Wed, Apr 24, 2019 11:40होमपेज › Kolhapur › हालोंडीच्या बोगस डॉक्टरला अटक

हालोंडीच्या बोगस डॉक्टरला अटक

Published On: Jun 08 2018 1:22AM | Last Updated: Jun 08 2018 1:02AMकोल्हापूर : प्रतिनिधी

मुलगाच होण्यासाठी औषध देतो असे सांगून लोकांची फसवणूक करणार्‍या हालोंडी (ता. हातकणंगले) येथील बोगस डॉक्टर भरत जिनगोंडा पाटील (वय 45) याला गुरुवारी  शिरोली पोलिस व जिल्हा परिषदेतील बोगस डॉक्टर शोधमोहिम पथकाने रंगेहाथ पकडले. त्याच्यावर शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 

बोगस डॉक्टरांनी तत्काळ आपले दवाखाने बंद करावेत, अन्यथा गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकार डॉ. कुणाल खेमनार यांनी दिला आहे. 

भरत पाटील अनेक वर्षांपासून हालोंडी येथे मुलगाच होईल म्हणून औषध देत असल्याची जाहिरात अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या गीता हासूरकर यांच्या वाचनात आली. त्यांनी खात्री करून याची माहिती जि.प. आरोग्य विभाग, पोलिस प्रशासनास दिली.  डॉ.  खेमनार यांनी  बोगस डॉक्टर शोधमोहीम पथकास सूचना दिल्या. पथक व पोलिसांनी भरत पाटील याला पकडले. त्याच्याकडील सर्व औषधे जप्‍त करण्यात आली. कोणतेही वैद्यकीय शिक्षण नसताना तो उपचार करत  असल्याचे आढळून आले. 

या कारवाईत प्रभारी जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. उषादेवी कुंभार, जिल्हा माता बालसंगोपन अधिकारी डॉ. एफ. ए. देसाई, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुहास कोरे, जिल्हा आयुष अधिकारी डॉ. डी. एस. सोनवणे, वैद्यकीय अधिकारी डॉ. जेसिका अँड्रूज आदी सहभागी झाले होते.  कारवाईवेळी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सुजाता म्हेत्रे, गीता हासूरकर, रमेश वडणगेकर, स्नेहल माने, कृष्णात स्वामी, सीमा पाटील आदी उपस्थित होते. पुढील तपास पोलिस निरीक्षक परशुराम कांबळे, पोलिस नाईक संगीता जगताप करत आहेत.