होमपेज › Kolhapur › ‘दादा, ज्यासाठी खडसेंच्या मागे लागलात ते तुमच्या हाती’

‘दादा, नागणवाडीच्या फायलीवर सही करा’

Published On: Feb 02 2018 1:32AM | Last Updated: Feb 02 2018 1:32AMहमीदवाडा : प्रतिनिधी

दादा... तुम्ही नशीबवान आहात, चांगली खाती तुमच्याकडे आहेत, चिकोत्राचा पाणीप्रश्‍न संपण्यासाठी ज्या फाईलवर सही करा म्हणून तुम्ही एकनाथ खडसे यांच्या मागे लागला होता, ती फाईल आता तुमच्याच टेबलवर पडून आहे. त्या फाईलवर तेवढी सही करा, म्हणजे नागनवाडी प्रकल्पाचा प्रश्‍न मिटेल... अशी सादच आमदार हसन मुश्रीफ यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना घातली. व हे मी टीका म्हणून बोलत नाही. तर मनापासून बोलतोय, असे सांगायलाही आ. मुश्रीफ विसरले नाहीत. खडकेवाडा (ता. कागल) ग्रामपंचायतीच्या जलपूजन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ‘हमीदवाडा’चे अध्यक्ष प्रा. संजय मंडलिक होते.

चिकोत्राच्या काठावर असणार्‍या या गावाने 10 हजार फुटांवरील वेदगंगेवरून पाणी योजना करून गावचा पाणीप्रश्‍न निकाली काढला आहे. या पाण्याचे पूजन मुश्रीफ व मंडलिक यांच्या हस्ते झाले. प्रा. मंडलिक म्हणाले, जरी तालुक्यातील आम्हा मंडळींची राजकीय भूमिका वेगळी असली तरी नागणवाडी प्रकल्प किंवा चिकोत्राचा जलस्रोत बळकट करणे यासाठी आम्ही एकमेकांच्या सोबत काम करू. 

यावेळी जलपूजनासह गावतळे तसेच स्मशानशेड रस्ता यासाठी श्रमदान करणार्‍या तरुणांचा तसेच पाणी योजनेसाठी सहकार्य करणार्‍या शेतकर्‍यांचाही सत्कार व ग्रामपंचायतीच्या वेबसाईटचे उद्घाटन करण्यात आले. कमल पाटील, शिवानी भोसले, बंडोपंत चौगुले, दिनकर पाटील, मारुती काळुगडे, जयसिंग गिरीबुवा, प्रवीणसिंह भोसले, विश्‍वासराव कुराडे, प्रतापसिंह घोरपडे उपस्थित होते. स्वागत सरपंच नंदिनीदेवी घोरपडे यांनी तर प्रास्ताविक नंदकुमार घोरपडे यांनी केले. आभार ग्रामविकास अधिकारी एन. के. कुंभार यांनी मानले. 

नाही म्हणत नाहीत व देतही नाहीत

चंद्रकांत पाटील यांच्याकडे उपमुख्यमंत्रिपदाचा दर्जा व खाती आहेत. पण ते त्याचा उपयोग करत नाहीत. मी या ठिकाणी असतो तर जिल्ह्यात काचेचे रस्ते केले असते. दादांकडे कोणी काही मागितले तर ते कधीच नाही म्हणत नाहीत, मात्र प्रत्यक्षात ते कोणाला काहीच देतही नाहीत, अशी कोपरखळी मारत आ. मुश्रीफ म्हणाले, संजय मंडलिक जरी शिवसेनेत असले तरी शिवसेना भाजपवर जोरदार टीका करते, त्यामुळे काही अडचण नाही.