Mon, Apr 22, 2019 15:39होमपेज › Kolhapur › अनिरुद्धच्या मृत्यूने मनाला चटका

अनिरुद्धच्या मृत्यूने मनाला चटका

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

शाहू मैदानासह गांधी मैदान, महाराष्ट्र हायस्कूल मैदानावर नियमित फुटबॉलचा सराव करीत आक्रमक चढाई करणारा, खेळाडू बनण्याचे स्वप्न पाहणारा आणि बोलक्या स्वभावामुळे वरिष्ठ खेळाडूंच्या मनात घर करून राहिलेल्या, बाल फुटबॉलपटू अनिरुद्धच्या मृत्यूने शुक्रवारी शिवाजी पेठ  हळहळली. आगीत होरपळल्याने त्याचे निधन झाले. मनाला चटका लावणार्‍या अनिरुद्धच्या मृत्यूमुळे बालसहकार्‍यांचेही डोळे पाणावले होते.

नेताजी तरुण मंडळाजवळ राहणारा अनिरुद्ध अमित पाटील ऊर्फ पॅटी वय वर्षे 13 वडील रिक्षाचालक घरची आर्थिक स्थिती बेताची पाचवीत असतानाच त्याला फुटबॉलचे वेड लागले. सातवीचा नियमित अभ्यास करतानाही फुटबॉल सरावाकडे त्याने विशेष लक्ष दिले. बोलका स्वभाव आणि शिकण्याची जिद्द यामुळे कनिष्ठ, वरिष्ठ गटातील अनेक खेळाडू त्याचे जणू सहकारी मित्रच आवडीचा खेळाडू मैदानात उतरला की, प्रोत्साहन देण्यासाठी अनिरुद्ध मनसोक्‍त जल्लोष करायचा उड्या मारायचा संघ जिंकला की, मित्राच्या दिशेने झेप घेऊन त्याच्या अंगा-खाद्यांवर नाचायचा आक्रमक चढाई करणारा खेळाडू बनण्याचे त्याचे स्वप्न होते पण नियतीने कोवळ्या अनिरुद्धचे स्वप्न अर्ध्यावरच ठेवले.

घरात मुंग्या झाल्याने अनिरुद्धने खोलीमध्ये डीडीटी पावडरची फवारणी केली; पण मुंग्या कमी झाल्या नाहीत. मग त्यांने मुग्या झालेल्या ठिकाणी रॉकेल फवारले आणि पेटवून दिले.  रॉकेलचा भडका उडाला. अंगावरील कपड्यांनी पेट घेतला. क्षणार्धात हात, पायासह पाठीला मोठी झळ बसली. 40 टक्के होरपळलेल्या अनिरुद्धला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी अनिरुद्धला वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. बुधवारपर्यंत अनिरुद्ध बोलू लागला. सहकारी बालमित्रांसह नातेवाईकांशीही गप्पा मारू लागला. डिस्चार्ज होताच थेट मैदानातच पुन्हा सराव.आणि दंगाच दंगा  असेही सांगू लागला.

पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते. गुरुवारी त्याची प्रकृती अचानक खालावली  होरपळलेल्या शरीरावर संसर्ग झाला. मध्यरात्री प्रकृती अधिकच चिंताजनक बनली पहाटे अनपेक्षितपणे त्याने सार्‍यांचाच निरोप घेतला. काळजाचा तुकडाच काळाने हिरावून नेल्याने माता-पित्यांनी हंबरडा फोडला, तर सहकारी मित्रांना शोक अनावर झाला. मनाला चटका लावणार्‍या घटनेमुळे शिवाजी पेठेतून दिवसभर हळहळ व्यक्‍त होत होती.

Tags : Kolhapur, Kolhapur News, died, due, burns, fire


  •