Sun, Jul 21, 2019 01:28होमपेज › Kolhapur › जिल्ह्यात साखर शाळांचे भवितव्य टांगणीला

जिल्ह्यात साखर शाळांचे भवितव्य टांगणीला

Published On: Jan 15 2018 1:48AM | Last Updated: Jan 14 2018 11:15PM

बुकमार्क करा
हातकणंगले : प्रतिनिधी 

विद्यार्थ्यांना सक्तीचे आणि मोफत शिक्षण देण्याचा कायदा नुकताच करण्यात आला. या पार्श्‍वभूमीवर राज्यातील साखर कारखान्यांच्या परिसरात सुरू असणार्‍या साखर शाळा बंद करून त्या जागी नियमित शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु, अंमलबजावणीतील गोंधळामुळे व मजुरांच्या अनास्थेमुळे ऊसतोडणी मजुरांची पोरं पोषण आहारासाठी हजेरी लावत असल्याचे बोलले जात असल्याने ऊसतोडणी कामगारांच्या हजारो मुलांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले आहे.

साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झाला. यावेळी या हंगामात मुख्य अडचण जाणवत आहे ती ऊसतोडणी मजुरांची. नव्याने हे काम करण्यास फारसे कोणी तयार नाही. पूर्वीच्या ऊसतोडणी मजुरांच्या संख्येत कोणत्या ना कोणत्या कारणाने मोठी घट झाली आहे. अशा परिस्थितीत मजूर आणायचे कुठून, हा प्रश्‍न आहे. राज्यात बहुतांश कारखान्यांच्या ऊसतोडणीसाठी विदर्भ आणि मराठवाड्यातून मजूर येतात.

वर्षातून सुमारे आठ महिने चालणार्‍या गळीत हंगामासाठी ऊसतोडणी मजुरांचा कबिला कारखान्यांच्या कार्यस्थळावर सहकुटुंब हजर असतो. जवळपास 12 ते 14 तास किंवा त्यापेक्षा अधिक काळ मेहनत घेऊन हे मजूर उसाची तोडणी करत असतात. या तोडणीच्या निमित्ताने वर्षातील बराच काळ या मजुरांना सतत फिरत राहावे लागते. त्यातून कुटुंबाची आबाळ होतेच; पण मुलांच्या शिक्षणाची हेळसांड होते ती वेगळीच. त्याचा विचार करून कारखान्याच्या ठिकाणी साखर शाळा सुरू करण्यात आल्या होत्या. परंतु, या हंगामी साखर शाळा बंद करून संबंधित मुलांना कारखाना परिसरातील नियमित शाळेत शिक्षण देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

शिक्षणाची गंगा तळागाळापर्यंत पोहोचवल्याशिवाय देशाची प्रगती होणार नाही, हे लक्षात आल्याने त्यासंदर्भात पावले उचलली जात आहेत. राज्यात विविध कारखान्यांवर काम करणार्‍या ऊसतोडणी मजुरांची संख्या जवळपास दोन लाख इतकी आहे. या मजुरांच्या मुलांची संख्या 25 हजारांच्या घरात जाते. तर हातकणंगले तालुक्यात 6 ते 14 वयोगटातील  विद्यार्थी-विद्यार्थिनींची संख्या 140 आहे. साखर शाळा बंद झाल्याने तालुक्यातील विद्यामंदिर नरंदे व मानेनगर, रेंदाळ या ठिकाणच्या शाळांमध्ये मजुरांच्या मुलांना तात्पुरता प्रवेश देऊन संबंधित विद्यार्थांना पोषण आहार पुरवत असल्याचे संबंधितांकडून सांगण्यात येते.

परंतु पोटाच्या मागे लागलेल्या ऊसतोड मजुरांच्या 6 ते 14 वयोगटातील पोरांचा वापर लहान बाळांना सांभाळण्यासाठी केला जात असल्याने शिक्षण त्यांच्यापासून चार हात दूरच राहत असल्याचे वास्तव आहे. याशिवाय साखर कारखाना परिसरामध्ये या विद्यार्थ्यांना भौतिक सुविधा पुरविल्या जात नाहीत. त्यामुळे या मुलांच्या शिक्षणाची हेळसांड होत आहे. तरी शासनाने ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी होत  आहे. ऊसतोड मजुरांच्या भागामध्ये झालेले समाधानकारक पावसाचे प्रमाण, ऊसतोड मजुरांनी ट्रॅक्टर मालकाला घातलेला लाखोंचा गंडा, यामुळे यंदाच्या गळीत हंगामामध्ये ऊसतोड मजुरांची संख्या कमालीची कमी झाली आहे. अशातच या मजुरांमध्ये शाळेबाबत असलेली अनास्था, यामुळे साखर शाळा ओस पडल्याचे चित्र आहे.