होमपेज › Kolhapur › मानवाधिकार कार्यकर्त्या ज्योती घाग बिद्रेप्रकरणी राज्यपालांना भेटणार

मानवाधिकार कार्यकर्त्या ज्योती घाग बिद्रेप्रकरणी राज्यपालांना भेटणार

Published On: May 07 2018 2:02AM | Last Updated: May 07 2018 1:56AMकोल्हापूर : प्रतिनिधी

महिला पोलिस अधिकारी अश्‍विनी बिद्रे-गोरे हत्येप्रकरणी तपासात होत असलेल्या विलंबाच्या पार्श्‍वभूमीवर अमेरिकास्थित मानवाधिकार कार्यकर्त्या ज्योती घाग सोमवारी बिद्रे-गोरे कुटुंबीयांसमवेत राज्यपाल सी. विद्यासागर यांना भेटणार आहेत. हत्येप्रकरणी न्यायालयीन लढाईसाठी आंतरराष्ट्रीय विधितज्ज्ञांची मदत पुरविण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

‘ह्युमन राईटस् ऑफ वॉशिंग्टन’ या संस्थेसाठी ज्योती घाग अमेरिकेत कार्यरत आहेत. तत्कालीन पोलिस आयुक्‍त आत्माराम घाग यांच्या त्या कन्या आहेत. संवेदनशील ठरलेल्या अश्‍विनी बिद्रे-गोरे हत्येप्रकरणी तपासातील हस्तक्षेप व खाडीत फेकून दिलेल्या मृतदेहाचे अवशेष शोधण्यातील विलंबाच्या पार्श्‍वभूमीवर ज्योती घाग विशेष बाब म्हणून दोन दिवसांपूर्वी मुंबईत दाखल झाल्या आहेत.

बिद्रे-गोरे कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांच्याशी त्यांनी सविस्तर चर्चा केली. सामान्य कुटुंबातील एका महिला पोलिस अधिकार्‍याची अमानुष हत्या होऊनही प्रशासनाने घटनेची गंभीर दखल घेतली नसल्याची त्यांनी खंत व्यक्‍त केली. कायद्यातील पळवाटांचा आधार घेऊन भविष्यात संशयितांना फायदा होण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशीही त्यांनी भीती व्यक्‍त केली.