Fri, Apr 26, 2019 03:54होमपेज › Kolhapur › ईर्ष्येेने निधी आणूया : मुश्रीफ

ईर्ष्येेने निधी आणूया : मुश्रीफ

Published On: Apr 18 2018 1:41AM | Last Updated: Apr 18 2018 12:39AMकोल्हापूर : प्रतिनिधी

राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची सत्ता होती, त्यावेळी मी राज्याचा 10 नंबरचा मंत्री होतो, आ. सतेज पाटील हे 20 नंबरचे मंत्री होते. जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे राज्याचे 2 नंबरचे मंत्री आहेत. तेव्हा त्यांनी व आम्ही मिळून ईर्ष्या करून कोल्हापूरच्या विकासकामासाठी निधी आणूया; पण राक्षस जागा झालाय, मुंगीलाही राग येतो, अशी वक्‍तव्ये ज्यांच्याकडे भविष्याचा मुख्यमंत्री पाहिले जाते, अशा ना. चंद्रकांत पाटील यांनी करू नयेत, असा उपरोधात्मक सल्‍ला आ. हसन मुश्रीफ यांनी ना. पाटील यांनी दिला आहे.

जिल्हा बँकेत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना आ. मुश्रीफ म्हणाले, भावी मुख्यमंत्री म्हणून आम्ही चंद्रकांत पाटील यांच्याकडे पाहात असून त्यांनी सहिष्णूतावादी राहण्याची गरज आहे.

जिल्ह्यातील एक मोठा नेता म्हणून आम्हाला पाटील यांची काळजी वाटते, असे सांगून आ. मुश्रीफ म्हणाले, तावडे हॉटेल परिसरातील महापालिकेच्या जागेबाबत उच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे. ती जागा ताब्यात घ्यावयाची आहे; पण या जागेबाबत चंद्रकांतदादा का रागावले हे कळत नाही. त्यांच्या रागावण्याची महिन्याभरातील ही तिसरी घटना आहे. पहिली घटना विधीमंडळात घडली होती. आ. कपिल पाटील यांनी भीमा-कोरेगावप्रकरणी प्रश्‍न विचारला होता, त्यावेळी भीमा-कोरेगाव दंगलीमागे आरएसएसचा संबंध आहे, असे आ. कपिल पाटील बोलले होते, त्यावेळी दादांना खूप राग आला, त्यावेळी विधीमंडळात दादांनी दिलेले उत्तर आणि वापरलेली भाषा सर्वांना ज्ञात आहे. दुसरी घटना एका संघटनेने बैठक घेतली होती, त्या बैठकीला एक इतिहासकार उपस्थित होते, त्या इतिहासकारांना ना. पाटील यांनी रात्री 11 वाजता फोन करून राग काढला. त्यानंतर तिसरी घटना गेल्या आठवड्यात पत्रकार परिषद घेऊन माझ्यातील राक्षस जागा झालाय, मुंगीलाही राग असतो, अशी वक्‍तव्ये केली, ही भाषा भावी मुख्यमंत्र्यांना शोभत नाही. राजकारणात आरोप होत असतात, यातून दादांनी सहिष्णूता वादीपणे राहण्याची गरज आहे. 

आ. मुश्रीफ म्हणाले, एका व्यंगचित्रकाराने त्यावेळी देशाचे लोकप्रिय पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे चित्र रेखाटले होत, ते टीकात्मक होते, तरीपण नेहरू त्या व्यंगचित्रकारावर भडकले नाहीत, उलट आपल्यातील चुकीच्या कारभारावर जरूर टीका करा, असे सांगून पंडित जवाहरलाल नेहरूंनी त्या व्यंगचित्रकाराचा सन्मान केला. तसे ना. पाटील यांनी सहिष्णूतावादी राहण्याची गरज आहे.

आ. मुश्रीफ म्हणाले, दादांनी व्हिक्टर पॅलेस घेतले, शालिनी पॅलेस घेतले अशी लोक चर्चा करत असतात, दादांनी अशाप्रकारे संपत्तीचे प्रदर्शन करू नये, असे आम्हाला वाटते, जेवढे प्रदर्शन जास्त तेवढी लोकांमध्ये चर्चा अधिक होत असते. तेव्हा दादांनी प्रदर्शनच जास्त होता कामा नये, याची काळजी घ्यावी.

दादांनी आपल्या तब्येतीकडे लक्ष द्यावे, ब्लडप्रेशर वाढवून घेऊ नये, राजकारणात कोणीही कोणाचा व्यक्‍तिगत शत्रू नसतो. सगळीच माणसे पैशाने विकत घेता येत नाहीत, याचाही त्यांनी गांभीर्याने विचार करावा, असेही ते म्हणाले. आपणच आपले प्रदर्शन केले नाही तर लोक टीका करण्याचा प्रश्‍नच येत नाही, हे त्यांनी लक्षात घ्यावे, असे आ. मुश्रीफ म्हणाले. 

नव्या विमानसेवेला शुभेच्छा, दोन्ही खासदारांचे अभिनंदन : आ. मुश्रीफ

विमानसेवा सुरू केल्याबद्दल या सेवेला शुभेच्छा व्यक्‍त करून खा. धनंजय महाडिक आणि खा. संभाजीराजे या दोन्ही खासदारांचे आ. हसन मुश्रीफ यांनी अभिनंदन केले. तसेच यापूर्वी याच कंपनीने कोल्हापूर-मुंबई अशी विमानसेवा सुरू केली होती. त्यावेळी 72 सीट विमान होते, आता 18 सीटचे विमान आहे. आता दुसर्‍यांदा विमानसेवा सुरू झाली आहे. या विमानसेवेला कायमपणे प्रवासी मिळावेत, अशी सदिच्छाही आ. मुश्रीफ यांनी व्यक्‍त केली.

 

Tags : kolhapur, kolhapur news, Hasan Mushrif, Funds