Thu, Jul 18, 2019 04:12होमपेज › Kolhapur › मागेल त्याला ‘स्वस्त’ तूरडाळ

मागेल त्याला ‘स्वस्त’ तूरडाळ

Published On: May 10 2018 1:35AM | Last Updated: May 10 2018 12:35AMकोल्हापूर : अनिल देशमुख

मागेल त्याला ‘स्वस्त’ तूरडाळ देण्यात येणार आहे. रेशनवर प्रतिकिलो 55 रुपये याप्रमाणे या डाळीचे वितरण करण्यात येणार आहे. सध्याच्या बाजारभावापेक्षा पाच ते तेरा रुपयांनी ही डाळ स्वस्त मिळणार आहे. याकरिता जिल्हा पुरवठा विभागाने 2,900 क्‍विंटल तूरडाळीची मागणी केली आहे.

राज्य शासनाने 28 नोव्हेंबर 2017 पासून रेशनवर तूरडाळ देण्याचा निर्णय घेतला. मात्र, ही तूरडाळ केवळ अंत्योदय आणि अन्‍नसुरक्षा योजनेतील लाभार्थ्यांना प्रतिकार्ड एक किलो याप्रमाणे दिली जात होती. यावर्षी राज्य शासनाने मागेल त्याला तूरडाळ देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील सर्वच कार्डधारकांना रेशनवर तूरडाळ मिळणार आहे. विशेष म्हणजे, प्रतिकार्ड एक किलोऐवजी मागणी केल्यास त्यापेक्षा अधिक तूरडाळही दिली जाणार आहे. 

तूरडाळीची विक्री वाढावी, याकरिता रेशनधान्य दुकानदारांच्या कमिशन मध्येही वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी तूरडाळ पॉस मशीनद्वारे विक्री केल्यास 1 रुपये 50 पैसे, तर विनापॉस मशीन विक्री केल्यास प्रतिकिलोस 70 पैसे कमिशन दिले जात होते. या कमिशनमध्ये वाढ केली असून, प्रतिकिलोला रेशन दुकानदारांना सरसकट तब्बल 3 रुपये कमिशन देण्यात येणार आहे. 

जिल्ह्यात 11 हजार क्‍विंटल तूरडाळीचे वितरण

गेल्या वर्षभरात जिल्ह्यात 11 हजार क्‍विंटल तूरडाळ रेशनवरून वितरित करण्यात आली आहे. राज्यात कोल्हापूर जिल्ह्याने या तूरडाळ वितरणातही आघाडी घेतली आहे. जिल्हा पुरवठा विभागाने केलेल्या नियोजनामुळे कमी कमिशन असूनही रेशनकार्डधारक मर्यादित असतानाही अधिक तूरडाळ विक्री झाली आहे. यावर्षीही मोठ्या प्रमाणात तूरडाळ विक्री होईल, असा विश्‍वास पुरवठा विभागाला आहे. याकरिता पहिल्या टप्प्यात 2,900 क्‍विंटलची मागणी करण्यात आली आहे. दुकानदारांकडून जशी मागणी वाढेल त्या पद्धतीने तूरडाळ उपलब्ध करून देण्याचेही नियोजन सध्या सुरू आहे.

रेशनवर उपलब्ध करून देण्यात येणारी तूरडाळ ही चांगल्या प्रतीची आहे. यापूर्वी वितरित झालेल्या तूरडाळीची प्रत उत्तम होती. त्याच पद्धतीने चांगली, योग्य पद्धतीने पॅकिंग केलेली तूरडाळ नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. ज्या कार्डधारकांना रेशनवरील काही मिळत नाही, अशा शुभ्र, केशरी कार्डधारकांनाही ही तूरडाळ उपलब्ध होणार आहे. - विवेक आगवणे, जिल्हा पुरवठा अधिकारी