Sat, Mar 23, 2019 00:25



होमपेज › Kolhapur › शिवाजी पुलावरून पोलिसांची नजर चुकवून अवजड वाहतूक

शिवाजी पुलावरून पोलिसांची नजर चुकवून अवजड वाहतूक

Published On: May 07 2018 2:02AM | Last Updated: May 07 2018 1:51AM



कोल्हापूर : प्रतिनिधी 

शिवाजी पुलावरून अवजड वाहतुकीला मनाई असताना पोलिसांची नजर चुकवून काही ट्रक, डंपरचालक धोकादायक प्रवास करीत आहेत. पहाटेच्या वेळेस पोलिसांच्या अनुपस्थितीत हे प्रमाण अधिक असल्याचे अनेक प्रत्यक्षदर्शी सांगतात. अशा ट्रक-डंपरवर कारवाईची आवश्यकता आहे. 

26 जानेवारी 2018 रोजी पुलाचा कठडा तोडून टेम्पो ट्रॅव्हलर नदी पात्रात कोसळली. या भीषण अपघातात 13 जणांना जीव गमवावा लागला. या घटनेनंतर यंत्रणेचे डोळे लख्ख उघडले गेले. यानंतर पुलावरून वाहतुकीला मज्जाव करण्यात आला. यामुळे शाहूवाडी, पन्हाळा, करवीर तालुक्यातील ग्रामस्थांचे मोठे हाल झाले. टप्प्याटप्प्याने दुचाकी, हलकी वाहने आणि सार्वजनिक प्रवासी वाहनांना (एस.टी., केएमटी) यातून वगळून वाहतूक सुरू झाली. पुलाचे स्ट्रक्‍चलर ऑडिट केल्यानंतर पूल कमकुवत बनत चालल्याचे उघड झाले. तसेच नवीन पुलाचे बांधकामही रखडल्याने हा जुना पूल अवजड वाहनांना वाहतुकीस बंद करण्यात आला. 

शाहूवाडी, पन्हाळ्याकडून येणारे काही डंपर-ट्रकचालकांना मात्र पुलाबाबत सोयरसूतक नसल्याचे दिसून येते. पहाटेच्या वेळेस काही डंपरचालक मनमानीपणे पुलावरून वाहतूक करत असल्याचे मॉर्निंग वॉकला येणार्‍या नागरिकांनी सांगितले. दोन दिवसांपूर्वी चिरे भरलेला एक डंपर शिवाजी पुलाकडे गेल्याचे छायाचित्र एका नागरिकाने टिपले. या डंपरची माहिती घेऊन पोलिसांनी कारवाई करणे गरजेचे आहे.

डंपरबाबत माहिती घेऊन कारवाई : पोलिस निरीक्षक दिलीप जाधव

शिवाजी पुलावरून जाणार्‍या किंवा पुलाकडे येणार्‍या अवजड वाहनांना अडविण्यासाठी पोलिस कर्मचारी तैनात आहेत. वडणगे फाटा व शिवाजी पूल येथे स्वतंत्र बंदोबस्तही नेमण्यात आला आहे. सीसीटीव्हीच्या आधारे माहिती घेऊन पुलावरून वाहतूक करणार्‍या अशा वाहनांची माहिती घेऊन त्यांच्यावर कारवाई केली जाईल.