Sat, Jul 20, 2019 10:36होमपेज › Kolhapur › वेळ पडल्यास लोकसभा रिंगणात : हसन मुश्रीफ

वेळ पडल्यास लोकसभा रिंगणात : हसन मुश्रीफ

Published On: Feb 09 2018 2:00AM | Last Updated: Feb 09 2018 1:16AMगडहिंग्लज : प्रवीण आजगेकर

वेळ पडल्यास मी स्वतः लोकसभेच्या रिंगणात उतरू शकतो. तुम्ही आजपासूनच कामाला लागा, असे आवाहन आ. हसन मुश्रीफ यांनी गुरुवारी गडहिंग्लज येथे कार्यकर्त्यांच्या बैठकीत केले.
ज्यांना आपण जीवाचे रान, हाडाची काडं करून खासदार केले, त्यांनी गेल्या चार वर्षांत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसाठी काय केले? नेटाने लढणार्‍या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या विरोधातच त्यांनी काम केले असून दिल्लीत गेले की पवारसाहेब, मुंबईत आले की फडणवीससाहेब व कोल्हापुरात असले की दादा... दादा... अशी खेळी करणार्‍यांना आता घरी बसवावे लागणार आहे. प्रा. संजय मंडलिक यांनी आमच्यातून उमेदवारी घेतली तर चांगलेच आहे. अन्यथा मग मीच लोकसभेच्या आखाड्यात उतरेन, असे मुश्रीफ म्हणाले. 

पक्ष कार्यालयात गुरुवारी दुपारी प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीला पत्रकारांनाही टाळले होते. बैठकीच्या सुरुवातीला गडहिंग्लज शहरातील कार्यकर्त्यांनी आपल्या विविध अडचणी मांडल्या. एकमेकांबद्दल तक्रारींचा पाढाही वाचला. आ. मुश्रीफांनी सगळ्यांचे म्हणणे ऐकले आणि त्यानंतर कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन करीत आता आपल्यातील वाद मिटवा आणि पक्षासाठी कामाला लागा, असे आवाहन केले.

खासदारकीच्या विषयावर अत्यंत मार्मिकपणे बोलताना ते म्हणाले, खासदारकीच्या निवडणुकीवेळी आपण ‘त्यां’च्यासाठी प्रचंड कष्ट घेतले. मात्र, त्यानंतर आलेल्या महापालिकेच्या निवडणुकीत त्यांनी त्यांच्या सोयीसाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या विरोधातच काम केले. त्यानंतर आलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत हीच परिस्थिती राहिली. जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी निवडीवेळी तर त्यांनी विरोधकांच्या वाहनाचे सारथ्य केले. या सगळ्याने राष्ट्रवादीचेच नुकसान झाले असून आता कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. प्रा. मंडलिकांसाठी आपण नेटाने काम करू. मात्र, त्यांचे मागे-पुढे झाल्यास राष्ट्रवादीकडून मी स्वतः लोकसभेसाठी उमेदवार म्हणून येईन. माझी अजून दहा वर्षे आमदारकीची इच्छा असूनही परिस्थिती आली तर मात्र लोकसभेला मी आहेच, असेही कार्यकर्त्यांना त्यांनी दणकून सांगून लोकसभेच्या प्रचाराचे जणू रणशिंगच फुंकले.