होमपेज › Kolhapur › विद्यार्थिनीला हृदयविकाराचा झटका; शिक्षकाने दिली नाही नवी कार

विद्यार्थिनीला हृदयविकाराचा झटका; शिक्षकाने दिली नाही नवी कार

Published On: Dec 16 2017 2:06AM | Last Updated: Dec 16 2017 4:02PM

बुकमार्क करा

जयसिंगपूर : प्रतिनिधी

इयत्ता सहावीमध्ये शिकणार्‍या विद्यार्थिनीला हृदयविकाराचा झटका आला. तिला उपचारासाठी नेण्यासाठी वाहनाची गरज होती. शाळेत कारने येणार्‍या शिक्षकाकडे इतर शिक्षकांनी मदतीची मागणी केली; पण त्या शिक्षकाने ‘माझी कार नवी आहे, मी देणार नाही’, असे शिक्षकी पेशालाच नव्हे, तर माणुसकीला काळिमा फासणारे उत्तर दिले. त्यामुळेच शिक्षक नव्हे तू वैरी, अशी संतप्त प्रतिक्रिया  नागरिकांतून व्यक्त होऊ लागली आहे.

चंदगड तालुक्यातील कानूर बु॥ येथील  भावेश्‍वरी संदेश विद्यालयातील विजया  चौगुले या विद्यार्थिनीचे प्रकरण ताजे असतानाच आता जयसिंगपूरच्या प्रकरणामुळे लोकांमध्ये संताप पसरला आहे.  

दरम्यान, ज्या शिक्षकाने वाहन उपलब्ध करून दिले, त्या शिक्षकाचा सत्कार करण्यात आला. मात्र, वाहन न देणार्‍या शिक्षकाला व्यासपीठावर बोलविण्यात आले. मोटारकार का दिली नाही, याचा जाब शालेय शिक्षक समितीच्या अध्यक्षांनी विचारला. गाडीला काही झाले असते, तर भरपाई दिली असती. मात्र, विद्यार्थिनीचे प्राण परत आले नसते, असे म्हणून त्यांनी सरळ पायातील चप्पल काढून त्या शिक्षकाच्या अंगावर धावून गेले.   

विद्यार्थ्यांनो, तुम्हीच सांगा या शिक्षकावर काय कारवाई करायची?

शिक्षण समिती अध्यक्षांनी या शिक्षकाचा समाचार घेताना विद्यार्थ्यांनाच या शिक्षकावर काय कारवाई करायची, असा थेट प्रश्‍न केला. शिक्षकाने मी गाडी देतो म्हणालो होतो, असे सांगितले. अन्य शिक्षकांनी या शिक्षकाचे वर्तन चुकीचे होते, असे सांगितले. त्यामुळे संतापलेल्या अध्यक्षांकडून शिक्षकाला चांगलाच प्रसाद मिळाला. माझ्याकडून काही चुकीचे झाले असेल तर मी शिक्षा भोगायला तयार आहे. तसे मी संस्थेच्या अध्यक्षांना सांगितल्याचेही ते म्हणाले.