Sun, May 19, 2019 22:21होमपेज › Kolhapur › छत्रपतींचे ऐतिहासिक दस्तऐवज होणार खुले

छत्रपतींचे ऐतिहासिक दस्तऐवज होणार खुले

Published On: Jul 05 2018 1:38AM | Last Updated: Jul 04 2018 10:40PMकोल्हापूर : सागर यादव 

रयतेचे स्वतंत्र, सार्वभौम स्वराज्य निर्माण करणार्‍या शिवछत्रपतींची अस्सल पत्रे, रणरागिणी ताराराणींचे दुर्मिळ छायाचित्र आणि लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी तयार करून घेतलेला भोसले घराण्याचा ‘वंशवृक्ष’ (फॅमिली ट्री) यासह एकूणच छत्रपतींचे ऐतिहासिक दस्तऐवज सर्वसामान्यांसाठी खुले करण्याची योजना कोल्हापूर पुराभिलेखागार विभागाने तयार केली आहे. या योजनेच्या आराखड्याचा प्रस्ताव पुराभिलेख संचलनालयासह पर्यटन व सांस्कृतिक कार्य मंत्रालयाकडे पाठविण्यात आला आहे. याला अंतिम मंजुरी मिळण्यासाठी लोकप्रतिनिधींकडून विशेष प्रयत्नांची गरज आहे. 

महाराष्ट्र शासनाच्या पुराभिलेख संचलनालयाच्या कोल्हापूर पुरालेखागार या विभागीय कार्यालयात महाराष्ट्र राज्याच्या देदीप्यमान इतिहासाशी निगडीत सुमारे दीड कोटींवर दुर्मिळ व अनमोल कागदपत्रे जतन करण्यात आली आहेत. भावी पिढीसाठी प्रेरणादायी असल्याने राष्ट्राची संपत्ती असे या ऐतिहासिक दस्तऐवजांना महत्त्व आणि मोल आहे. या दुर्मिळ ऐतिहासिक खजिन्यात रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तब्बल 10 पत्रांचा समावेश आहे. या शिवाय छत्रपतींची राजधानी असणार्‍या करवीर राज्याच्या लोकाभिमुख कार्याची साक्ष देणार्‍या आणि लोककल्याणकारी राजवट राबविणार्‍या छत्रपती घराण्यातील वंशजांच्या संदर्भातील अनेक कागदपत्रे पुराभिलेखागारात आहेत.

स्फूर्तीदायी असणारा हा अनमोल ठेवा जवळून पाहण्याची प्रत्येकाचीच इच्छा असते. तशी अनेक लोक, इतिहासप्रेमी, इतिहास अभ्यासक, संशोधकांकडून वारंवार मागणीही होत असते. या गोष्टीचा विचार करून कोल्हापूर पुराभिलेखागाराचे सहायक संचालक केशव जाधव व त्यांच्या सहकार्‍यांनी यासाठी एक विशेष योजनेचा आराखडा तयार केला आहे. कोल्हापूर पुराभिलेखागाराची ऐतिहासिक वास्तू आजही आपले स्वतंत्र अस्तित्व टिकवून आहे. इमारतीच्या सभोवताली भरपूर जागा उपलब्ध आहे. या परिसराचे सुशोभीकरण आणि कायमस्वरुपी ऐतिहासिक दस्तऐवजांच्या प्रतिकृतींचे प्रदर्शन मांडण्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे. 

पुराभिलेखागाराभोवती असणार्‍या जागेचा गैरवापर विविध कारणांसाठी होत आहे. आसपासची शासकीय कार्यालये व करवीर पोलिस ठाण्याकडून अनावश्यक वस्तू, जप्त केलेली वाहने, कारवाईत सापडलेल्या गोष्टी या रिकाम्या जागेत साठवून ठेवली जातात. शिवाय, लोकांकडून मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण केला जातो. दारुड्यांच्या अड्ड्यासह लघुशंकेसाठीही या परिसराचा वापर होतो. कचर्‍याचे ढीग व तत्सम कारणांनी या परिसरात दुर्गंधी पसरलेली असते. या सर्व अनावश्यक गोष्टींचा ऐतिहासिक ठेव्याला धोका निर्माण होत आहे. यामुळे या गोष्टींचे संरक्षण व परिसराचा विकास व्हावा, या उद्देशाने ही योजना राबविण्यात येणार आहे. 

...असे आहे आराखड्याचे स्वरुप

पुराभिलेखागार इमारती समोरील रस्त्याच्या दुतर्फा मोकळ्या जागेत मातीचा भराव टाकून वृक्षारोपण होईल. रस्त्याच्या उत्तरेकडील क्षेत्रावर सुबक प्रतीक उभारून त्यात शिवछत्रपतींच्या मोडी लिपीतील 10 अस्सल पत्रांच्या प्रतिमा, पत्रांचा मराठी-इंग्रजीतून अर्थ यांची माहिती लावण्यात येणार आहे. पुराभिलेखागाराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ राजर्षी शाहूंनी तयार करून घेतलेला छत्रपती घराण्याच्या वंशवृक्षाची माहिती देणारे शिल्प उभारण्यात येणार आहे.