Thu, Nov 15, 2018 03:11होमपेज › Kolhapur › ...तरच नैराश्यावर मात शक्य 

...तरच नैराश्यावर मात शक्य 

Published On: Jan 30 2018 1:51AM | Last Updated: Jan 30 2018 12:04AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

मानसिक आजार असलेल्या 90 टक्के रुग्णांना योग्य औषधोपचार मिळत नाहीत.अ‍ॅलोपॅथी, होमिओपॅथी व आयुर्वेद औषधप्रणालींनी एकत्रित संशोधन केल्यास नैराश्यावर मात करणे शक्य होईल, असे प्रतिपादन राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी केले. 

होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज एक्स स्टुडंटस असोसिएशन (होमेसा) यांच्या वतीने आयोजित केलेल्या ‘होमेसाकॉन 2018’ या परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.ताराराणी चौकातील होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात ही परिषद झाली. डॉ. रामानंद म्हणाले, जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीचा दाखला देत मानसिक आजारांचा प्रसार होणार्‍या देशांपैकी भारत देश आघाडीवर असल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रीय मानसिक आरोग्य सर्वेक्षणानुसार गेल्या वर्षी एकूण लोकसंख्येच्या 14 टक्के नागरिकांना मानसिक आजारावरील वैद्यकीय उपचारांची गरज आहे. दोन टक्के रुग्ण मानसिक विकाराने ग्रस्त आहेत. सरासरी दोन लाख भारतीय दरवर्षी आत्महत्या करतात. ही संख्या यापेक्षा अधिक असू शकते. महानगरामधील प्रौढ युवक बालके हे मानसिक आजारांनी सर्वाधिक ग्रस्त आहेत. युवकांचा देश असलेल्या भारतीयांसाठी हे चिंताजनक बाब आहे. 

डॉ. कावेरी चौगुले यांनी ‘स्त्रिया व लहान मुलांमधील डिप्रेशन’ या विषयावर मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या, लहान मुलांमध्ये नैराश्याची भावना दिवसेंदिवस वाढत आहे. तर पुरुष व महिलांमध्ये नैराश्याचे प्रमाण अधिक आहे. यासाठी औषधोपचाराबरोबर समुपदेशनाची व मनोविश्‍लेषणाची  गरज आहे. 

‘डिप्रेशन व अद्ययावत होमिओपॅथिक उपचार’ या विषयावर बोलताना डॉ. राहुल जोशी म्हणाले, रुग्णांची मानसिक अवस्था,आजाराची लक्षणे आदींचा अभ्यास करूनच होमिओपॅथिक औषधोपचार देणे गरजेचे असते. मानसिकस्थितीचा विचार करून औषधोपचाराची दिशा ठरविली जाते. शरीरातील कोणताही आजार हा मनाच्या अवस्थेवर अवलंबून असतो. हे आता शास्त्रीय द‍ृष्ट्या सिद्ध झाले आहे.  डॉ. मनीषा शर्मा यांनी ‘संगीत थेरपी व लाईट थेरपी’ तर डॉ. रोझारिओ डिसुझा यांनी ‘डिप्रेशन समुदेशन’ विषयावर मार्गदर्शन केले. स्वागत प्रेसिडेंट डॉ. राजकुमार पाटील यांनी केले. यावेळी डॉ. सुनेत्रा शिराळे, डॉ. राजेश कागले, डॉ. सुहास पाटील, डॉ. फरजाना मुकादम, डॉ. हिम्मतसिंह पाटील, डॉ. मिलिंद गायकवाड उपस्थित होते.