Sun, Jul 21, 2019 01:32होमपेज › Kolhapur › ऊसतोड मजुरांची नवी पिढी शोधतेय करिअरच्या वाटा

ऊसतोड मजुरांची नवी पिढी शोधतेय करिअरच्या वाटा

Published On: Feb 28 2018 1:16AM | Last Updated: Feb 27 2018 11:09PMहमीदवाडा : मधुकर भोसले

विनोद ढाकणे या तरुणाने आपल्या आई-वडिलांचे आयुष्यभर चाललेले कष्ट पाहिले व त्याने अभियांत्रिकीची पदवी घेतली व पुण्यात नोकरी स्वीकारली, बाळासाहेब वणवे हा तरुण 2 वर्षे आपल्या आई-वडिलांसोबत ऊस तोडण्यास आला व त्याने ठरवले आता कोयता हाती घ्यायचा नाही. त्याने उपलब्ध पाण्यावर भाजीपाला शेती सुरू केली व त्यात तो रमला, दिगंबर ढाकणे यांच्या 3 मुलांपैकी एकटा सध्या ऊस तोडतो आहे; पण अन्य दोन पैकी एक आयटीआय करून पुण्यात कंपनीमध्ये नोकरी करतो आहे. तर दुसरा एस.टी.मध्ये ड्रायव्हर आहे.

या प्रातिनिधिक चित्रातून ऊसतोड मजुरांची नवी पिढीही कोयत्याची साथसोबत सोडून करिअरच्या नव्या वाटा शोधत असल्याचेच स्पष्ट होते. त्यामुळे भविष्यात ऊसतोड मजुरांचे प्रमाण घटते राहणार आहे. त्यामुळे नवं तंत्रज्ञाची जोड दिल्याशिवाय ऊस तोडणी व ऊस उपलब्धता सोपी असणार नाही. साखर कारखानदारीत शेतकरी परंपरेप्रमाणे शेती कसतो आहे. दिवसेंदिवस आधुनिक शेतीची कास धरत एकरी उत्पादन वाढत आहे. परिणामी राज्यात ऊस उत्पादन वाढते आहे. त्याचवेळी हा ऊस करखान्यापर्यंत जाण्यासाठी ऊसतोड मजूर हा देखील तितकाच महत्त्वाचा घटक आहे.

 जिल्ह्याच्याच नव्हे तर राज्यातील साखर कारखानदारीच्या ऊसतोडीची मदार ही बीड जिल्ह्यानेच पेलली आहे. त्यांच्या 2 - 3 पिढ्या या ऊस तोडीमध्ये सक्रिय राहिल्या आहेत; पण आता या मजुरांची नवी पिढी मात्र कोयता हातात धरण्याच्या मानसिकतेत नसल्याचे दिसते. पण गेल्या 2 ते 3 पिढ्यांचे हे कष्ट पाहताना ऐकताना नवी पिढी मात्र शिक्षण, रोजगार, नोकरी, व्यावसायिक शिक्षण अशा वाटा निवडत आहे.

आपल्या वाट्याला जे अपार कष्ट आले ते मुलांच्या नशिबी येऊ नयेत म्हणून हे मजूर पालक देखील मुलांना शिक्षणाची वाट दाखवत आहेत. त्यामुळे हळूहळू ही नवी पिढी ऊस तोडणीपासून दुरावते आहे. ही प्रक्रिया एकदोन वर्षांची नाही तर एखाद्या दशकभराची आहे. त्यामुळे याची नोंद साखर उद्योगाने घेणे आवश्यक आहे. मजूर टोळ्यांकडून फसवणुकीचे प्रमाणही वाढते आहे. त्यामुळे यंदा कमालीची मजूर टंचाई आहे म्हणूनच यांत्रिकीकरण अपरिहार्य झाले  आहे.