Sat, Jul 20, 2019 15:08होमपेज › Kolhapur › इचलकरंजी : नगराध्यक्षांच्या स्वीय सहाय्यकास मारहाण  

इचलकरंजी : नगराध्यक्षांच्या स्वीय सहाय्यकास मारहाण  

Published On: Apr 10 2018 5:21PM | Last Updated: Apr 10 2018 5:21PMइचलकरंजी : वार्ताहर

फाईली अडवल्याच्या कारणातून पालिकेतील सत्तारूढ आघाडीतील ताराराणी आघाडीचे प्रमुख सागर चाळके व नगराध्यक्षांचे खासगी स्वीय सहाय्यक उमाकांत दाभोळे यांच्यात जोरदार वादावादी झाली. एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याबरोबरच धक्‍काबुक्‍कीचा प्रकारही घडाला. नगराध्यक्षांच्या दालनाजवळच्या कक्षात ही घटना घडली. या घटनेनंतर चाळके यांच्या संतप्‍त समर्थकांनी दाभोळे यांना बेदम मारहाण केली. यावेळी झालेल्या झटापटीत चाळके यांचे पुत्र मंथन चाळके हेही दगड लागल्यामुळे जखमी झाले. दोघांवरही खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पालिकेत घडलेल्या या घटनेमुळे मोठा तणाव निर्माण झाला होता. 

नगरसेवक चाळके यांनी नगराध्यक्षांच्या दालनातील कर्मचार्‍यांना संबंधीत फाईलींबाबत विचारणा केली. यावेळी दाभोळे यांनाही विचारणा झाली असता त्यांनी फाईलींबाबत माहिती नसल्याचे सांगितले. त्यामुळे चाळके संतप्‍त बनले. याच विषयावरून दाभोळे व चाळके यांच्यात वाद झाला. शिवीगाळ व जोरदार वादावादीमुळे वातावरण तणावपूर्ण बनले. पालिकेच्या पार्किंगच्या आवारात दाभोळे मोटरसायकलवरून घरी निघाले होते. त्यावेळी चाळके समर्थकांनी त्यांना गाठून खाली पाडले व बेदम मारहाण करण्यास सुरूवात केली. एकाने दाभोळे यांच्या डोक्यात दगड घालण्याचाही प्रयत्न केला. मात्र चाळके यांचा पुत्र मंथन याने सतर्कता दाखवल्यामुळे मोठा अनर्थ टळला. 
 

Tags :  ichalkaranji, municipal council, mayor,  Personal assistant