Fri, Jul 19, 2019 19:54होमपेज › Kolhapur › शंभर गावांना ग्रामसेवकांची प्रतीक्षाच

शंभर गावांना ग्रामसेवकांची प्रतीक्षाच

Published On: Jun 29 2018 12:55AM | Last Updated: Jun 28 2018 11:40PMकोल्हापूर : विकास कांबळे

जिल्ह्यात असणार्‍या ग्रामपंचायतींची संख्या आणि ग्रामसेवकांची व ग्रामविकास अधिकार्‍यांची मंजूर असलेली पदे पाहता जिल्ह्यातील सुमारे शंभर गावांचा कारभार रामभरोसे सुरू असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अन्य ग्रामसेवकांवर अतिरिक्‍त कारभार देण्यात आल्याने जिल्ह्यातील जवळपास दोनशे गावांंंंना पूर्णवेळ ग्रामसेवक नसल्याचेे दिसून येते.

शासनाच्या विविध योजना ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी पंचायत राज व्यवस्था स्थापन करण्यात आली. यात जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि शेवटचा घटक म्हणजे ग्रामपंचायत आहे. ग्रामीण भागात कार्यकर्ते तयार करणारी संस्था म्हणून ग्रामपंचायतीकडे पाहिले जाते. ग्रामपंचायतीमधील कार्यकर्तेच पुढे  पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेत सदस्य म्हणून येतात. ग्रामपंचायतीचा प्रशासकीय प्रमुख ग्रामसेवक असतो. त्यामुळे गावात त्याला खूप महत्त्वाचे स्थान आहे.

पंचायत राज्य व्यवस्था अधिक बळकट कशी होईल, याचा प्रयत्न सरकार सातत्याने करत असते. कारण पंचायत राज व्यवस्था बळकट असेल तरच शासनाच्या योजना गावातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचू शकतात. शासनाच्या योजना गावपातळीवरपर्यंत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यांच्या मार्फत पोेहोचविल्या जायच्या. नंतरच्या काळात ग्रामपंचयाती अधिक सक्षम करण्यासाठी शासनाच्या वतीने जाणिवपूर्वक प्रयत्न करण्यात आले. त्यामुळे गावातील निर्णय गावपातळीवर व्हावे यासाठी ग्रामसभांना जादा अधिकार देण्यात आले. त्यानंतर काही लाखापर्यंतची कामे करण्याचे अधिकार दिले. यासाठी निधी मात्र जिल्हा परिषद, पंचायत समितीमार्फत दिला जायचा. गेल्या पाच वर्षांमध्ये यातही बदल झाला आहे. आता शासनाने थेट ग्रामपंचायतींनाच निधी देण्याचे धोरण अवलंबले आहे. त्यामुळे जिल्हा परिषद व समिती यांचे महत्त्व कमी होऊ लागले आहे.

जिल्ह्यात 1027 ग्रामपंचायती आहेत.  यात डोंगराळ, दुर्गम भागातील साधारणपणे  20 ते 25 ग्रामपंचायती या ग्रुप ग्रामपंचायती आहेत. यात एका ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात दोन, तीन वाड्या असतात. त्यामुळे ग्रामपंचायतीची संख्या 1029 असली तरी प्रत्यक्षात गावांची संख्या मात्र त्यापेक्षा साधारणपणे शंभरच्या आसपास अधिक असण्याची शक्यता आहे. किमान सध्या असलेल्या 1027 ग्रामपंचायतींमध्ये तेवढ्याच ग्रामसेवकांची संख्या असणे अपेक्षित आहे. मात्र तसे नाही. जिल्ह्याला ग्रामसेवकांची 710 आणि ग्राम विकास अधिकारी  193 पदे मंजूर आहेत. त्यामध्ये साधारणपणे 50 जागा रिक्‍त असल्याने जिल्ह्यातील साधारणपणे 100 ग्रामपंचायतींना ग्रामसेवकांची प्रतिक्षा करावी लागत आहे. नागरिकरणचा वेग गेल्या दहा वर्षांत अतिशय वेगाने वाढत आहेत. 

शहरालगतच्या गावांचा पुर्वीचे खेडवळ रूप झपाट्याने बदलत आहे. गाव आणि शहर यांच्या सीमा पुसत चालल्या असल्याने गावात ग्रामपंचायत आहे की गाव महापालिकेत आहे हे ओळखत नाही. अशी परिस्थिती असताना कोल्हापूर सारख्या जिल्ह्यात अजूनही शंभर गावांचा कारभार ग्रामसेवकांशिवाय सुरू असल्याने त्याचा परिणाम ग्रामपंचायतींच्या दैनंदिन कामकाजावर होत आहे.