्हीकडच्या मंडळींना विश्‍वासात घेऊन हा निर्णय घेतला.  याबाबतची सपोनि नामदेव शिंदे यांनी दिलेली माहिती अशी की, कोकणातील एका घटस्फोटित महिलेची कोल्हापुरात राहणार्‍या व हुपरी येथे नोकरी करणार्‍या एका युवकाशी ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले आणि नंतर त्या दोघांत संबंध प्रस्थापित झाले.

लग्न करण्याचे आमिष दाखवून त्या युवकाने तिला कोल्हापूर, इचलकरंजी या भागात नेऊन संबंध प्रस्थापित केले. काही कालावधीनंतर त्या महिलेने विवाह करण्याचा तगादा लावल्यानंतर त्या युवकाने दुर्लक्ष करीत त्यास नकार दिला. आपली फसवणूक झाली, या भावनेतून त्या महिलेने दोन्ही भागातील पोलिस ठाण्यांत बलात्काराची तक्रार दिली. मात्र, त्याकडे दुर्लक्ष झाले. पोलिसांनी या प्रकरणात स्वारस्य दाखवले नाही, त्यामुळे ही महिला असह्य झाली.

शेवटी या महिलेने तो युवक ज्या ठिकाणी काम करतो त्या हुपरी शहरात येऊन, तेथील  पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार दिली. तक्रार आल्यानंतर सपोनि शिंदे यांनी त्या महिलेची कैफियत ऐकून घेऊन दोन्ही कुटुंबांना बोलावून घेतले. बलात्काराचा गुन्हा नोंद करून कडक कारवाई करण्याचा इशारा देत त्यांनी त्या दोघांचे समुपदेशन केले. त्यानंतर तो तरुण लग्नाला तयार झाला. घरची मंडळीही तयार झाली आणि पोलिस ठाण्यात आम्ही दोघे विवाह करीत असल्याचा जबाब देऊन वर्‍हाड नृसिंहवाडीला निघाले.

तेथे त्यांचा विवाह संपन्न झाला. त्या महिलेला न्याय मिळाला आणि त्या तरुणाला जोडीदार! हुपरी पोलिस ठाण्याचे सपोनि शिंदे यांनी कायदा आणि माणुसकी यांची सांगड घालत एका नाजूक नात्यातून उद्ध्वस्त होणार्‍या दोन्ही कुटुंबांना माणुसकीचे दर्शन घडवले. पोलिसांच्या खाकी वर्दीत एका मुलाची, भावाची, वडिलांची, आईची मायाही शाबूत असते याचे उदाहरण घालून दिले. या घटनेनंतर दोन्ही कुटुंबीयांनी शिंदे व पोलिस कर्मचार्‍यांचे आभार मानले. या घटनेची आणि पोलिसांतील संवेदनशील मनाची चर्चा संपूर्ण शहरात सुरू आहे.