कोल्हापूर : प्रतिनिधी
भीमा कोरेगाव दंगलीनंतर कोल्हापुरात 3 जानेवारीला उद्भवलेल्या परिस्थितीने सामाजिक वातावरण ढवळून निघाले. सिद्धार्थनगर परिसरात दोन गटांतील हेवेदावे उफाळून आले. तरुणांमधील वादाची दुफळी दिसून आल्याने अनेकांनी याबद्दल चिंता व्यक्त केली होती; पण शुक्रवारी रात्री शिवाजी पुलावरून टेम्पो ट्रॅव्हलर कोसळल्याचे समजताच जुना बुधवार पेठ, उत्तरेश्वर पेठेसह आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी धाव घेतली.
काही दिवसांपूर्वी एकमेकांवर दगड उगारण्यासाठी उठलेले हात शुक्रवारी एकमेकांना साथ देत होते. सुमारे शंभरहून अधिक कार्यकर्ते नदीपात्रात उतरून मदत करत होते. जखमींना तत्काळ दवाखान्यात पोहोचविण्यासाठी आपापल्या परीने प्रत्येकाने प्रयत्न केले. जात-पात, गट-तट विसरून सर्वांनी खांद्याला खांदा लावून काम केले.
कोल्हापूरच्या या एकजुटीबाबत खुद्द पोलिस अधिकार्यांनीही कौतुकोद्गार काढले. महिन्याभरापासून पोलिस शहरात घडलेल्या दगडफेक, तोडफोडीतील सहभागींचा शोध घेत आहेत. असे असताना अपघातावेळी मदत करण्यासाठी सर्व हेवेदावे बाजूला सारून कोल्हापूरकर म्हणून सारे एकवटले. जुना बुधवार पेठ, सिद्धार्थनगर, शनिवार पेठ, उत्तरेश्वर पेठ, शुक्रवार पेठ, ब्रह्मपुरी परिसरात अनेक जाती-धर्माचे नागरिक गुण्यागोविंदाने राहण्यास आहेत. शुक्रवारीही माणुसकीची एकजूट दिसून आली.