Fri, Jul 19, 2019 17:45होमपेज › Kolhapur › डी.जे.सह पाचगावातील 11 जणांना आजन्म कारावास

डी.जे.सह पाचगावातील 11 जणांना आजन्म कारावास

Published On: Apr 24 2018 1:27AM | Last Updated: Apr 24 2018 1:26AMकोल्हापूर : प्रतिनिधी

‘खून का बदला खून’ या सूडचक्रातून पाचगाव (ता. करवीर) येथील माजी सरपंच अशोक पाटील व प्रतिस्पर्धी गटातील दिलीप जाधव ऊर्फ डी.जे.चा मेव्हणा धनाजी गाडगीळ खूनप्रकरणी दोन्ही गटांतील प्रमुखांसह 11 मारेकर्‍यांना न्यायालयाने सोमवारी आजन्म कारावास सुनावला. त्यात अशोक पाटील याच्या दोन मुलांसह विरोधी दिलीप जाधव व त्याच्या भावाचा समावेश आहे. राजकीय वर्चस्वातून पाचगाव येथील रक्तरंजित खून खटल्यांच्या निकालाकडे पश्‍चिम महाराष्ट्राचे लक्ष लागले होते.

अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश (2) एल. डी. बिले यांनी आज सकाळी दोन्ही बहुचर्चित खून खटल्यांचा निकाल दिला. निकालासाठी न्यायालय दालन व व्हरांड्यात तोबा गर्दी झाली होती. खबरदारी म्हणून न्यायालयासह कसबाबावडा मार्गावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

अशोक पाटील खुनातील शिक्षा झालेले आरोपी

अशोक पाटील खूनप्रकरणी आजन्म कारावास व तीन हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा झालेल्यांत विरोधी गटाचा प्रमुख दिलीप अशोक जाधव ऊर्फ डी.जे. (वय 39), अमोल अशोक जाधव (29, रा. पाचगाव), हरीश बाबुराव पाटील (38, टिटवे, ता. राधानगरी), ओंकार विद्याधर सूर्यवंशी (23, सिद्धनगर, निपाणी), महादेव ऊर्फ हेमंत मसगोंडा कलकुटगी (26, निपाणी) यांचा समावेश आहे.

धनाजी गाडगीळ खुनातील शिक्षा झालेले आरोपी

धनाजी गाडगीळ खूनप्रकरणी अशोक पाटील याचे दोन्हीही मुलगे मिलिंद अशोक पाटील (30), महेश अशोक पाटील (28), अक्षय जयसिंग कोंडेकर (30), निशांत ऊर्फ मुन्ना नंदकुमार माने (25), प्रमोद कृष्णात शिंदे-आरेकर (28), गणेश विलास कलकुटगी (26, पाचगाव) यांना आजन्म कारावास व तीन हजार रुपये दंड; अन्यथा सहा महिन्यांची साधी कैद ही शिक्षा ठोठावण्यात आली.खटल्यातील आरोपी व माजी नगरसेवक अमोल माने, रहिम सनदी, सुनील बाजीराव घोरपडे यांची न्यायालयाने सबळ पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता केली. खटल्यातील आरोपी अजित कोरी याचा सुनावणीपूर्वीच मृत्यू झाला आहे.  प्रतिस्पर्धी गटांकडून एकमेकांवर खून, खुनाचा प्रयत्न, कट रचणे, संगनमत करणे आदी गंभीर आरोप ठेवण्यात आले होते.

प्रचंड तणाव

अशोक पाटील व धनाजी गाडगीळ खून खटल्याचा निकाल एकाच दिवशी लागणार असल्याने प्रतिस्पर्धी गटांतील समर्थकांनी कसबा बावडा मार्गावर न्यायसंकुल परिसरात सकाळपासूनच तोबा गर्दी केली होती. दोन्हीही गटांतील समर्थक मोठ्या संख्येने आमने-सामने आल्याने प्रचंड तणाव निर्माण झाला होता. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी समर्थकांवर सौम्य लाठीमार करून पिटाळण्याचा प्रयत्न केला. अखेर राज्य राखीव दलाची तुकडी दाखल झाल्यानंतर तणाव निवळला.

राजकीय वर्चस्वातून जीवघेणा संघर्ष

अशोक पाटील आणि दिलीप जाधव ऊर्फ डी.जे. हे एकेकाळी एकमेकांचे जिवलग मित्र. एका खुनाच्या गुन्ह्यात दोघांनाही अटक झाली होती. कालांतराने दोघांत तीव्र मतभेद निर्माण झाले. राजकीय आश्रयामुळे दोघांची महत्त्वाकांक्षा वाढीला लागली. पाचगाववर राजकीय वर्चस्व कोणाचे? यावरून त्यांच्यात ईर्ष्या सुरू झाली.

डी.जे.कडून खेळी झाल्याने फासे पलटले!

पाचगाव ग्रामपंचायतीची सत्ता ताब्यात घेण्यासाठी दोघांनी एकमेकांना आव्हान देण्यास सुरुवात केली. 2012 मध्ये ग्रामपंचायत निवडणुकीसाठी त्यांनी स्वतंत्र आघाड्या केल्या. दिलीप जाधव याच्या आघाडीला बहुमत मिळाले. मात्र, सरपंचपदाचा आरक्षण असलेला उमेदवार डी.जे. तथा जाधव गटाकडे नसल्याने अशोक पाटील याने सरपंचपदासाठी स्वत:च्या आघाडीकडून महिला उमेदवाराचा अर्ज दाखल केला. त्यानंतर मात्र जाधव गटाकडून मोठी राजकीय खेळी झाली आणि जाधव गटाच्या राधिका बराले सरपंचपदाच्या विजयी उमेदवार ठरल्या.

दोघांनाही एकमेकांकडून बरे-वाईट होण्याची धास्ती

सरपंचपदाच्या निवडणुकीतील पराभवानंतर अशोक पाटील व दिलीप जाधव यांच्यात हाडवैर निर्माण झाले. दोघेही एकमेकांना पाण्यात पाहू लागले. एव्हाना एकमेकांना संपविण्यासाठी धमकीसत्र सुरू झाले. अशोक पाटील अगदीच आक्रमक झाल्याने दिलीप जाधव काही काळ पाचगावातून बाहेरच होता. दोघांनाही एकमेकांपासून बरे- वाईट होण्याची धास्ती होती.

मारेकर्‍यांनी भरचौकातच गाठले; पिस्तुलातून गोळ्या झाडल्या!

दि. 13 फेब्रुवारी 2013 रोजी दुपारी अशोक पाटील मित्र उत्तम भोसले, शफिक बंडवळ, अरुण पाटील, निशांत ऊर्फ नंदकुमार माने यांच्यासमवेत मोटारीतून न्यू महाद्वार रोडवरील पद्माराजे शाळेजवळील अ‍ॅक्सिस बँकेत पैसे काढण्यासाठी आला. बँकेच्या प्रवेशद्वारासमोर मित्रांशी बोलत थांबलेला असतानाच दिलीप जाधव, महादेव कलकुटगी, अमोल जाधव, ओंकार सूर्यवंशी हे चौघेजण मोपेड आणि मोटारसायकलवरून तेथे आले. दिलीप व अमोल जाधव या दोघांनी गावठी पिस्तुलातून अशोक जाधव याच्या दिशेने गोळ्या झाडल्या.त्यापैकी दोन गोळ्या अशोक पाटील याच्या डोक्यातून आरपार झाल्याने रस्त्यावरच रक्ताच्या थारोळ्यात तो कोसळला.

शहरासह जिल्ह्यात नाकाबंदी

बेशुद्धावस्थेतील अशोक पाटीलला तातडीने शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. तथापि, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. राजकीय वैमनस्यातून पाचगावच्या अशोक पाटील याचा खून झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात नाकाबंदी केली. मात्र, मारेकरी वाहनांसह पसार झाले. मारेकर्‍यांची नावे निष्पन्न होताच पोलिसांनी संशयितांच्या घरांवर छापे टाकून शोधमोहीम राबविली. मात्र, त्याचा थांगपत्ता लागला नव्हता.

पिस्तुलासह आवळल्या मारेकर्‍यांच्या मुसक्या

अशोक पाटील याच्या खुनाच्या घटनेमुळे खळबळ उडाली असतानाच मारेकर्‍यांनी कर्नाटककडे पलायनाचा बेत केला. दि. 16 फेब्रुवारी 2013 रोजी तत्कालीन पोलिस उपअधीक्षक महेश सावंत, संजय कुरूंदकर यांनी कोगनोळीजवळ छापा टाकून दिलीप जाधवसह पाचजणांना अटक केली. त्यांच्याकडील वाहनांची झडती घेण्यात आली असता दोन पिस्तूल, अन्य साहित्य मिळून आले होते.त्यानंतर काही दिवसांनी गुन्ह्याचा तपास ‘सीआयडी’कडे वर्ग झाला.

खून का बदला खून... घेतला आणखी एकावर सूड!

अशोक पाटील खुनामुळे दोन गटांत जीवघेणा संघर्ष सुरू झाला होता. दिलीप जाधवचा मेव्हणा धनाजी गाडगीळ याचा पाटील याच्या दोन मुलांनी दि. 23 डिसेंबर 2013 रोजी रात्री साडेआठला पाचगाव येथील प्रगतीनगर चौकात ओंकार गॅरेजसमोर काटा काढला. स्वप्निल कांबळे याच्या मित्रांनी वाढदिवसानिमित्त कार्यक्रम आयोजित केला होता. अमर बावडेकरसमवेत धनाजी गाडगीळ तेथे होता. गाडगीळ आल्याचे समजताच मिलिंद, महेश पाटीलसह साथीदारांनी गाडगीळवर तलवार, कोयत्याने हल्ला केला. त्यात त्याचा मृत्यू झाला. धनाजीला वाचविण्याच्या प्रयत्नात बावडेकर जखमी झाला होता.

दोन्हीही खटल्यांत   27 साक्षीदार फितूर  

अशोक पाटील व धनाजी गाडगीळ खून खटल्यात 66 साक्षीदारांच्या साक्षी झाल्या असल्या, तरी प्रत्यक्षात अशोक पाटील खून खटल्यात 23 व गाडगीळ खून खटल्यात 4 साक्षीदार फितूर झाल्याचे न्यायालयाने घोषित केले आहे. पाटील खून खटल्यात निशांत ऊर्फ मुन्ना माने, अविनाश जांभळे, सोमेश साठे, राज्य गुन्हे अन्वेषणचे पोलिस अधीक्षक शिवाजी शेलार, महेश सावंत, पोलिस निरीक्षक दिलीप जाधव, वैष्णवी पाटील, संतोष डोके, पोलिस निरीक्षक डॅनियल बेन, सहायक निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्याचे जिल्हा सरकारी वकील विवेक शुक्ल यांनी सांगितले.

दोन्हीही खून खटल्यांची एकाच कोर्टात सुनावणी

अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश (2) बिले यांच्यासमोर प्रतिस्पर्धी दोन्ही खटल्यांची सुनावणी सुरू होती. दोन्हीही खटल्यांचा एकाच दिवशी निकाल हा केवळ योगायोग असावा, असेही जिल्हा सरकारी वकिलांनी स्पष्ट केले. गाडगीळ खून खटल्यात सरकारच्या वतीने विशेष सरकारी वकील श्रीकांत जाधव यांनी काम पाहिले.


दोघा भावांसह एकाचवेळी 11 जणांना आजन्म कारावास : पहिलीच घटना

खुनाच्या गुन्ह्यात एकाचवेळी 11 जणांना आजन्म कारावास होण्याची जिल्ह्यातील अलीकडच्या काळातील पहिलीच घटना असल्याचे जिल्हा सरकारी वकिलांनी सांगितले. अशोक पाटील याची दोन मुले व दिलीप जाधवसह भावाला आजन्म कारावास भोगावा लागणार आहे.

समर्थकांच्या प्रचंड गर्दीमुळे मुख्य प्रवेशद्वार दुपारपर्यंत बंद

अशोक पाटील व धनाजी गाडगीळ खुनाचा निकाल आज, सोमवारी जाहीर होणार असल्याने प्रतिस्पर्धी गटातील कुटुंबीयांसह त्यांच्या समर्थकांनी न्यायालयाच्या आवारात सकाळपासून मोठी गर्दी केली होती. दोन्हीही गट आक्रमक झाल्याने न्यायालयाचे दोन्ही प्रवेशद्वार बंद करण्यात आले होते.न्यायाधीश, वकील, पक्षकारांसह पत्रकारांनाच प्रवेश देण्यात येत होता. दोन्ही गेटसमोर पोलिसांचा मोठा फौजफाटा ठेवण्यात आला होता.


पोलिसांचा सौम्य लाठीमार : तिघेजण ताब्यात

पाचगाव येथील दोन्हीही गटांचे समर्थक समोरासमोर आल्याने अनुचित प्रकार घडण्याची शक्यता निर्माण झाली होती. पोलिस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर, सूरज गुरव, पोलिस निरीक्षक संजय मोरे, तानाजी सावंत, अनिल गुजर, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक दिनकर मोहितेंसह मोठा फौजफाटा न्यायालय आवारात होता. निकाल जाहीर झाल्यानंतर समर्थक अस्वस्थ झाले. खबरदारीचा उपाय म्हणून संजय मोरे यांनी दोन्ही गटांवर लाठीमार केला. पोलिसांशी हुज्जत घालणार्‍या तिघांना ताब्यात घेऊन सायंकाळी त्यांना सोडून दिले.

भरचौकातील गोळीबाराने हादरले होते कोल्हापूर

शैक्षणिक आणि सांस्कृतिक ठिकाण म्हणून परिचित असणार्‍या सिद्धाळा परिसरात भरदुपारी गोळीबाराची घटना घडल्याने संपूर्ण कोल्हापूर शहर हादरले होते. पहिल्या टप्प्यात कोणावर आणि कोणी गोळीबार केला, हे स्पष्ट झाले नव्हते. घटना गंभीर असल्याने परिसर सुन्न झाला होता. शांत म्हणून ओळखल्या जाणार्‍या या परिसरात शाळा, महाविद्यालये, बँका, इस्पितळे आहेत. त्याचबरोबर कलाक्षेत्राशी निगडित बाबुराव पेंटर यांचा स्मृतिस्तंभ याच परिसरात आहे. पाचगावच्या वर्चस्ववादातून अशोक पाटीलचा खून झाल्याचे स्पष्ट झाले. पाचगावचे सूडचक्र कोल्हापुरात सिद्धाळ्यापर्यंत पोहोचले होते. मित्रांसमवेत असलेल्या अशोक पाटीलचा पाठलाग थेट सिद्धाळ्यापर्यंत झाला होता आणि तेथेच त्याचा गेमही करण्यात आला होता.

मारेकर्‍याने दोन फुटावरून गोळ्या झाडल्या

दिलीप जाधवने अशोक पाटीलवर दोन फूट अंतरावरून गोळ्या झाडल्याचे फॉरेन्सिक लॅबच्या अहवालात म्हटले आहे. जप्त रिकाम्या पुंगळ्या, रक्ताचे नमुने, पिस्तुलातून झाडलेल्या गोळ्यांमध्ये साम्य असल्याचे नमूद करण्यात आले आहे. हाच महत्त्वाचा पुरावा ठरला आहे, असे अ‍ॅड. शुक्ल म्हणाले.

Tags : Kolhapur, Hearing,   Ashok Patil,  Dhanaji Gadgil, Murder, case