Sun, Jul 21, 2019 16:23
    ब्रेकिंग    होमपेज › Kolhapur › प्राणी गणनेचीच झाली ‘शिकार’!

प्राणी गणनेचीच झाली ‘शिकार’!

Published On: Feb 15 2018 1:56AM | Last Updated: Feb 14 2018 11:21PMकोल्हापूर : विजय पाटील 

राधानगरी अभयारण्यात नुकतीच झालेली वन्यजीव गणना निष्फळ ठरली आहे. कारण, गणनेदरम्यान जीपीएस रीडिंग घेतले नसल्याने ही गणना व्यर्थ मानली जाणार आहे. वनपाल आणि वनरक्षक संघटनेने विविध मागण्यांसाठी आंदोलन पुकारल्याचा परिणाम गणनेवर झाला. त्यामुळे रात्रंदिवस परिश्रम करून, तसेच मोठी सामग्री वापरून करण्यात आलेल्या प्राणी गणनेचीच ‘शिकार’ झाली आहे. कामात हयगय करणार्‍यांवर वन विभाग कारवाई काय करतो, याकडेही लक्ष लागून राहिले आहे.

राष्ट्रीय व्याघ्र संनियंत्रण कार्यक्रमांतर्गत राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणातर्फे राज्यातील जंगलपट्ट्यात वन्यजीव गणना कार्यक्रम पार पडला. 25 जानेवारीपासून हा कार्यक्रम राबवण्यात आला होता. राधानगरी-दाजीपूर अभयारण्यात 350 वनरक्षक, वनपालांनी गणनेत सहभाग घेतला होता. रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून ही गणना करण्यात आली. प्रत्यक्ष वन्यप्राणी, त्यांची विष्ठा, पावलांचे ठसे आदींवरून माहिती नोंदवण्यात आली. वन विभागासाठी ही गणना अत्यंत महत्त्वाची मानली जाते; पण यंदा ही गणनाच फुसकी ठरली. कारण, वनपाल आणि वनरक्षक संघटनेच्या आंदोलनाचा फटका या मोहिमेला बसला. कारण, वनपाल आणि वनरक्षकांनी गणनेत जीपीएस रीडिंग घेतले नाही. जीपीएस रीडिंग ही अत्यंत महत्त्वाची गोष्टच झाली नसल्याने हे रेकॉर्ड अपुरे मानले गेले. त्याचा परिणाम आता पुन्हा गणना करावी लागणार आहे. पुन्हा रात्रंदिवस परिश्रम करून पुन्हा पाणवठे, तसेच विविध क्षेत्रांत जागून काम करावे लागणार आहे. गणना निष्फळ ठरली असल्याने यासाठी वापरली गेलेली सामग्री वाया गेल्यासारखा प्रकार आहे. 

 पुन्हा गणनेची तयारी 
वन्यजीव गणना निष्फळ ठरल्याने आता पुन्हा वन विभागात दुसर्‍यांदा गणनेची तयारी सुरू झाली आहे. वन्यजीव गणना म्हणजे साधी, सोपी गोष्ट नसते. यासाठी खूप काटेकोर नियोजन केले जाते. पहिल्या गणनेची आकडेवारी आता दुसर्‍या गणनेशी जुळण्याची शक्यतासुद्धा कमी असते; पण आतातरी गणना गंभीरपणे केली जाणार आहे का, हा प्रश्‍न उपस्थित होऊ लागला आहे.