Tue, Apr 23, 2019 22:42होमपेज › Kolhapur › अनाहूतपणे झालेल्या ‘त्या’विधानामुळे व्यथित : मुश्रीफ

अनाहूतपणे झालेल्या ‘त्या’विधानामुळे व्यथित : मुश्रीफ

Published On: Apr 29 2018 2:08AM | Last Updated: Apr 29 2018 12:28AMकोल्हापूर : प्रतिनिधी

जिल्हाधिकारी कार्यालयात शासकीय बैठकीच्यावेळी आ. संध्यादेवी कुपेकर यांच्याबद्दल आपल्याकडून झालेल्या त्या विधानाबद्दल आपण व्यथित झालो असून आपण आ. कुपेकर यांची जाहीर दिलगिरी व्यक्त करतो, असा खुलासा आ. हसन मुश्रीफ यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून व्यक्त केला आहे. तसेच अनाहूतपणे झालेल्या त्या विधानामुळे मीही व्यथित झालो, असेही या पत्रकात म्हटले आहे. 

शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील पाणीटंचाई आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठक संपल्यानंतर पालकमंत्र्यांनी अधिकार्‍यांना बोलावून घेऊन अपुर्‍या राहिलेल्या प्रकल्पाच्या भूमी संपादनाबाबत व्यासपीठावरच बैठक घेतली. आपण कागल मतदार संघातील नागणवाडी व आंबेओहळ या प्रकल्पाच्या भूमी संपादनाबाबतची सद्य:स्थिती व त्यासाठी शासनाने द्यावयाचे पॅकेज याबद्दल चर्चा केली.

त्यानंतर आपण बैठकीतून जाण्यास उठलो, त्याचवेळी आ. संध्यादेवी कुपेकर माझ्या जागेवर जाऊन बसण्याच्या तयारीत होत्या, याचवेळी पालकमंत्री पाटील यांनी आपल्याला उद्देशून आ. कुपेकरवहिनी भाजपमध्ये येणार आहेत, अशा प्रकारची टिप्पणी केली. त्यावेळी आपण उत्स्फूर्तपणे व अनावधानाने ते बोललो. त्यानंतर काही वेळातच आ. कुपेकरवहिनींचा आपल्याला फोन आला, त्या अस्वस्थ झालेल्या जाणवले. त्यानंतर याच अनुशंगाने शनिवारी वृत्त प्रसिद्ध झाले. त्या वक्तव्याने आपण स्वत: व्यथित झालो असून माझ्या वक्तव्यामुळे आ. कुपेकरवहिनी यांच्या भावना दुखावल्या असतील तर मनापासून मी त्यांची दिलगिरी व्यक्त करतो, असेही आ. मुश्रीफ यांनी या पत्रकात म्हटले आहे.