Mon, Jun 17, 2019 18:16होमपेज › Kolhapur › गाळेधारक-मनपा अधिकार्‍यांत बाचाबाची

गाळेधारक-मनपा अधिकार्‍यांत बाचाबाची

Published On: Feb 17 2018 2:06AM | Last Updated: Feb 16 2018 11:53PMकोल्हापूर : प्रतिनिधी

महापौर व मनपा अधिकार्‍यांबरोबर चर्चा न होताच परवाना विभागाने पोलिस बंदोबस्तामध्ये कोंबडी बजार येथील महापालिकेचे 44 गाळे सील केले. यावेळी गाळेधारक व महापालिका अधिकार्‍यांची शाब्दिक बाचाबाची झाली. यामुळे काहीकाळ वातावरण तणावपूर्ण बनले होते.

गेल्या दोन दिवसांपासून महापालिकेच्या कोंबडी बाजार येथील गाळे सील करण्याची प्रक्रिया सुरू झाली. गुरुवारी महापालिकेचे अधिकारी गेले असता काही पक्षांच्या पदाधिकार्‍यांनी हस्तक्षेप करून कारवाईला विरोध केला. अधिकारी, कर्मचार्‍यांच्या अंगावर धावून जाण्याचे प्रकार झाल्याने गुरुवारी कारवाई थांबवली. शुक्रवारी महापौर व आयुक्तांशी चर्चा करण्याचे आश्‍वासन गाळेधारकांना देण्यात आले. 

गाळेधारक सकाळी महापालिकेत बैठकीसाठी गेले, तेव्हा त्यांना महापौर व आयुक्त उपस्थित नसल्याचे समजले. याचवेळी परवाना विभागाचे कर्मचारी गाळे सील करण्यास गेले. चर्चा करण्यास आम्ही तयार आहोत. नवीन इमारत उभारण्याला तीन वर्षे लागणार. तोपर्यंत आमच्या व्यवसायाचे काय, असा सवाल गाळेधारकांनी केला. सध्या हा विषय न्यायप्रविष्ट आहे, असे असताना कारवाई कशासाठी केली जात आहे, अशी विचारणा अधिकार्‍यांना केली; पण अधिकार्‍यांनी काही ऐकले नाही. थेट गाळे सील करण्यास सुरुवात केली. यावेळी काही महिलांनी महापालिका कर्मचार्‍यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. काही गाळेधारकांनी दुकानात आतच बसून कारवाईला विरोध केला; पण पोलिसांनी अशा मालकांना बाहेर काढून गाळे सील केले.  

विरोध करून काही उपयोग होत नसल्याचे निदर्शनास येताच अन्य गाळेधारकांनी आपल्या गाळ्यांमधील साहित्य बाहेर काढून गाळे सील करण्यास परवानगी दिली. दुपारपर्यंत सर्व गाळे सील करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली. या कारवाईत प्रदीप बराले, पंडितराव पवार व परवाना विभागाचे कर्मचारी सहभागी झाले होते.

शटरच्या पट्ट्या तोडल्या
गाळे सील करताना शटर खाली ओढून त्याला कुलूप  लावले जात होते. या कुलपाला महापालिकेचे कर्मचारी सील करत होते. गाळे सील करण्याला विरोध होत होता. यातच काही काही गाळेमालकांनी कुलूप लावण्याची पट्टीच तोडून टाकली.  शटर बंद केले, तरी कुलूप बसत नव्हते. महापालिकेने वेल्डिंग मशीन आणून पट्टी जोडून गाळे सील केले. 

दरम्यान, कोंबडी बझार गाळेधारक सेवाभावी संघाने या कारवाईचा पत्रकाद्वारे निषेध केला आहे. पत्रकात म्हटले आहे की, गेल्या चाळीस वर्षांपासून या जागेवर आम्ही व्यवसाय करत आहोत. याच जागेवर व्यापारी संकुल बांधण्याचा निर्णय झाला आहे. संकुलाला आमचा विरोध नाही; पण आमचे पुनर्वसन करून संकुल उभारावे, अशी आमची मागणी आहे. याबाबत योग्य न्याय मिळावा, अशी मागणी केली आहे. पत्रकावर ए. एम. मोमीन, व्ही. ए. पुजारी, एम. बी. घाटगे यांच्या सह्या आहेत.