Wed, Jun 26, 2019 11:52होमपेज › Kolhapur › ‘हातकणंगले’ विभाजन मुद्दा बनला प्रतिष्ठेचा

‘हातकणंगले’ विभाजन मुद्दा बनला प्रतिष्ठेचा

Published On: Feb 27 2018 2:04AM | Last Updated: Feb 27 2018 12:31AMहातकणंगले : पोपटराव वाकसे

कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सर्वात मोठा असलेल्या हातकणंगले तालुक्याचे विभाजन नागरिकांच्या सोयीसाठी वडगावमध्ये व्हावे, असा वडगाववासीयांचा अट्टाहास तर शाहू महाराजांनी निर्मिती केलेल्या, सर्वसोयीनियुक्त असलेल्या हातकणंगलेचे विभाजन होऊ न देण्यासाठी हातकणंगलेकरांनी घेतलेला पवित्रा यामुळे हातकणंगले विभाजन हा प्रतिष्ठेचा मुद्दा बनत आहे.

पूर्वाश्रमीचा पेठा विभाग म्हणून आळते गावाची प्रचिती होती. परंतु, राजर्षी शाहू महाराजांनी दळणवळणाच्या द‍ृष्टीने सोयीचा असलेल्या हातकणंगले गावाला तालुक्याचा दर्जा दिला होता . तेव्हापासून हातकणंगले सर्व सोयीनीयुक्‍त हातकणंगले गाव तालुका म्हणून कार्यरत आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हातकणंगले तालुका अडीच ब्लॉकचा तालुका असून निलेवाडीपासून-हुपरी रेंदाळपर्यंत व शिरोलीपासून ते खोचीपर्यंत तालुक्याचा विस्तार आहे. तालुक्याच्या चारी दिशांनी हातकणंगलेला येण्यासाठी दळणवळणाची सोय आहे. याशिवाय, इतिहासकालीन इमारतीबरोबरच करोडो  रुपये खर्चून तहसील कार्यालय व पंचायत समितीकरिता प्रशासकीय इमारती पूर्णत्वास आल्या आहेत .

परंतु  हातकणंगले विभाजनाचा बसलेला धुरळा पेठवडगावमध्ये तालुका विभाजन कृती समिती गठित झाल्याने पुन्हा उडू लागला आहे.कृती समितीच्या मते हातकणंगले तालुक्याच्या उत्तरेकडील गावांना तसेच सांगली-कोल्हापूर रस्त्याच्या उत्तरेकडील गावांना सोयीचे ठिकाण म्हणून वडगाव शहराची तालुका म्हणून निर्मिती करावी, अशी अपेक्षा आहे. परंतु, याकरिता शासनाचे कोट्यवधी रुपये खर्ची पडणार आहे हे वास्तव आहे. तालुक्यातील काही मंडळींकडून  गरज नसताना हातकणंगले तालुका विभाजनाचा अट्टाहास केला जात आहे. मुळातच हातकणंगले तालुक्यासाठी शासनाकडून सापत्नपणाची भावना आहे. नगरपंचायतसह अनेक प्रश्‍नांचा निपटारा होणे बाकी असताना तालुका विभाजनाची गरजच काय, काहीही झाले तरी तालुक्याचे विभाजन होऊ देणार नसल्याची हातकणंगले वासीयांनी ताठर भूमिका घेतली आहे. 

सांगली - कोल्हापूर महामार्गासह मध्यवर्ती ठिकाण, रेल्वे , सुरू असलेले प्रशासकीय इमारतीचे बांधकाम, दळणवळणाकरिता सोयीस्कर अशी रचना शाहू कालीन असताना कोणाच्या स्वार्थासाठी हा प्रकार सुरू आहे. हातकणंगले तालुका बचावासाठी पक्ष, संघटना, विरहित समिती स्थापन करत हा लढा उभा करणार आहेत. याकरिता आमदार व खासदारांची भूमिकाही महत्त्वाची राहणार आहे. 

थोड्यांची सोय अन... अनेकांची गैरसोय

अनेक वर्षापूर्वीपासून तालुका विभाजनाचा प्रस्ताव काही मंडळी करीत आहेत .परंतु हातकणंगले तालुक्याचे इन्फ्रास्ट्रक्चर तयार असून तालूक्यामध्ये कोटयावधी रुपयाचा निधी प्रशासकीय इमारती बांधण्यात केला आहे. दळणवळणासह अनेक सोयीनी युक्त असलेल्या तालुक्याचे विभाजन म्हणजे लक्ष्मीवाडी पासून आळतेपर्यंत अनेक गावांवर अन्याय होणार आहे .परिणामी थोड्यांची सोय आणि अनेकांची गैरसोय निर्माण करणारा तालूका विभाजन म्हणजे शासनाला भुर्दंडच म्हणावा लागेल असे मत जिल्हा परीषदेचे जेष्ठ नेते अरुण इंगवले व सागर पुजारी यांनी पुढारीशी बोलताना व्यक्त केले.