पट्टणकोडोली : शिरीष आवटे
हातकणंगले तालुक्यातील पट्टणकोडोली येथील इतिहासकालीन विहीर सध्या प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे. विहिरीच्या कठड्यासह आजुबाजूला मोठ्या प्रमाणात झुडुपे उगवली आहेत. पाण्याला हिरवट रंग आला असून, मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. त्याचप्रमाणे गावखणीची स्थितीही अत्यंत गंभीर आहे.
गावात इतिहासकालीन विहीर आहे. एकेकाळी याच विहिरीचे पाणी संपूर्ण गावची तहान भागवत होते. विहिरीचे बांधकाम अत्यंत सुबक व प्रशस्त आहे. ही विहीर गावची विहीर या नावानेच ओळखली जाते. मध्यवस्तीत असलेल्या या विहिरीला नागरिकांच्या स्वच्छतेविषयी असलेल्या उदासिनतेमुळे अवकळा प्राप्त झाली आहे.
या विहिरीत निर्माल्य व कचरा टाकला जातो. विहिरीची डागडुजी नसल्याने कठड्यावर व आतील भागाता पिंपळाची पाने उगवली आहेत. त्यामुळे बांधकाम कमकुवत होत आहे. या विहिरीचे पाणी जवळच असणार्या शेतीसाठीही वापरले जाते. परंतु, सध्या पाण्याला हिरवट रंग आणि दुर्गंधी असल्यामुळे शेतीसाठीही उपसा बंद करण्यात आला आहे.
पट्टणकोडोलीतील अत्यंत जुन्या खणीची अवस्थाही सध्या बिकट आहे. या खणीचा उल्लेख विठ्ठल - बिरदेव ग्रंथामध्येही आढळून येतो. दुष्काळी परिस्थितीत या खणीतील पाण्याचा मोठा आधार आहे. हुपरी पोलिसांच्या सहकार्याने नामदेव शिंदे यांच्या पुढाकाराने खणीभोवतीची अतिक्रमणे हटवण्यात आल्यामुळे खणीने मोकळा श्वास घेतला आहे. मात्र खणीच्या सुशोभीकरणाचा व प्रदूषणमुक्तीचा प्रस्ताव अद्यापही प्रलंबित आहे.
पट्टणकोडोलीतील पाण्याचे मोठे साठे असणार्या गावची विहीर आणि गाव खणच सध्या प्रदूषणाच्या विळख्यात सापडल्यामुळे हे जलस्त्रोत प्रदूषणमुक्त कधी होणार, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.
खणीच्या प्रदूषणाबाबत केवळ चर्चाच...
दिवसेंदिवस प्रदूषित होत असलेल्या खणीची अवस्था सध्या अत्यंत गंभीर असून खणीभोवती मोठ्या प्रमाणात कचरा साचला आहे. शेजारील वस्तीमधील सांडपाणी खणीत मिसळत असल्याने खण प्रदूषित झाली आहे. प्रदूषणामुळे जलचर मृत्यूमुखी पडले आहेत. या खणीच्या प्रदूषणाबाबत गावातील सोशल मिडियावर कायमच चर्चा रंगते. पण कोणीही पुढाकार घेताना दिसत नाही. गावात अनेक सामाजिक संघटना, तरुण मंडळे, विविध संस्था आहेत. त्यापैकी कुणीतरी यासाठी पुढाकार घेऊन प्रत्यक्ष कामास सुरुवात करणे गरजेचे आहे.