Tue, Jul 16, 2019 21:50होमपेज › Kolhapur › हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट पुन्हा फॉर्मात

हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट पुन्हा फॉर्मात

Published On: Dec 12 2017 2:05AM | Last Updated: Dec 12 2017 12:13AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी 

कोल्हापूर शहर आणि आजूबाजूच्या काही उपनगरांमध्ये कॉलगर्ल्सचे हायप्रोफाईल सेक्स रॅकेट फॉर्मात आले आहे. शिवाय, या रॅकेटच्या माध्यमातून अमली पदार्थांचा छुपा प्रसारही सुरू आहे. या सेक्स रॅकेटचे लोण दिवसेंदिवस पसरतच चालले आहे.

पूर्वी खुलेआम चालणार्‍या सेक्स रॅकेटचा फारच गवगवा झाल्यानंतर चार-पाच वर्षांपूर्वी पोलिसांनी धडक कारवाई करून सेक्स रॅकेटचे आणि संबंधित हॉटेलचालकांचे बस्तान उठविले होते; पण आता या व्यवसायाने हळूहळूू पुन्हा हात-पाय पसरले आहेत. मात्र, आता त्याचे स्वरूप बदलले आहे. पूर्वी शहरांमधील आणि शहराबाहेरील काही हॉटेलवरच हा मायावी दरबार भरायचा, आजूबाजूच्या परिसरातून वेश्या व्यवसायासाठी येणार्‍या काही महिलाही याच नामचीन हॉटेलांवर अधूनमधून हजेरी लावायच्या; पण पोलिसी कारवाईच्या भीतीने आता या संबंधित हॉटेलचालकांनी पूर्वीप्रमाणे रिस्क घेणे बंद केले आहे.

सेक्स रॅकेट चालवणार्‍या दलालांनी महामार्गावर ठिकठिकाणी थोड्या आडबाजूला, लोकांची फारशी वर्दळ नसलेल्या ठिकाणी व काही उपनगरांमध्ये खासगी बंगले, फ्लॅट भाड्याने घेतलेले आहेत. याच ठिकाणी या कॉलगल्सर्र्चा मुक्‍काम असतो. दलाल सावज शोधत फिरतातच; शिवाय अनेकवेळा या कॉलगर्ल्स कधी एकट्या-दुकट्याही सावज शोधायला बाहेर पडतात. प्रामुख्याने रेल्वेस्टेशन, बसस्थानक, टाऊन हॉल परिसर, बहुतेक सगळी चित्रपटगृहे, रंकाळा तलाव, टेंबलाई परिसर, युनिव्हर्सिटी परिसर, काही परमिट रूम आदी ठिकाणी हमखास कॉलगर्ल्स सावजाच्या शोधात फिरताना आढळतात. विशेष म्हणजे, यापैकी अनेक कॉलगर्ल्स  सुशिक्षित आहेत. त्यामुळे मराठी, हिंदीसह अस्खलित इंग्रजीसुद्धा बोलू शकतात. संभाषण कौशल्याच्या जोरावर ग्राहकाला पटवण्यात त्या तरबेज आहेत.

या सेक्स रॅकेटच्या आडून छुपी गुन्हेगारीही सुरू आहे. एखादा नवखा ग्राहक या कॉलगर्ल्सच्या नादाला लागला की, हमखास लुबाडला गेला म्हणून समजण्यास हरकत नाही. उपनगरांमधील छुप्या वेश्या व्यवसायाच्या अड्ड्यांची बहुतेक स्थानिक लोकांना माहिती आहे. मात्र, या सेक्स रॅकेटचे पाठीराखे असलेल्या गुन्हगारी वर्तुळामुळे स्थानिक लोक त्यांच्याविरोधात पंगा घेण्यास धजावत नाहीत. पोलिसांनीच आता प्रयत्नपूर्वक हे रॅकेट उद्ध्वस्त करण्याची आवश्यकता आहे.

सापळा आणि सावज!

बहुतेक सगळ्या कॉलगर्ल्सचे राहणीमान हे कुणालाही शंका येणार नाही, अशा स्वरूपाचे आहे. एखादी गृहिणी, महाविद्यालयीन युवती अथवा नोकरदार तरुणी वाटाव्यात, अशा स्वरूपाचा एकूणच यांचा पेहराव दिसतो. त्यामुळे सहसा या महामायांची ‘आयडेंटिटी’ कुणाच्या लक्षात येत नाही. वर्दळीच्या ठिकाणी चालणार्‍या त्यांच्या ‘लीला’ बघून आंबटशौकीन मंडळी अगदी हमखास त्यांच्या जाळ्यात फसतात. आपली फसगत झाली आहे, हे समजेपर्यंत अशांचा खिसा साफ झालेला असतो.