होमपेज › Kolhapur › जिल्ह्यात सर्वत्र दम‘धार’ धरण परिसरात अतिवृष्टी

जिल्ह्यात सर्वत्र दम‘धार’ धरण परिसरात अतिवृष्टी

Published On: Jun 11 2018 1:06AM | Last Updated: Jun 11 2018 12:22AMकोल्हापूर : प्रतिनिधी

जिल्ह्यात मान्सूनने दम‘धार’ हजेरी लावली. शनिवारी रात्रीपासून रविवारी दुपारपर्यंत अनेक भागात पावसाची संततधार सुरू होती. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात धुवाँधार पाऊस झाला. गेल्या 24 तासांत गगनबावड्यासह जिल्ह्यातील चार धरण परिसरात अतिवृष्टी झाली. सोमवारीही जिल्ह्याच्या काही भागात जोरदार पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. करूळ घाटात दरड कोसळल्याने कोल्हापूर-वैभववाडी मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

जिल्ह्यात शनिवारी रात्री मान्सूनचे आगमन झाले. मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या पावसाचा जोर आजही कायम होता. शहर आणि परिसरात दुपारनंतर पावसाने विश्रांती घेतली. जिल्ह्याच्या काही भागात मात्र दिवसभर पाऊस सुरू होता. पहिल्याच पावसाने नागरिकांची दैना उडाली. शहरात अनेक भागात पाणी साचले. रात्रभर सुरू असलेल्या पावसाचा आजच्या आठवडी बाजारावरही परिणाम झाला. लक्ष्मीपुरी मंडईत अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचले, त्यातूनच मार्ग काढताना नागरिकांची दमछाक होत होती. अनेक ठिकाणी पाणी असल्याने बाजारातील विक्रेत्यांना फटका बसला. रविवार असल्याने खरेदीसाठी बाहेर पडलेल्यांचेही पावसाने हाल झाले.

जिल्ह्यात रविवारी सर्वदूर पाऊस झाला. पावसाचा जोरही चांगला असल्याने शेतात, सखल भागात पाणी साचू लागले आहे. पावसाचा जोर वाढू लागल्याने शेतीच्या कामांनाही वेग आला आहे. जिल्ह्यासह धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला आहे. रविवारी सकाळी आठ वाजेपर्यंत गेल्या 24 तासांत कुंभी, चिकोत्रा, घटप्रभा व कोदे या चार धरण परिसरात अतिवृष्टी झाली. कुंभी परिसरात 75 मि.मी., चिकोत्रा परिसरात 83 मि.मी.,घटप्रभा परिसरात 104 मि.मी. तर कोदे धरण परिसरात 113 मि.मी. पावसाची नोंद झाली. कासारी धरण वगळता अन्य सर्व धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही जोरदार पाऊस झाला असून, या सर्व ठिकाणी 45 मि.मी. पेक्षा अधिक पावसाची नोंद झाली.

पावसाने करूळ घाटात दुपारी 12 वाजता दरड कोसळली. यामुळे कोल्हापूर-वैभववाडीमार्गे कोकणात जाणार्‍या वाहतुकीवर काहीसा परिणाम झाला. दोन तास एकेरी वाहतूक सुरू होती. यानंतर वाहतूक सुरळीत झाली. भुईबावडा घाटातही दोन ठिकाणी दरड कोसळली, मात्र त्याचा वाहतुकीवर परिणाम झाला नाही.

गगनबावड्यात सर्वाधिक पाऊस

जिल्ह्यात गेल्या 24 तासांत सरासरी 27.48 मि.मी. पावसाची नोंद झाली. गगनबावड्यात अतिवृष्टी झाली. तिथे 65 मि.मी. पावसाची नोंद झाली. चंदगडमध्ये 43 मि.मी., भुदरगडमध्ये 56 मि.मी.,शाहूवाडीत 33 मि.मी., राधानगरीत 32 मि.मी., कागलमध्ये 30 मि.मी., आजर्‍यात 28 मि.मी., गडहिंग्लजमध्ये 22 मि.मी., करवीरमध्ये 12 मि.मी. पाऊस झाला.