कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्‍चिम भागाला तडाखा

Last Updated: Jun 04 2020 12:58AM
Responsive image


कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

‘निसर्ग’ चक्रीवादळाचा बुधवारी जिल्ह्यातील पश्‍चिम भागाला तडाखा बसला. शाहूवाडी, पन्हाळा तालुक्यांत घरांची कौले, पत्रे उडून गेल्याने हानी झाली. कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर झाड कोसळल्याने काही काळ वाहतूक बंद झाली. शहरासह जिल्ह्यात दुपारनंतर पावसाची रिपरिप सुरू होती. शहरात वार्‍याचा जोर जाणवला नाही. मात्र, जिल्ह्याच्या अनेक भागांत काही काळ वार्‍याचा जोर होता. शहरात 11 ठिकाणी झाडे पडली.

निसर्ग चक्रीवादळ अरबी समुद्राच्या किनारपट्टीवर बुधवारी दुपारी धडकले. या वादळाचा  फटका जिल्ह्यातही विशेषत: रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या शाहूवाडी तालुक्यासह पन्हाळा तालुक्यातील काही गावांना बसला. शाहूवाडी तालुक्यातील गावडी येथील मंदिरांचे पत्रे तसेच घरांची कौले उडून गेली. मांजरे येथेही घरांचे पत्रे उडून गेले. शेंबवणेपैकी धुमकवाडी येथील शाळेचे छतच उडून गेले. या ठिकाणी क्‍वारंटाईन करण्यात आलेल्या  नागरिकांची धावपळ उडाली. 

कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर वालूरजवळ झाड पडल्याने या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. हे झाड बाजूला केल्यानंतर या मार्गावरील वाहतूक सुरू झाली. पन्हाळा तालुक्यातही पश्‍चिम भागात वादळाचा जोर काहीसा जाणवला. घरावरील पत्रे, कौले उडून गेले. पन्हाळ्यावर मुख्य रस्त्यावरही झाड पडले.

वादळाचा जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात काहीसा जोर जाणवला. शहर आणि परिसरात मात्र वार्‍याचा म्हणावा तसा वेग नव्हता. शहरात आज दुपारी प्रतितास 4 ते 5 कि.मी. वेगाने वारे वाहत होते. मात्र, शहराबाहेर विमानतळ परिसरात वार्‍याचा आज दुपारी वेग वाढला होता. दररोज 10 ते 12 कि.मी. प्रतितास असणारा वेग आज प्रतितास 20 ते 22 कि.मी.इतका होता. जिल्ह्याच्या काही भागांत विशेषत: पश्‍चिमेकडील भागात वार्‍याचा वेग जास्त होता.

वार्‍याबरोबर दुपारनंतर शहरासह जिल्ह्यात पावसाला प्रारंभ झाला. दुपारपासून सुरू झालेल्या पावसाची दिवसभर रिपरिप सुरू होती. शहरात थांबून थांबून पाऊस कोसळत होता. सकाळी साडेआठ वाजल्यापासून सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत शहरात 11.2 मि.मी. पावसाची नोंद झाली. पाऊस आणि वार्‍यामुळे राजारामपुरी सातव्या गल्‍लीत झाड पडल्याने एका कपड्याच्या शोरूमचे नुकसान झाले. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. राजारामपुरीसह जिल्हाधिकारी कार्यालय ते जयंती नाला या मार्गावर,  रूईकर कॉलनी, ताराराणी चौक, सदर बाजार, गवळी गल्‍ली, टिंबर मार्केट, संध्यामठ गल्‍ली, जगतापनगर, उद्यमनगर, पाचगाव आदी ठिकाणीही झाडे पडली. अग्‍निशमन दलाच्या जवानांनी ती बाजूला केली.

बुधवारी सकाळी आठ वाजेपर्यंत गेल्या 24 तासांत जिल्ह्यात सरासरी 19.52 मि.मी. पावसाची नोंद झाली. सर्वाधिक पाऊस चंदगड तालुक्यात 33.33 मि.मी. इतका झाला. भुदरगडमध्ये 25.80 मि.मी., तर पन्हाळ्यात 25.86 मि.मी. पाऊस झाला. शाहूवाडी तालुक्यात 24 मि.मी. पाऊस झाला. आजर्‍यात 22.50 मि.मी., तर गगनबावड्यात 22.50 मि.मी. पावसाची नोंद झाली. करवीरमध्ये 21.18 मि.मी. पावसाची नोंद झाली. राधानगरीत 18.33, तर कागलमध्ये 18.66 मि.मी. पाऊस झाला. गडहिंग्लजमध्ये 17.43 मि.मी. पाऊस झाला. हातकणंगलेत 5.63 मि.मी., तर शिरोळमध्ये सर्वात कमी 4.86 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.