कोल्हापूर : विठ्ठल पाटील
मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृहे स्थापन केली जाणार असून कोल्हापुरात सदर बाजार परिसरातील शाहू कॉलेजजवळच्या सरकारी निवासी इमारतींचा प्रस्ताव तयार केला जात आहे. सध्या वापरात नसलेल्या या इमारतींमध्ये शंभर विद्यार्थ्यांची राहण्याची आणि त्यासाठी स्वयंपाकघराचीही व्यवस्था होऊ शकते.
मराठा समाजाला आरक्षणाच्या मागणीसाठी झालेल्या मराठा क्रांती मूकमोर्चानंतर राज्य सरकारने मागण्यांचा अभ्यास आणि त्यावरील उपायांसाठी मंत्री गटाची उपसमिती नेमली आहे. कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली या उपसमितीचे काम सुरू आहे. मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी ईबीसी सवलत, नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्रासाठी वार्षिक आठ लाख रुपये उत्पन्न मर्यादा वाढ यासह काही निर्णय यापूर्वीच घेतले आहेत. मराठा समाजातील जे विद्यार्थी शहरात शिक्षण घेतात त्यांच्यासाठी शहरी भागात आणि जे तालुका अथवा ग्रामीण भागात शिक्षण घेतात त्यांच्यासाठी ग्रामीण भागात मोफत भोजनासह वसतिगृहांची सोय करण्याचा निर्णय या समितीतर्फे सरकारने जाहीर केला आहे.
या वसतिगृहांच्या नवीन इमारतींचे बांधकाम करण्यासाठी मोठी आर्थिक तरतूद करावी लागणार आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारीतील काही इमारती प्रत्येक जिल्ह्यात वापराविना पडून असल्याचे निदर्शनास आले. ना. चंद्रकांत पाटील यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम आणि महसूल खाते आहे. त्याला अनुसरूनच ना. पाटील यांनी या इमारती वापरात आणण्यासाठी त्यांची दुरुस्ती करणे आणि तेथे मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे सुरू करण्याबाबत विचार मांडला. त्याला सर्व स्तरांतून पाठिंबा मिळाल्यानंतर अशा इमारतींचा शोध प्रत्येक जिल्ह्यात सुरू झाला. कोल्हापूर शहरात सदर बाजार, विचारे माळ आणि कावळा नाका परिसरात अशा काही इमारती वापराविना पडून असल्याचे सार्वजनिक बांधकाम खात्याकडील नोंदीनुसार स्पष्ट झाले.
सदर बाजार परिसरातील शाहू कॉलेजजवळ सरकारी कर्मचार्यांच्या निवासासाठी दोन इमारती असून, त्या रिकाम्या आहेत. बहुतेक सरकारी कर्मचार्यांची स्वतःची घरे झाली आहेत किंवा ज्यांना कार्यालयापासून हे अंतर लांब पडते, ते तेथे राहायला नाहीत. त्यामुळे या इमारती वापराविना पडून राहण्याऐवजी त्यांची डागडुजी व रंगरंगोटी करून तेथे पिण्याचे पाणी भरपूर प्रमाणात उपलब्ध करून वसतिगृह सुरू करण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याने हा प्रस्ताव तयार केला असून, लवकरच मंजुरीनंतर तेथे शंभर विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाची सोय होईल, असे अधिकार्यांचे मत आहे.
अशा आहेत इमारती
शाहू कॉलेजजवळ शासकीय दोन निवासी इमारती असून प्रत्येक इमारतीमध्ये बारा फ्लॅट आहेत. एका फ्लॅटमध्ये चार विद्यार्थ्यांची सोय, याप्रमाणे प्रत्येक इमारतीमध्ये 48 विद्यार्थी राहू शकतात. एका इमारतीमध्ये मुलांचे आणि दुसर्या इमारतीमध्ये मुलींचे वसतिगृह सुरू करण्याचा प्रस्ताव आहे.