Wed, Jun 26, 2019 11:29होमपेज › Kolhapur › ‘हवाई’ सफर

‘हवाई’ सफर

Published On: Apr 23 2018 1:50AM | Last Updated: Apr 22 2018 11:40PMकोल्हापूर : प्रतिनिधी

गेल्या सहा वर्षांपासून खंडित असलेल्या कोल्हापूर-मुंबई विमानसेवेला रविवारी प्रारंभ झाला. ‘उडान’ योजनेंतर्गत एअर डेक्‍कन कंपनीची या मार्गावर आजपासून नियमित सेवा सुरू झाली. दुपारी चार वाजता विमानाने मुंबईसाठी टेक ऑफ केले. केंद्र शासनाच्या ‘उडान’ योजनेंतर्गत पहिल्या टप्प्यात कोल्हापूर-मुंबई मार्गावर विमानसेवा सुरू करण्यात आली आहे. या सेवेला आज प्रारंभ झाला. दुपारी 3 वाजून 20 मिनिटांनी मुंबईहून विमान कोल्हापूरच्या विमानतळावर उतरले. यानंतर 17 प्रवासी घेऊन दुपारी 4 वाजता विमानाने मुंबईसाठी उड्डाण केले. ‘उडान’ योजनेंतर्गत पहिल्या 9 सीटस्साठी 1,970 रुपये आणि त्यापुढील उर्वरित 9 सीटस्साठी 4 हजार रुपयांपुढे भाडे असणार्‍या या सेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आज अखेरचे तिकीट 6 हजार 700 रुपयांना विकले गेले.

‘उडान’ योजनेेंतर्गत दुसर्‍या टप्प्यात कोल्हापूर-हैदराबाद, कोल्हापूर-तिरूपती, कोल्हापूर-हुबळी, बंगळूर या मार्गावरही विमानसेवा सुरू होणार आहे. त्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. येत्या जुलैअखेर सर्व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण होऊन प्रत्यक्ष विमानसेवेलाही प्रारंभ होण्याची शक्यता आहे. कोल्हापूर-मुंबई या मार्गावर रखडलेली विमानसेवा सुरू झाल्याने विकासाला चालना मिळेल, असा विश्‍वास विविध क्षेत्रांतून व्यक्‍त केला जात आहे.पहिल्याच दिवशी विमानाचे 55 मिनिटे उशिरा टेक ऑफ झाले. नियोजित वेळेनुसार विमान 2 वाजून 35 मिनिटांनी कोल्हापूर विमानतळावर येऊन दुपारी 3 वाजून 5 मिनिटांनी मुंबईला रवाना होणार होते. मात्र, दुपारी 3 वाजून 20 मिनिटांनी विमानाचे लँडिंग झाले. त्यानंतर 3 वाजून 5 मिनिटांऐवजी विमान 4 वाजता मुंबईला रवाना झाले.

सेवा दररोज सुरू राहावी

कोल्हापूर-मुंबई मार्गावरील ही सेवा आठवड्यातून तीनवेळा उपलब्ध राहणार आहे. रविवार, मंगळवार आणि बुधवार अशी तीनच दिवस असणारी ही सेवा दररोज सुरू व्हावी, अशी मागणी आहे. त्यादृष्टीने लोकप्रतिनिधींचे प्रयत्न सुरू आहेत. यासह या विमानसेेवेचा टाईम स्लॉट (वेळ) बदलण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. 

प्रवाशांचा चांगला प्रतिसाद

पहिल्या फेरीची सर्वच तिकिटे यापूर्वीच संपली होती. 18 सीटर असलेल्या या विमानात मुंबईहून कोल्हापूरला येताना 18 प्रवासी होते. जाताना मात्र 17 प्रवासी होते. एका उद्योजकाने तिकीट बूक केले होते. मात्र, तत्पूर्वीच ते या विमानातून मुंबईला जाऊन आल्याने आज त्यांनी प्रवास केला नाही. दरम्यान, या सेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. जूनच्या दुसर्‍या आठवड्यापर्यंतच्या तिकिटांची विक्री झाली आहे. काही फ्लाईट आताच पूर्ण भरल्या असून, काही तारखांना काही जागा शिल्‍लक आहेत.

Tags : Kolhapur, Hawaii, journey