Tue, Apr 23, 2019 23:31होमपेज › Kolhapur › पाहा कोल्हापुरातील प्राचीन शिवमंदिरे (Video)

पाहा कोल्हापुरातील प्राचीन शिवमंदिरे (Video)

Published On: Feb 13 2018 2:51PM | Last Updated: Feb 13 2018 2:52PMकोल्हापूर : त्रिरत्न कांबळे, पुढारी ऑनलाईन

'शिवहर शंकर नमामी शंकर, शंभो शिवशंकर हे गिरीजापते भवानी शंकर शिवशंकर शंभो,' अशा शंकर महादेवाची महाशिवरात्री आज सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. शंकराची अनेक रूपे आपण ऐकली असतील, पाहिली असतील. भक्तांसाठी भोलेनाथ, राक्षसांसाठी रुद्र अवतार असणाऱ्या शंकर महादेवाची अती प्राचीन तसेच ऐतिहासिक मंदिरे या करवीर नगरीत आहेत. या मंदिरांचा उल्लेख पौराणिक ग्रथांमध्येही  आहे. त्यांची माहिती आज, आपण महाशिवरात्रीच्या निमित्ताने घेऊ या. 

कोल्हापूर जिल्ह्यात तसेच शहरात विविध तलाव, तीर्थकुंडाच्या काठावर ही शिवलिंगासह महादेवाची मंदिरे आहेत. यात लक्षतीर्थ, कोटीतीर्थ, वरूणतीर्थ, रावणेश्वर, काशीविश्वेश्वर, ऋणमुक्तेश्वर, सोमेश्वर, वटेश्वर, चंद्रेश्वर, सूर्येश्वर अशा अनेक महादेवाचा समावेश आहे. यातील अनेक शिवमंदिरे ही आज देखील प्राचीन सौंदर्य टिकवून आहेत. तर, काही मंदिरांचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे.

बाळेश्वर महादेव 

पंचगंगेच्या नदीकाठी इसवी सन १५७९ च्या सुमारास करवीरपीठाच्या शंकराचार्यांनी मठाची उभारणी केली. याच मठाच्या मागील बाजूस बाळेश्वर महादेवाचे मंदिर बांधण्यात आले असावे. हेमाडपंथी पद्धतीच्या या मंदिरातील शिवलिंग व नंदी कोरीव व देखणे आहे. मंदिराच्या गाभाऱ्यातच नंदी देखील आहे. तर, मंदिराच्या मागील बाजूस अष्टकोनी दगडी बांधकामातील विहिर आहे.

 

वडणगे येथील शिव-पार्वती मंदिर 

कोल्हापूरपासून अवघ्या तीन किलोमीटरवर असणाऱ्या वडणगे गावातील शिव पार्वती मंदिराचा अनेक धार्मिक ग्रंथात उल्लेख आहे. शंकर पार्वतीच्या येथील वास्तव्याचा उल्लेख देखील या ग्रंथात आहे. करवीर महात्म्य या ग्रंथात वडणगेचा करवीर काशी असा उल्लेख आहे. पार्वती मंदिराच्या काहीच अंतरावर हे शिव मंदिर आहे. याठिकाणी महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरते. या यात्रेस शिव पार्वतीचे दर्शन घेण्यासाठी असंख्य भाविक मोठ्या संख्येने येथे दाखल होतात.

चालुक्य, राष्ट्रकुट, कदंब, शिलाहार या सत्तांपासून येथील मंदिराचे अस्तित्व आहे. या मंदिराच्या जीर्णोद्धारावेळी सापडलेल्या काही दगडी  अवशेषावरून हे जाणवते. चौदाव्या शतकानंतर मुघल राजवट सुरु झाल्यानंतर मुघल सम्राटांनी ही हिंदू मंदिरे नष्ट केली होती. यात या महादेव मंदिराचा देखील समावेश असावा असे जाणकारांचे मत आहे.

पेटाळ्यातील शंभू महादेव 

पूर्वी पेटाळा म्हणून प्रसिध्द असलेला तलाव आणि सध्या न्यू एज्युकेशन सोसायटीच्या मैदानावर दगडी बांधकामातील हे शंभू महादेवाचे मंदिर आहे. मंदिरामध्ये शिवलिंग, नंदी, गणेश यांसह विविध मूर्ती शिल्पे या मंदिरात आहेत. या मंदिरात आता संगमरवरी फरशी बसवण्यात आल्या आहेत. यामुळे याचे पूर्वीचे र्सौदर्य नष्ट झाले आहे.

उग्रेश्वर महादेव मंदिर

कोल्हापूर : पंचगंगेच्या तिरावरती स्मशानभूमीच्या जवळच दगडी बांधकामात उग्रेश्वर मंदिर आहे. स्मशानभूमीतील महादेव म्हणून याला उग्रेश्वर महादेव, असे संबोधले जाते. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे या मंदिरात नंदी नसून, या मंदिराच्या बाहेर कुंड आहे. शिवमंदिराच्या बाहेर नंदी नाही, असे होतच नाही, यामुळे या मंदिराला विशेष महत्त्व आहे.

चंद्रेश्वर आणि नंदी महादेव मंदिर

शंकर महादेवाचे मंदिर म्हणजे गाभाऱ्यात शिवलिंग आणि गाभाऱ्याबाहेर नंदी अशीच मंदिराची रचना असते. मात्र या रचनेला पूर्णपणे बगल देणारे मंदिर कोल्हापूरात आहे. शिवाजी पेठेत असणारे चंद्रेश्वर मंदिर नंदीशिवाय आहे. तर रंकाळा तलावासमोरील मर्दानी खेळाचा आखाडा परिसरात नंदी महादेवाचे मंदिर आहे. नंदी महादेवाचे वैशिष्ट्ये म्हणजे नंदी मंदिराच्या गाभाऱ्यात आणि शिवलिंग गाभाऱ्याबाहेर आहे. भारतात मद्रास आणि कोल्हापूरातच अशा रचनेची मंदिरे आहेत.

रावणेश्वर महादेव 

सध्या असलेल्या शाहू स्टेडियमच्या जागी पूर्वी रावणेश्वर तलाव होता. या तलावात हे रावणेश्वर मंदिर होते. तलावातील या मंदिराची नंतर साठमारी परिसरात प्रतिष्ठापना करण्यात आली. या मंदिराचा दोनच वर्षापूर्वी जीर्णोद्धार करण्यात आला आहे. अत्यंत आकर्षक शिल्पवैभवांनी मंदिर सुशोभीत केले आहे.

शिवपार्वतीचे सोमेश्वर मंदिर

शुक्रवार पेठेत शिवपार्वतीचे सोमेश्वर मंदिर आहे. या मंदिरात शिवलिंग आणि नंदीबरोबरच पार्वतीचीही मूर्ती आहे. या मंदिरावर आता संगमरवरी फरश्या बसवण्यात आल्या आहेत. या मंदिराचादेखील उल्लेख करवीर महात्म्यात आहे.