कौलव : राजेंद्र दा. पाटील
राधानगरी धरणाच्या उभारणीचा व शाहू महाराजांच्या वास्तव्याचा साक्षीदार असलेला ऐतिहासिक बेंझर व्हिला यावर्षी पाण्यातच राहिला. सलग दोन वर्षे पाणीपातळी घटल्यामुळे बेंझर व्हिला रिकामा झाला होता. या ऐतिहासिक इमारतीचा शाहू स्मारक म्हणून विकास करण्याची घोषणाही हवेत विरली आहे.
1896-97 साली कोल्हापूर संस्थांनमध्ये पडलेल्या भीषण दुष्काळानंतर शाहू महाराजांनी स्वतंत्र सिंचन धोरण राबवले. या धोरणाचाच एक भाग म्हणून 1908 साली राधानगरी धरणाची पायाभरणी केली होती. या धरणाच्या कामावर देखरेख करण्यासाठी धरणाच्या मध्यभागी असलेल्या टेकडीवर एक छोटा वाडा वजा बंगला बांधला होता. शाहू महाराजांनी या ठिकाणी वास्तव्य केले आहे. हा वाडा बेंझर व्हिला (बेनगिरी बंगला) म्हणून ओळखला जात होता. 1949 साली धरणात पाणीसाठा करण्यास सुरुवात झाली. 1954 पासून धरणात पूर्ण क्षमतेने पाणीसाठा करण्यास सुरुवात केल्यानंतर बंगल्याला बेटाचे स्वरूप आले. त्याला ‘बेनगिरी बेट’ या नावाने ओळखले जात होते.
धरणाची मुख्य भिंत अथवा राऊतवाडीकडील बाजूने लांबूनच हा बंगला पाहून पर्यटक मागे फिरत होते. मात्र, 2016 साली या धरणातील पाणीसाठा नीच्चांकी पातळीवर गेल्यानंतर या बंगल्यावर जाण्याची संधी पर्यटकांना मिळाली. पर्यटक व शाहूप्रेमी जनतेने या बंगल्यासह परिसराची साफसफाई केली होती. साठ वर्षांनंतर हा बंगला रिकामा झाल्यानंतर पर्यटकांची गर्दी उसळली होती. तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी येथे बोटिंगसह विकास आराखड्याची सूचना दिली होती. मात्र, पाटबंधारे विभागाने त्याकडे गांभीर्याने पाहिलेले नाही. गतवर्षी मे मध्ये धरणातील पाणीसाठा घटल्याने पुन्हा पर्यटकांनी हजेरी लावली होती.
पर्यटकांत नाराजी
यावर्षी बेंझर व्हिला खुला होईल व विकासाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर येईल, अशी अपेक्षा होती. मात्र, यावर्षी धरणात साडेतीन टीएमसी पाणीसाठा असल्याने बेंझर व्हिलाकडे जाण्याचा मार्ग रिकामा झाला नाही. त्यामुळे पर्यटकांची निराशा झाली.
उपेक्षा संपणार कधी?
जयंती दिवशी शाहू महाराजांच्या कार्याचे गोडवे गायले जातात. मात्र, त्यांच्या कर्तृत्वाचे प्रतीक जतन करण्याकडे दुर्लक्ष केले जाते. यंदाच्या शाहू जयंतीच्या निमित्ताने तरी बेंझर व्हिलाची उपेक्षा संपणार काय? असा प्रश्न पर्यटक व शाहूप्रेमी जनतेतून विचारला जात आहे.