Sun, Oct 20, 2019 01:14होमपेज › Kolhapur › ‘पुढारी’वर वर्धापनदिनी शुभेच्छांचा वर्षाव

‘पुढारी’वर वर्धापनदिनी शुभेच्छांचा वर्षाव

Published On: Jan 02 2018 1:32AM | Last Updated: Jan 02 2018 1:32AM

बुकमार्क करा
कोल्हापूर : प्रतिनिधी

नि:पक्ष आणि निर्भीड पत्रकारितेचा वसा आणि वारसा जपणार्‍या दैनिक ‘पुढारी’चा 79 वा वर्धापन दिन अलोट जनसागराच्या साक्षीने आणि अपूर्व उत्साहात सोमवारी साजरा झाला. वाचकांशी पिढ्यान्पिढ्याशी असलेले अतूट नाते दृढ करत आपुलकी आणि कौटुंबिक वातावरणात रंगलेल्या शानदार सोहळ्यात विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी ‘पुढारी’वर शुभेच्छांचा वर्षाव केला. ऐतिहासिक टाऊन हॉल उद्यानाच्या हिरवळीवर रंगलेल्या या सोहळ्याला प्रचंड उपस्थिती दर्शवत वाचकांनी ‘पुढारी’ म्हणजे कोल्हापूर आणि कोल्हापूर म्हणजेच ‘पुढारी’ याची प्रचिती दिली. दै.‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव व व्यवस्थापकीय संपादक डॉ. योगेश जाधव यांनी शुभेच्छांचा स्वीकार केला.

इतिहासाचा भागीदार आणि इतिहासाचा साक्षीदार असलेल्या ‘पुढारी’ने गेली 79 वर्षे वाचकांशी नाते जपले आहे. मातीशी नाते असलेल्या ‘पुढारी’ने समाजहिताचे व्रत घेऊन, पत्रकारितेत नवा मानदंड निर्माण करत जनमानसांत अढळ स्थान निर्माण केले आहे. वाचकांच्या मनावर अधिराज्य गाजवणार्‍या, वाचकांशी आपुलकीची नाळ जोडलेल्या दै.‘पुढारी’चा वर्धापन दिन सोमवारी अपूर्व उत्साहात आणि थाटात साजरा झाला.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील, महापौर सौ. स्वाती यवलुजे, खा. धनंजय महाडिक, म्हाडा आणि शाहू सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे, आ. सतेज पाटील, आ. राजेश क्षीरसागर, आ. चंद्रदीप नरके, आ. प्रकाश आबिटकर, आ. डॉ. सुजित मिणचेकर, माजी खासदार कलाप्पाण्णा आवाडे, माजी खासदार जयवंतराव आवळे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, माजी आमदार महादेवराव महाडिक, माजी आमदार पी. एन. पाटील, माजी राज्यमंत्री भरमू सुबराव पाटील, डॉ. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील, उपमहापौर सुनील पाटील, माजी खासदार श्रीमती निवेदिता माने, माजी आमदार दिनकरराव जाधव, माजी आमदार सुरेश साळोखे, शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख आणि सदाशिवराव मंडलिक सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रा. संजय मंडलिक, हुतात्मा कारखान्याचे अध्यक्ष वैभव नायकवडी, जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे (गोकुळ) अध्यक्ष विश्‍वास नारायण पाटील, महापालिकेचे आयुक्‍त डॉ. अभिजित चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी  अधिकारी डॉ. कुणाल खेमनार, सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेचे आयुक्‍त रवींद्र खेबूडकर, प्रभारी जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर, जिल्हा पोलिस प्रमुख संजय मोहिते,

वनसंरक्षक अरविंद पाटील, उप वनसंरक्षक प्रभूनाथ शुक्‍ला, सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिक्षक अभियंता एस. एस. साळुंखे, शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, उपजिल्हाधिकारी सचिन इथापे, उपजिल्हाधिकारी समीर शिंगटे, बीएसएनएलचे महाप्रबंधक एस. के. चौधरी, सी.आय.डी.चे अप्पर अधीक्षक नरेंद्र गायकवाड, पोलिस उपअधीक्षक आर. आर. पाटील, पोलिस उपअधीक्षक (गृह) सतीश माने, पोलिस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर, एसीबीचे उपअधीक्षक गिरीष गोडे, उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. अजय साळी, राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एस. एल. पाटील, सहायक निबंधक (दुग्ध) अरुण चौगुले, हुपरीच्या नगराध्यक्षा जयश्री गाट, शिवाजी विद्यापाठीचे कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले, विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक डॉ. आर. व्ही. गुरव, डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू पी. बी. बेहरे, शिक्षण उपसंचालक एम. के. गोंधळी, श्री विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्रा. अभयकुमार साळुंखे, प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंगचे अध्यक्ष डी. बी. पाटील यांच्यासह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रंगीबेरंगी फुलांनी सजवलेले व्यासपीठ, प्रवेशद्वारावर उभारण्यात आलेली आकर्षक कमान, मुख्य प्रवेशद्वार ते व्यासपीठापर्यंत रेडकार्पेट, तुतारीचा निनाद आणि ‘पुढारी’ परिवाराकडून केलेले जाणारे मन:पूर्वक स्वागत यामुळे कार्यक्रमाचा न्याराच थाट होता. सप्तरंगात उजळून निघणारी मुख्य इमारत, झाडा-वेलींसह संपूर्ण परिसरात केलेल्या आकर्षक विद्युत रोषणाईने ऐतिहासिक टाऊन बागेचे सौंदर्य आणखी खुलले होते. यासह भाऊसिंगजी रोडही रोषणाईने उजळून गेला होता.

सोमवारी सायंकाळी मुख्य सोहळ्याला प्रारंभ झाला. विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या गर्दीने काही वेळातच टाऊन हॉल बाग अक्षरश: फुलून गेली. सर्वसामान्य वाचक, लोकप्रतिनिधी, प्रशासकीय तसेच पोलिस अधिकार्‍यांपासून ते उद्योजक, व्यापारी, व्यावसायिक, खेळाडू आदींची गर्दी झाली होती. राजकीय, सामाजिक, उद्योग-व्यापार, व्यवसाय, शिक्षण, सांस्कृतिक, कला, क्रीडा आदी प्रत्येक क्षेत्रातील प्रतिबिंब बागेत स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने उमटले होते. व्यासपीठावर डॉ. प्रतापसिंह जाधव, डॉ. योगेश जाधव शुभेच्छांचा स्वीकार करत होते.

आपल्या लाडक्या ‘पुढारी’ला शुभेच्छा देण्यासाठी आबालवृद्धांची रीघ लागली होती. प्रत्येक जण डॉ. प्रतापसिंह जाधव, डॉ. योगेश जाधव यांना भेटून शुभेच्छा देत वर्धापन दिनाच्या सोहळ्याचा आनंद आणखी द्विगुणित करत होते. डॉ. प्रतापसिंह जाधव, डॉ. योगेश जाधव यांच्याशी संवाद साधत प्रत्येक जण ‘पुढारी’शी असलेले आपुलकीच्या नात्याची वीण आणखी घट्ट करत होता. दै.‘पुढारी’च्या सामाजिक योगदानांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला जात होता. आपल्या जडणघडणीत ‘पुढारी’चे असलेले योगदानही अनेक जण आवर्जून सांगत, कोल्हापूरच्या मातीत रूजलेल्या, ‘पुढारी’वरील प्रेमाची प्रचिती देत होते.

सायंकाळी साडेसहानंतर टाऊन हॉल उद्यानात केवळ आणि केवळ गर्दीच, असे चित्र होते. आपल्या अवतीभोवती असलेल्यांशी संवाद साधत, एकमेकांना नववर्षाच्या शुभेच्छा देत नागरिक व्यासपीठाकडे जात होते. प्रत्येक प्रश्‍नांवर, समस्येवर रोखठोक आणि आक्रमक भूमिका घेत, केवळ आणि केवळ समाजाचे हित जोपासणार्‍या ‘पुढारी’च्या पुढारीपणाचीच चर्चा केली जात होती. कोल्हापूरच्या विविध प्रश्‍नांवर ‘पुढारी’ची भूमिका आणि डॉ. जाधव यांचे योगदान याविषयीही एकमेकांशी संवाद साधत, सर्वसामान्यांचा खरा पुढारी अशा भावनाही व्यक्‍त केल्या जात होत्या. यानिमित्ताने राजकीय, सामाजिक, उद्योग-व्यापार-व्यवसाय, शिक्षण, कला, क्रीडा, सांस्कृतिक आदी सर्वच क्षेत्रांतील नागरिकांचे जणू स्नेहसंमेलनच भरल्याचे चित्र होते. सायंकाळपासून सुरू झालेल्या शुभेच्छांचा वर्षाव रात्री दहानंतरही सुरूच होता. दरम्यान, अनेकांनी सकाळी दै.‘पुढारी’ कार्यालयात येऊन डॉ. प्रतापसिंह जाधव, डॉ. योगेश जाधव यांना शुभेच्छा दिल्या.

कौटुंबिक सोहळा

‘पुढारी’ आणि कोल्हापूर असे अनोखे नाते आहे. वाचकांशी असलेले नाते स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने अधिक दृढ होतानाच ‘पुढारी’चा वर्धापन दिन म्हणजे सर्वांसाठी कौटुंबिक सोहळाच ठरला. एकमेकांशी हितगुज करत, विचारपूस करत, नववर्षाच्या शुभेच्छाही देण्यात येत होत्या. यामुळे नववर्षातील पहिलीच सायंकाळ, ‘पुढारी’ वर्धापन दिनाच्या सोहळ्याने अनेकांसाठी संस्मरणीय ठरली.

बालकल्याण संकुलला भरीव मदत

वर्धापन दिनासाठी येणार्‍यांनी हार-पुष्पगुच्छ आणू नये, त्याची रक्‍कम बालकल्याण संकुलला मदत म्हणून द्यावी, असे आवाहन ‘पुढारी’ परिवाराकडून करण्यात आले होते. ‘पुढारी’समाजहितासाठी नेहमीच अग्रेसर राहिला आहे, त्याची प्रचिती यानिमित्तानेही आली. ‘पुढारी’च्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेकांनी उत्स्फूर्तपणे बालकल्याण संकुलासाठी मदत केली.

केक कापून वर्धापनदिन साजरा

दै. ‘पुढारी’च्या 79 व्या वर्धापनदिनानिमित्त माधुरी बेकरीचे सूर्यकांत वडगावकर यांनी ‘पुढारी’चा लोगो असणारा केक आणला होता. प्रसिद्ध उद्योगपती संजय घोडावत यांच्या हस्ते हा केक कापण्यात आला. यामुळे वर्धापनदिनाच्या कार्यक्रमाचा गोडवा अधिक वाढल्याची भावना मान्यवरांनी व्यक्‍त केली. यावेळी विविध क्षेत्रांतील मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

दूरध्वनीवरून मान्यवरांच्या शुभेच्छा!

दै. ‘पुढारी’च्या वर्धापनदिनानिमित्त विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी दूरध्वनीद्वारेही ‘पुढारी’ला शुभेच्छा दिल्या. केंद्र व राज्य मंत्रिमंडळातील सदस्य, आमदार, खासदार आदींसह वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, राज्यपातळीवरील विविध संस्था, संघटनांचे अध्यक्ष आदींनी डॉ. जाधव यांना दूरध्वनीद्वारे, तसेच पत्रांद्वारे शुभेच्छा दिल्या. अनेक ठिकाणी ‘पुढारी’ला शुभेच्छा देणारे फलक लावण्यात आले होते. सोशल मीडियावर तर नववर्ष आणि ‘पुढारी’ वर्धापनदिन अशा एकत्रित शुभेच्छांचा वर्षाव सुरू होता.  ‘पुढारी’चे अतुलनीय योगदान असणारे प्रश्‍न, त्यावर ‘पुढारी’ने मांडलेली भूमिका आदींचीही कात्रणे सोशल मीडियावरून दिवसभर झळकत होती.

तरुणाईचा उदंड सहभाग

79 वर्षे पूर्ण करत 80 व्या वर्षात पदार्पण करणार्‍या दै. ‘पुढारी’ने समाजातील सर्वच स्तरांशी, सर्वांशीच आपले नाते जोडल्याची प्रचिती सोमवारी आली.  दै. ‘पुढारी’च्या वर्धापनदिन सोहळ्याला झालेल्या गर्दीत तरुणाईची संख्या लक्षणीय होती. विविध क्षेत्रांतील युवक-युवतींसह महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा उदंड सहभाग होता. या स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने दै. ‘पुढारी’ने नव्या पिढीशी जोडलेले नाते आणखी दृढ झाले.