होमपेज › Kolhapur › सेवाभावी, स्वयंसेवी संस्थांनी सीपीआरला मदतीचा हात द्यावा

सेवाभावी, स्वयंसेवी संस्थांनी सीपीआरला मदतीचा हात द्यावा

Published On: Jan 08 2018 1:13AM | Last Updated: Jan 08 2018 12:30AM

बुकमार्क करा
कोल्हापूर : प्रतिनिधी 

छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय अद्ययावत करण्याची शासनाची भूमिका असून समाजातील सेवाभावी, स्वयंसेवी संस्था आणि व्यक्‍तींनी या रुग्णालयास अधिकाधिक मदतीसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री चंद्रकात पाटील यांनी केले.

छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयातील (सीपीआर) अस्थिव्यंग शल्यचिकित्सा  विभागास सहज सेवा ट्रस्टच्या वतीने 64 स्टीलचे बेड, स्टूल्स, ड्रेसिंग ट्रॉली, रुग्णांसाठी जेवणाचे टेबल आदी साहित्य देण्यात आले असून, याचा लोकार्पण सोहळा पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते झाला. यावेळी ते बोलत होते. 

ना. पाटील म्हणाले, सीपीआरमध्ये 690 बेड असून, सर्व बेड, वॉर्ड अद्ययावत आहेत.  सहज सेवा ट्रस्टतर्फे रुग्णालयास दिलेली मदत प्रेरणादायी आहे. ट्रस्टचे सामाजिक कार्यात मोठे योगदान असून, त्यांचे हे काम कौतुकास्पद आहे. यापुढे ट्रस्टने सीपीआरसाठी नोडल एजन्सी म्हणून काम करावे. 

यावेळी रुग्णालयास 100 बेड देण्याची घोषणा उद्यम सोसायटीने केली.  आ. अमल महाडिक म्हणाले, महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने आणि येथील लोकप्रतिनिधींच्या प्रयत्नामुळे येत्या सहा महिन्यांत रुग्णालयात अद्ययावत एमआरआय उपकरण  सेवेत येणार आहे. तसेच दंत महाविद्यालय, कॅन्सर हॉस्पिटल, शंभर बेडचे सेवा रुग्णालय, शंभर बेडचे स्त्रीरोग रुग्णालय आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे विभागीय कार्यालय शेंडापार्क येथे आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. सावित्रीबाई फुले रुग्णालयाच्या डागडुजीसाठी 50 लाख रुपये निधी उपलब्ध केल्याचेही त्यांनी सांगितले. 

यावेळी आ. राजेश क्षीरसागर, अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद,  डॉ. शिशिर मरगुंडे, सन्मती मिरजे, प्रमोद पाटील, नगरसेवक विजय सूर्यवंशी, उद्योगपती चंद्रकांत जाधव,  डॉ. उदय गायकवाड,  बी. एम. उगले, अनंत खासबागदार, सुभाष रामुगडे आदी  उपस्थित होते.