Sat, Apr 20, 2019 08:44होमपेज › Kolhapur › हलसवडे, सांगवडे कालवा कधी पूर्ण होणार? 

हलसवडे, सांगवडे कालवा कधी पूर्ण होणार? 

Published On: Jan 16 2018 2:10AM | Last Updated: Jan 15 2018 10:40PM

बुकमार्क करा
वसगडे : वार्ताहर

कागल   पंचतारांकित एमआयडीसी येथून हलसवडे, सांगवडेवाडी, सांगवडे व गडमुडशिंगीपर्यंत खोदलेल्या कालव्याचे काम कधी पूर्ण होणार, असा संतप्त सवाल सांगवडे येथील शेतकर्‍यांनी केला आहे. या कालव्याचे काम त्वरित पूर्ण करावे, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा शेतकर्‍यांच्या वतीने सांगवडे येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शाखाध्यक्ष संजय पाटील व माजी सरपंच भारती कटके यांनी दिला आहे. 

हुपरी पंचतारांकित वसाहत याबरोबरच हलसवडे, सांगवडेवाडी, सांगवडे, गडमुडशिंगी येथील शेतकर्‍यांना पाणी मिळण्यासाठी काळम्मावाडीहून थेट कालव्याद्वारे पाण्याचे नियोजन होते. त्यासाठी पंचतारांकित वसाहतीपासून हलसवडे ते गडमुडशिंगी परिसरातील शेतकर्‍यांच्या शेतातून खुदाई केली आहे; पण ती अजूनही पूर्ण नाही. या कालव्याचे काम निढोरी, इस्पुर्ली, दिंडनेर्ली पुढे काही गावांपर्यंत खुदाईचे काम झाले.  पण 2005 पासून जे काम बंद झाले ते अजूनही सुरू झाले नाही. नेते मंडळींनी याकडे दुर्लक्ष केले. आमदार व पाटबंधारे विभागाने दुर्लक्ष केल्याने हे गेली बारा वर्षे काम अपूर्ण आहे. 
कागल पंचतारांकितकडून पूर्वेकडे हुपरीसाठी व कालव्याच्या उत्तरेकडील हलसवडे, सांगवडे व गडमुडशिंगीपर्यंत असणार्‍या शेतकर्‍यांसाठी या पाण्याचा लाभ होणार आहे. या कालव्याचा मार्ग चुकीचा असल्याने बर्‍याच शेतकर्‍यांनी विरोध केला. तरीही जमीन संपादित करून काम सुरू केले; पण या मार्गात जमीन गेलेल्या एकाही शेतकर्‍याला नुकसान भरपाई मिळाली नाही. सांगवडेवाडीतील अनेक अल्पभूधारक शेतकर्‍यांची जमीन या कालव्यात जाते. त्यांनाही एक पैचीही मदत मिळाली नाही. त्यामुळे काही शेतकर्‍यांनी याला विरोध केला. 

सध्या हलसवडे ते गडमुडशिंगीपर्यंत खुदाई केली आहे; पण रस्ता पुलाची कामे अजूनही सुरू झाली नाहीत. त्यामुळे खोदलेल्या कालव्यांची मोठी अडचण शेतकरी वर्गाला जाणवू लागली आहे. सांगवडेवाडीतील शेतकर्‍यांच्या जमिनी कालवा खुदाईमुळे दोन भागात विभागल्या आहेत. रस्ता नसल्यामुळे ऊस वाहतूक करणे व इतर शेतीची कामे करणे अवघड झाले आहे. कालवा खुदाई करताना शंभर ते दोनशे फुटांपर्यंत ब्लाल्टिंग केल्यामुळे येथील विहिरी उन्हाळ्यात कोरड्या पडत आहेत. त्यामुळे या कालव्याचे काम कधी पूर्ण होणार, याकडे शेतकर्‍यांचे लक्ष लागून राहिले 
आहे.