होमपेज › Kolhapur › हातकणंगले मतदारसंघात परिवर्तन घडविणार : ना. खोत

हातकणंगले मतदारसंघात परिवर्तन घडविणार : ना. खोत

Published On: Jan 08 2018 1:13AM | Last Updated: Jan 08 2018 12:18AM

बुकमार्क करा
शिरोळ : प्रतिनिधी 

काय बी होऊ दे; पण माझं तेवढं जमू दे, अशी कारखानदारांबरोबर विरोधकांनी घेतलेली भूमिका आता उघड झाली आहे. आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून विधानसभा तुम्ही घ्या; पण खासदारकी मला द्या, ही मखलाशी हाणून पाडण्यासाठी सर्वसामान्य शेतकरी, शेतमजूर, गोरगरीब जनतेला सोबत घेऊन हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे मैदान लढवून ऐतिहासिक परिवर्तन घडविणार आहे, असा इशारा कृषिमंत्री सदाभाऊ खोत यांनी खासदार शेट्टी यांचे नाव न घेता शिरोळ येथे दिला. पुढील वर्षी उस दराची लढाई करावी लागणार नाही, असे सांगून त्यांनी विरोधकांची खिल्ली उडविली.

शिरोळ येथील शिवाजी चौकात रयत क्रांती संघटनेचा शेतकरी- शेतमजूर संवाद मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी रयत क्रांती पश्‍चिम महाराष्ट्र शेतमजूर संघटनेचे अध्यक्ष सुरेश सासणे होते.

मंत्री खोत म्हणाले, माझ्यावर टीका केल्याशिवाय विरोधकांची चळवळ चालत नाही व त्यांची ओळख होत नाही. मी अजूनही विरोधकांबद्दल काहीच बोलत नाही, तरीदेखील त्यांना गुदगुल्या होत आहेत. मी संघटनेतून बाहेर पडलो नाही. संघटनेने मला बाहेर काढले. सत्तेत धोरण बदलायला गेलो; मात्र ऊस दर व कर्जमाफीच्या मुद्द्यावर जनतेत गैरसमज पसरविण्याचा उद्योग विरोधकांनी केला.

शिरोळ रयत क्रांती संघटनेचे कार्यालय हे लोकसेवेचे मंदिर असेल. याच कार्यालयातून तालुक्याचा विकास आणि सामान्यांच्या प्रश्‍नांची सोडवणूक केली जाईल. शिरोळ नगरपालिका स्थापण्याबाबत मुख्यमंत्री यांच्यासोबत शिरोळ शिष्टमंडळाची येत्या आठ दिवसांत बैठक घेऊ, असे त्यांनी नमूद केले.

व्यासपीठावरून साखर कारखानदारांना शिव्या घालायच्या अन् रात्री फोनवर गप्पा मारायच्या, मी या घटनेचा साक्षीदार आहे. आज अचानक बारामतीकर आणि विरोधक एकमेकांचे गुणगाण गात आहेत. आता घड्याळाचे काटे नेमके उलटे कसे फिरत आहेत हेच आश्‍चर्य आहे, असे बोलून मी कुणाच्या वशिल्याने किंवा शिफारशीने मंत्री झालो नाही, असा खोचक टोलाही मंत्री खोत यांनी लगावला.

यावेळी रयत क्रांती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सुरेश पाटील, सागर खोत, संपर्कप्रमुख संतोष कांदेकर, प्रशांत ढोरे-पाटील, शहाजी गावडे, मानाजीराव भोसले, सुरेश सासणे यांची भाषणे झाली. कुरूंदवाडचे माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे, श्रीकांत घाटगे, प्रभाकर पाटील, विनायक कलढोणे, अनिल परब, संदीप भातमारे, अमित काळे उपस्थित होते. आभार शोभा पानदारे यांनी मानले.