Mon, Jun 17, 2019 14:15होमपेज › Kolhapur › राधानगरीच्या पर्यावरणावर ‘हिंडाल्कोचा वरवंटा’!

राधानगरीच्या पर्यावरणावर ‘हिंडाल्कोचा वरवंटा’!

Published On: Jan 17 2018 1:57AM | Last Updated: Jan 16 2018 11:45PM

बुकमार्क करा
कोल्हापूर : सुनील कदम

राधानगरी अभयारण्यावर गेल्या जवळपास दोन वर्षांपासून ‘हिंडाल्को’ या कंपनीचा वरवंटा फिरू लागला आहे. कंपनीने या अभयारण्यातील दुर्गमानवाड परिसरात सुरू केलेल्या बॉक्साईट खोदाईमुळे या भागातील डोंगरच्या डोंगर भुईसपाट होऊ लागले आहेत. अजस्र यंत्रे आणि हजारो ट्रकच्या धडधडाटामुळे अभयारण्यातील प्राणी, पक्षी परागंदा होऊ लागले आहेत. वनस्पतींच्या कित्येक प्रजाती नष्ट होऊ लागल्या आहेत. त्यामुळे सह्याद्रीच्या पर्यावरणासह या अभयारण्याच्या अस्तित्वावरच प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.

राधानगरी अभयारण्यातील काही डोंगररांगांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या खनिजांचे साठे आढळून येतात. त्यापैकी प्रमुख खनिज म्हणजे बॉक्साईट. अभयारण्यात ठिकठिकाणी बॉक्साइॅटचे विपुल साठे आढळून आलेले आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या औद्योगिक वापरासाठी या बॉक्साईटचा वापर करण्यात येतो. अभयारण्यातील दुर्गमानवाड परिसरात असलेल्या बॉक्साईट साठ्याचे उत्खनन करण्याची परवानगी शासनामार्फत ‘हिंडाल्को’ या कंपनीला जवळपास दोन वर्षांपूर्वी देण्यात आलेली आहे. त्यानुसार कंपनीकडून अभयारण्यातील काही ठिकाणी दररोज कित्येक हजार टन बॉक्साईटचे उत्खनन करून त्याची वाहतूक सुरू आहे.

हिंडाल्को कंपनीने बॉक्साईटच्या उत्खननासाठी अभयारणांतर्गत असलेल्या दुर्गमानवाड भागातील डोंगरच्या डोंगर भुईसपाट करण्याचा सपाटा लावला आहे. उत्खनन केलेले बॉक्साईट वाहून नेण्यासाठी नैसर्गिक डोंगर-टेकड्यांचे मोठ्या प्रमाणात सपाटीकरण केले जात आहे. हिंडाल्को कंपनीच्या या बॉक्साईट खोदाईमुळे अभयारण्याच्या या परिसरात असलेल्या अनेक दुर्मीळ वनस्पती नामशेष होताना दिसत आहेत. बॉक्साईटसाठी अभयारण्यातील अत्यंत मौल्यवान वनराईची सुरू असलेली ही खुलेआम कत्तल अत्यंत चिंताजनक स्वरूपाची आहे, असे अनेक पर्यावरणवाद्यांचे मत आहे. बॉक्साईट खोदाईसाठी कंपनीने वेगवेगळ्या प्रकारच्या अजस्र यंत्रांचा वापर सुरू केला आहे. अभयारण्य परिसरात या यंत्रांचा कर्णकर्कश आवाज सातत्याने धडधडताना ऐकू येतो. त्यामुळे या आवाजाच्या भीतीने अभयारण्याच्या परिसरातील गवा, बिबट्यासह अनेक जंगली प्राण्यांनी आणि पक्ष्यांनी गेल्या जवळपास दोन वर्षांपासून या भागातून पोबारा केला असून, पूर्वी मोठ्या प्रमाणात दर्शन देणार्‍या या प्राण्याचे आणि पक्षांचे अलीकडे दर्शन दुर्मीळ झाले आहे, असा स्थानिक लोकांचा अनुभव आहे. अभयारण्याच्या अस्तित्वावर घाला घालून सह्याद्रीच्या पर्यावरणावर नांगर फिरवण्यासारखा हा प्रकार आहे. त्यामुळे अभयारण्य परिसरात सुरू असलेली बॉक्साईट खोदाई तातडीने बंद करण्याची गरज आहे.

जागतिक पर्यावरणाशी प्रतारणा!
जागतिक हवामान आणि पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून सह्याद्रीच्या पर्वतरांगांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. या पर्वतरांगांच्या पठारांवर होणारा अत्यंत छोटासा बदलसुद्धा जागतिक पर्यावरण आणि हवामानावर परिणाम करतो, असा हवामानतज्ज्ञांचा दावा आहे. अशा परिस्थितीत राधानगरीतील ही बॉक्साईट खोदाई म्हणजे जागतिक पर्यावरणाशी सुरू असलेली प्रतारणा म्हणावी लागेल. त्यामुळे पर्यावरणवाद्यांनी याची गांभीर्याने दखल घेण्याची आवश्यकता आहे.