Thu, Apr 25, 2019 05:58होमपेज › Kolhapur › हातकणंगले-इचलकरंजी रेल्वेमार्ग सर्व्हे सुरू

हातकणंगले-इचलकरंजी रेल्वेमार्ग सर्व्हे सुरू

Published On: Aug 30 2018 1:18AM | Last Updated: Aug 30 2018 12:07AMहातकणंगले : प्रतिनिधी

चार किलोमीटरऐवजी आठ किलोमीटरचा रेल्वेमार्ग करून अल्पभूधारकांची हजारो एकर शेती हस्तगत करून भूमिहीन करू पाहणार्‍या रेल्वे प्रशासनाला हातकणंगले, चंदूर, कबनूर, कोरोची येथील रेल्वेविरोधी कृती समितीने कोणत्याही परिस्थितीमध्ये जमिनीमध्ये पाय ठेवू न देण्याचा निश्‍चय करीत तीव्र विरोध दर्शविला. परंतु, शेकडो पोलिस कर्मचार्‍यांच्या बंदोबस्तात रेल्वेचा सर्व्हे करणारच, अशी भूमिका रेल्वे प्रशासनाने घेतली. परिणामी, कृती समितीने माघार घेत खासदार, आमदार यांच्याबरोबर बैठक घेऊन आंदोलनाची पुढील दिशा ठरविणार असल्याचे सांगितले. परंतु, पोलिस प्रशासनाने याप्रकरणी कृती समिती सदस्यांना नोटिसा बजावल्या आहेत.

सकाळी पंचगंगा साखर कारखान्यात झालेल्या बैठकीनंतर कृती समितीने कोणत्याही परिस्थितीत रेल्वेचा सर्व्हेे करू न देण्याची भूमिका घेतली होती. परंतु, रेल्वे प्रशासन वरिष्ठांचा आदेश पाळण्यासाठी प्रचंड पोलिस बंदोबस्तात हातकणंगले रेल्वेस्टेशनवर जमा झाले. यामध्ये अतिरिक्‍त पोलिस अधिकारी श्रीनिवास घाडगे, पोलिस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, सूरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सीताराम डुबल यांच्यासह 6 पोलिस निरीक्षक, 22 पोलिस उपनिरीक्षक, पोलिस कर्मचार्‍यांसह 3 स्ट्रायकिंग फोर्स असा पोलिसांचा समावेश होता. 

रेल्वेचा सर्व्हे चालू होताच आंदोलक घटनास्थळी आले. यावेळी अंदोलकांनी सर्व्हेची नोटीस नाही, यापूर्वी केलेला ट्रॅफिकचा व आर्थिकद‍ृष्ट्या केलेला अहवाल द्यावा आणि मगच जमिनीचा सर्व्हे करावा; अन्यथा शेतकर्‍याला उद्ध्वस्त करणार्‍या रेल्वे प्रशासनाने माघारी फिरावे, असा पवित्रा घेतला. तसेच पोलिस प्रशासनाच्या बळावर शेतकर्‍यांचा आवाज बंद करीत असल्याचा आरोपही आंदोलकांनी केला.

यावेळी रेल्वेचे सहायक अभियंता एस. के. जैन म्हणाले, महाराष्ट्रामध्ये दोनच ठिकाणी रेल्वेमार्ग मंजूर झाला आहे. याशिवाय हातकणंगले-इचलकरंजी या 8 किलोमीटर रेल्वेमार्गाला निधीही मंजूर झाल्याने वरिष्ठांच्या आदेशानुसार रेल्वेचा सर्व्हे होऊन जमिनीही हस्तगत करणार असल्याचे सांगितले. अखेरीस खासदार, आमदार यांच्याबरोबर बैठका घेऊन पुढील निर्णय घेण्याचा निर्णय झाला. मात्र, सर्व्हे सुरूच राहिला. यावेळी रेल्वेविरोधी कृती समितीचे जयकुमार कोले, अध्यक्ष प्रमोद पाटील, दशरथ पिष्टे, नागेश पुजारी, संजय दुग्गे, रघुनाथ पाटील, गुंडा इरकर, निशिकांत पाटील यांच्यासह हातकणंगले, कोरोची, चंदूर व कबनूरमधील आंदोलक उपस्थित होते..

रेल्वे प्रशासन अधिकारीच अनभिज्ञ
जमिनीचा सर्व्हे करण्यापूर्वी आर्थिक व ट्रॅफिकचा सर्व्हे करणे गरजेचे होते. याशिवाय याबाबतची माहिती शेतकर्‍यांना देणे गरजेचे होते. याबाबत आंदोलकांनी रेल्वे अधिकारी जैन यांना विचारल्यानंतर, ‘हमको कोई पता नहीं.’ असे म्हणून वेळ मारून नेली. परंतु, आर्थिक व ट्रॅफिकचा सर्व्हे झालाच नसल्याचे समजते. 

खासदार, आमदार ‘नॉटरिचेबल’
रेल्वे प्रशासनाने सर्व्हे करणारच, असा पवित्रा घेतल्याने शेतकर्‍यांचे कैवारी खासदार राजू शेट्टी व इचलकरंजी विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुरेश हाळवणकर यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता दोघांशीही संपर्क होऊ शकला नाही.