Thu, Jul 18, 2019 04:26होमपेज › Kolhapur › हॉस्पिटल्स होणार पेपरलेस!

हॉस्पिटल्स होणार पेपरलेस!

Published On: Jul 06 2018 1:32AM | Last Updated: Jul 05 2018 11:46PMकोल्हापूर : प्रतिनिधी 

महापालिकेची सावित्रीबाई फुले हॉस्पिटल, पंचगंगा रुग्णालय व आयसोलेशन हॉस्पिटल आता पेपरलेस होणार आहेत. केसपेपरपासून औषधोपचारांपर्यंतच्या सर्वच नोंदी संगणकावर केल्या जाणार आहेत. रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना स्मार्ट कार्ड दिले जाणार आहे. त्यावर ब्लड ग्रुपसह सर्व नोंदी असणार आहेत. त्यामुळे औषधोपचारांसाठीची फाईल जपून ठेवण्याचे टेन्शन राहणार नाही. महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने त्यासाठी 15 लाखांचा निधी दिला जाणार आहे.   

महापालिकेच्या मालकीची तीन हॉस्पिटल आहेत. सावित्रीबाई फुले हॉस्पिटल 131 खाटांचे असून, प्रसूतीसाठी असलेल्या पंचगंगा रुग्णालयात 35 खाट व संसर्गजन्य आजारासाठीच्या आयसोलेशन हॉस्पिटलमध्ये 32 खाट आहेत. त्यासाठी महापालिकेच्या वतीने औषधोपचारांसाठी 50 लाखांचा निधी वर्षाला दिला जातो. सद्यस्थितीत रुग्णांना केस पेपर काढून त्यांच्या औषधोपचाराच्या नोंदी त्यावरच केल्या जातात.

तो केसपेपर गहाळ झाला की अडचणी निर्माण होतात. त्यामुळे सर्व औषधोपचार पेपरलेस करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. स्मार्ट कार्ड दाखवून अ‍ॅडमिट व्हायचे आणि बरे होऊन बाहेर पडायचे, अशी ही संकल्पना आहे. रुग्णाला फक्त स्मार्ट कार्डसाठीच अर्ज करावा लागणार आहे. त्यानंतर त्याच्या आजारासह सर्व नोंदी संगणकावर होतील. डॉक्टरही रुग्णाला तपासून औषधाच्या नोंदी संगणकावर करतील. त्यानंतर त्या नोंदीद्वारे औषध विभागातून संबंधित रुग्णाला औषधे मिळतील.  

महापालिकेच्या रुग्णालयात उपचार घेणार्‍या अनेकांना केसपेपरसह इतर औषधोपचारांची इतर कागदपत्रे, एक्स-रे, ब्लड रिपोर्ट, सोनोग्राफी रिपोर्ट सांभाळणे मुश्किलीचे होते. त्यामुळे आरोग्य विभागाने पेपरलेसची संकल्पना आणली आहे. लवकरच त्यासाठी महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने निधी उपलब्ध करून देणार आहे. त्यानुसार पहिल्या टप्यात सावित्रीबाई फुले हॉस्पिटल पेपरलेस केले जाईल. त्यानंतर पंचगंगा रुग्णालय व आयसोलेशन हॉस्पिटल पेपरलेस होईल. त्याचा रुग्ण व नातेवाईकांना चांगला लाभ होईल, असे काँग्रेस गटनेता शारंगधर देशमुख यांनी सांगितले.