Sat, Apr 20, 2019 23:56होमपेज › Kolhapur › शासनासह पालकमंत्र्यांचा निषेध करून आदेशाची होळी

शासनासह पालकमंत्र्यांचा निषेध करून आदेशाची होळी

Published On: Mar 15 2018 1:18AM | Last Updated: Mar 14 2018 10:17PMकोल्हापूर : प्रतिनिधी

मुलांना आंदोलनासाठी रस्त्यावर उतरवल्याप्रकरणी संस्थाचालक, शिक्षक, मुख्याध्यापकांवर कारवाई सुरू झाल्याने शिक्षण वाचवा कृती समिती आक्रमक झाली आहे. बुधवारी दुपारी दसरा चौकात शिक्षकांनी शासन व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा निषेध नोंदवत कारवाई आदेशाची होळी केली. ‘नहीं चलेगी, नहीं चलेगी, दादागिरी नहीं चलेगी’ अशा धिक्‍काराच्या घोषणाही दिल्या.

शाळा बंद करण्याच्या शासन धोरणाचा निषेध म्हणून मंगळवारी शिक्षण वाचवा कृती समितीच्या नेतृत्वाखाली एकत्र येऊन शहर परिसरातील शाळांमधील शिक्षकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. या आंदोलनात शालेय विद्यार्थ्यांना सहभागी करून घेऊ नये, घेतल्यास कारवाई केली जाईल, असा शिक्षणाधिकार्‍यांनी नोटिसीद्वारे इशारा आधीच दिला होता. तरीही मुख्याध्यापक व संस्थाचालकांनी न जुमानता मुलांना सहभागी करून घेतल्याने मंगळवारीच रात्री उशिरा पोलिसांमार्फत गुन्हे नोंदवण्यास सुरुवात केले. जिल्हा परिषदेने सहभागी शाळांची यादी घेऊन त्याप्रमाणे नोटिसा काढण्यास सुरुवात केली. 

ही सर्व कारवाईची प्रक्रिया सुरू असतानाच, आक्रमक झालेल्या कृती समितीने बुधवारी पुन्हा एकदा दसरा चौकात जमून शासन आदेशाची होळी करत दडपशाहीचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्‍त केला. शासनाविरोधी घोषणा देत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. आंदोलनकर्त्या शिक्षकांचा मुख्य रोख हा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडेच होता. त्यांच्याविरोधात शिक्षकांनी जोरदार घोषणाबाजी करत दादागिरी खपवून घेणार नाही, असा इशारा दिला. शिक्षकांचे सरळमार्गी आंदोलन असताना, पोलिस बंदोबस्त लावून, कारवाईचे आदेश काढून, शासन आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करीत आहे, असा आरोप केला गेला. प्रशासनाला हाताशी धरून कारवाई करण्यापेक्षा शाळा बंद होऊ नयेत यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, असे आवाहनही पालकमंत्र्यांना उद्देशून करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व कृती समितीचे समन्वयक अशोक पोवार, गिरीश फोंडे यांनी केले. आंदोलनात रमेश मोरे, सुभाष देसाई, लालासोा गायकवाड, गणी आजरेकर आदी उपस्थित होते.