Tue, Jul 23, 2019 04:51होमपेज › Kolhapur › तावडे हॉटेलप्रकरणी आज सुनावणी

तावडे हॉटेलप्रकरणी आज सुनावणी

Published On: Apr 25 2018 12:56AM | Last Updated: Apr 24 2018 10:54PMकोल्हापूर : प्रतिनिधी

कोल्हापूर ते गांधीनगर रोडवरील तावडे हॉटेल परिसरातील आरक्षित जागेवर असलेली अतिक्रमणे राज्य शासनाने नियमित करू नयेत. तसेच संबंधित अतिक्रमणावर कोल्हापूर महापालिकेने लवकरात लवकर कारवाई करण्यासाठी आदेश द्यावेत, अशी याचिका मुंबई उच्च न्यायालयात 17 एप्रिलला दाखल झाली आहे. महसूल मंत्री यांना प्रतिवादी करून राज्य शासनाने संबंधित अतिक्रमणे नियमित करण्यासाठी काही निर्देश दिले आहेत का? याचे स्पष्टीकरण 25 एप्रिलला करावे, असे आदेश न्यायालयाने सरकारी वकिलांना दिले होते. त्यानुसार बुधवारी न्यायालयात सुनावणी होणार असून जिल्ह्याचे लक्ष त्याकडे लागले आहे.  

तावडे हॉटेल परिसरात महापालिकेच्या वतीने कचरा डेपो व ट्रक टर्मिनससाठी आरक्षण टाकले आहे; परंतु त्याठिकाणी अनेकांनी अतिक्रमण करून बांधकामे केली आहेत. त्यासाठी उचगाव ग्रामपंचायतीने त्यांना बांधकाम परवानगी दिल्याचे सांगण्यात येते. परिणामी संबंधित जागा कोल्हापूर महापालिकेची का उचगाव ग्रामपंचायतीची? असा वाद सुरू होता. अखेर उच्च न्यायालयात प्रकरण गेल्यावर न्यायालयाने संबंधित जागा महापालिकेच्या हद्दीत असल्याचे आदेश 22 फेब्रुवारीला दिले आहेत; परंतु त्यानंतरही महापालिका प्रशासनाने तेथील अतिक्रमण हटविलेले नाही. 

दरम्यानच्या कालावधीत संबंधित बांधकामाबाबत मंत्रालयात नगरविकास विभागात बैठक आयोजित केली होती. त्या बैठकीला महापालिका अधिकार्‍यांना बोलविण्यात आले होते. संबंधित अतिक्रमणे राज्य शासन नियमित करण्याच्या विचारात असल्याने तोपर्यंत कारवाई करू नये, असे तोंडी आदेश दिल्याची चर्चा होती. तेव्हापासून अतिक्रमण हटाव मोहीम महापालिकेच्या वतीने थांबविण्यात आली आहे. त्यामुळे कोल्हापुरातील भरत सोनवणे यांच्यावतीने अ‍ॅड. भूषण मंडलिक यांनी याचिका दाखल केली आहे. त्यामुळे राज्य शासनाच्या वतीने सरकारी वकील बाजू मांडतील.

Tags : Kolhapur, Hearing, today,  Tawde hotel, case