Mon, Apr 22, 2019 05:46होमपेज › Kolhapur › शालिनी सिनेटोनची जागा ऐतिहासिक वारसास्थळ

शालिनी सिनेटोनची जागा ऐतिहासिक वारसास्थळ

Published On: Jan 17 2018 1:57AM | Last Updated: Jan 17 2018 12:33AM

बुकमार्क करा
कोल्हापूर : प्रतिनिधी

कोल्हापूर शहरातील शालिनी सिनेटोनची जागा आता ऐतिहासिक वारसास्थळ म्हणून कायमस्वरूपी राहणार आहे. आयुक्‍त डॉ. अभिजित चौधरी यांनी मंगळवारी त्या संदर्भात नोटिफिकेशन (जाहीर सूचना) प्रसिद्ध केले. तीस दिवसांत नागरिकांना त्यावर सूचना व हरकती सादर करायच्या आहेत. आयुक्‍तांच्या या निर्णयामुळे कारभार्‍यांचा मोठा ढपला पाडण्याचा डाव उधळल्याची चर्चा महापालिकेत सुरू आहे.

हेरिटेज कॉन्झर्वेशन कमिटीच्या 9 जानेवारीला झालेल्या बैठकीत ‘ए’ वॉर्ड कसबा करवीर रि.स.नं. 1104 पै. भूखंड क्र. 5 चे क्षेत्र 6310.60 चौ.मी., भूखंड क्र. 6 चे क्षेत्र 16101.60 चौ.मी. व अ‍ॅमिनिटी स्पेस क्षेत्र 6481.00 चौ.मी. या क्षेत्रफळाची जागा ऐतिहासिक परिसर म्हणून ऐतिहासिक वारसास्थळाच्या यादीत ग्रेड-3 यामध्ये समावेश करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे.  

नोटिफिकेशनमध्ये म्हटले आहे की, कोल्हापूर शहराची दुसरी सुधारित मंजूर विकास योजना व उर्वरित भागाची विकास योजना 15 मार्च 2001 पासून अंमलात आली आहे. शालिनी सिनेटोन इमारत असणारी जमीन रि.स.नं. 1104 पैकी भूखंड क्र. 5 व 6 (अ‍ॅमिनिटी स्पेससह) कोल्हापूर शहराच्या दुसर्‍या सुधारित मंजूर विकास योजना आराखड्यामध्ये शालिनी सिनेटोनसाठी वाणिज्य भू वापर म्हणून दर्शविण्यात आलेला आहे. महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम 1966 चे कलम 37 (2) अन्वये कोल्हापूर शहराच्या विकास नियंत्रण नियमावलीत फेरबदल करून हेरिटेजबाबतची नियमावली अंतर्भूत करण्याबाबत शासनाने 74 वारसास्थळांची यादी मंजूर केली आहे. 

शासनाने कोल्हापूर शहरातील ऐतिहासिक वारसास्थळांचे जतन व संवर्धन करण्याच्या हेतूने 17 एप्रिल 2015 ला हेरिटेज कॉन्झर्वेशन कमिटीची स्थापना केली आहे. कमिटीच्या 13 डिसेंबर 2016 ला झालेल्या बैठकीत संबंधित मिळकतीवर शालिनी सिनेटोन याखेरीज अन्य वापर अनुज्ञेय नाही, असा निर्णय घेतला आहे. तसेच 12 जून 2017 च्या बैठकीत महाराष्ट्र शासनास हेरिटेज स्थळांच्या यादीत समावेश करण्याबाबत कळविण्याचा निर्णय झाला आहे. कोल्हापुरातील छत्रपती राजाराम महाराज यांच्या भगिनी श्रीमंत आक्‍कासाहेब महाराज यांनी शालिनी सिनेटोन हे चित्रसंस्था व स्टुडिओ (1933) रंकाळा तलावाच्या पश्‍चिमेस असणार्‍या माळावर स्थापन करून बोलपटनिर्मितीच्या क्षेत्रात प्रवेश केला. बाबुराव पेंटर यांच्यावर दिग्दर्शनाची जबाबदारी टाकून शालिनी सिनेटोनच्या ‘उषा’ या पहिल्या मराठी-हिंदी चित्रपटाची निर्मिती झाली आहे.  

कोल्हापूर शहरासाठी शासनाने ‘ड’ वर्ग विकास नियंत्रण व प्रोत्साहनात्मक नियमावली मंजूर केली असून, 29 सप्टेंबर 2016 ला ती लागू केली आहे. ‘ड’ वर्ग विकास नियंत्रण व प्रोत्साहनात्मक नियमावलीतील तरतुदीनुसार हेरिटेज कॉन्झर्वेशन कमिटीच्या सल्ल्याने या नियमावलीतील विहित प्रक्रिया राबवून ऐतिहासिक वारसास्थळांच्या यादत वाढ किंवा सुधारणा करण्याचा अधिकार आयुक्‍तांना आहे. त्यानुसार हेरिटेज कॉन्झर्वेशन कमिटीच्या बैठकीत सिनेटोनची जागा ऐतिहासिक वारसास्थळाच्या यादीत समावेशासाठी मंजुरी देण्यात आली आहे. त्यासाठी नोटिफिकेशन दिले असून, सूचना प्रसिद्ध झाल्यापासून तीस दिवसांत राजारामपुरीतील नगररचना विभागात हरकती व सूचना दाखल कराव्यात, असेही नोटिफिकेशनमध्ये म्हटले आहे.

दैनिक ‘पुढारी’मध्ये 27 डिसेंबर 2017 ला ‘सुपारी दोन कोटींची अन् वाटणी 38 हजार’ हे सडेतोड वृत्त प्रसिद्ध करण्यात आले. त्यानंतर शालिनी सिनेटोनच्या प्रश्‍नाला खर्‍या अर्थाने वाचा फुटून लोकआंदोलनाला सुरुवात झाली. तीव्र लोकभावना लक्षात घेऊन सिनेटोनच्या ऐतिहासिक जागेची कोणत्याही स्थितीत जपणूक व्हावी म्हणून आयुक्‍तांनी संबंधित जागेचा ऐतिहासिक वारसास्थळाच्या यादीत समावेश करण्याचा निर्णय घेतला.