Sat, Jul 20, 2019 10:35होमपेज › Kolhapur › कळंबा कारागृहात ‘फाशी’ यार्ड

कळंबा कारागृहात ‘फाशी’ यार्ड

Published On: Jun 21 2018 1:36AM | Last Updated: Jun 21 2018 1:26AMकोल्हापूर : दिलीप भिसे

पुण्यातील येरवडा, नागपुरातील कारागृहानंतर राज्यात तिसर्‍या ‘फाशी’ यार्डची उभारणी कोल्हापूर येथील मध्यवर्ती कळंबा कारागृहात होत आहे. चार कोटी खर्चाच्या प्रशासकीय आराखड्याला गृहखात्याने मान्यता दिली आहे. अत्याधुनिक, सोयीनियुक्‍त यार्डची वर्षभरात उभारणी होणार आहे. मृत्युदंडाची शिक्षा झालेल्या तीन कैद्यांना एकाचवेळी फासावर लटकावून देहदंड देण्याचा आराखड्यात अंतर्भाव आहे. दीड एकरात पूर्णत: बंदिस्त ‘फाशी’ यार्डची रचना करण्यात येत आहे.

गंभीर गुन्ह्यात मृत्युदंड झालेल्या कैद्यांना येरवडा, नागपुरातील मध्यवर्ती अशा दोन कारागृहात फाशी देण्याची यंत्रणा कार्यरत आहे. फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या राज्यातील ऐंशीवर कैद्यांचे दोन्हीही कारागृहात वास्तव्य आहे. जागेची उपलब्धता, कैद्यांच्या हालचाली, त्यावरील नियंत्रण, सुरक्षितता आदी बाबी लक्षात घेऊन तिसर्‍या ‘फाशी’ यार्डच्या उभारणीसाठी शासनस्तरावर निर्णय घेण्यात आला आहे.
सव्वाशे एकर प्रशस्त क्षेत्र, वाढीव मनुष्यबळ लक्षात घेऊन गृहखात्याने ‘फाशी’ यार्डसाठी कळंबा आणि नाशिक येथील 

कारागृहाला पसंतीक्रम दिला. गृहमंत्रालयाने दि. 9 जून 2016 मध्ये कळंबा कारागृह प्रशासनाला फाशी यार्डच्या तत्काळ प्रस्तावाचे निर्देश दिले. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत स्वतंत्र आराखड्यासह नकाशा सादर करण्यात आला. कारागृह अप्पर पोलिस महासंचालकांनी आराखड्यासह नकाशांना प्रशासकीय मंजुरी दिली आहे. खर्चासह अंदाजपत्रक सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

वधस्तंभासह स्वतंत्र शवविच्छेदन कक्षही...

कळंबा कारागृहाच्या उत्तरेला शेती क्षेत्रालगत दीड एकरात पूर्णत: बंदिस्त व स्वतंत्रपणे फाशी यार्डची उभारणी होणार आहे. आराखड्यात प्रामुख्याने वधस्तंभाची रचना करण्यात आली आहे. न्यायविभाग, वैद्यकीय यंत्रणांसह सक्षम अधिकार्‍यासाठी स्वतंत्र कक्ष उभारण्यात येणार आहेत. शवविच्छेदन कक्ष, रुग्णालय, नियंत्रण कक्ष, फाशी देणार्‍यासाठी स्वतंत्र कक्ष, अंतर्गत रस्ते, प्रतीक्षा कक्षांचा प्रामुख्याने समावेश असणार आहे.

बारा फूट उंचीची संरक्षक भिंत

कळंबा कारागृहातील ‘फाशी’ यार्डचा आराखडा तयार करण्यापूर्वी सार्वजनिक बांधकाम खात्यासह कारागृह प्रशासनांतर्गत वरिष्ठाधिकार्‍यांनी पुणे, नागपूर येथील ‘फाशी’ यार्डची प्रत्यक्ष पाहणी केली होती. सुरक्षिततेसाठी ‘फाशी’ यार्डभोवती बारा फूट उंचीच्या संरक्षक भिंतीचाही अंतर्भाव करण्यात आला आहे.

कैद्यांच्या निवासाची स्वतंत्र व्यवस्था

मृत्युदंडाची शिक्षा झालेल्या कैद्यांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने अन्य बंदीवानांच्या वास्तव्य असलेल्या बरॅकमध्ये निवासाची व्यवस्था न करता स्वतंत्र छोट्या-छोट्या खोल्यांची उभारणी करण्यात येणार आहे, असेही सांगण्यात आले. विशेष अनुदानातून दोन ते तीन टप्प्यात फाशी यार्डसाठी निधी उपलब्ध होणार आहे.