होमपेज › Kolhapur › आजपासून बारावीची परीक्षा १ लाख २९ हजार विद्यार्थी

आजपासून बारावीची परीक्षा १ लाख २९ हजार विद्यार्थी

Published On: Feb 21 2018 1:12AM | Last Updated: Feb 21 2018 1:08AMकोल्हापूर : प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (बारावी) बुधवार (दि. 21) पासून सुरू होत आहे. पहिला पेपर सकाळी अकरा ते दोन या वेळेत इंग्रजी विषयाचा आहे. यंदा कोल्हापूर विभागातून  जवळपास 1 लाख 29 हजार 939 परीक्षार्थी आहेत. कोल्हापूर विभागातील 154 केंद्रांवर परीक्षा होणार आहे. बारावी परीक्षेसाठी सोशल मीडियावरून परीक्षार्थींना बेस्ट लकचे संदेश दिले जात असून, ‘मित्रांनो, आत्मविश्‍वासाने आणि बिनधास्त पेपर द्या,’ असेही सुचवले जात आहे.

करिअरला वळण देणारे वर्ष म्हणून बारावीच्या परीक्षेकडे पाहिले जाते. कला, वाणिज्य आणि शास्त्र शाखेच्या अभ्यासक्रमासाठी परीक्षा होत आहे. शिक्षण मंडळाच्या वतीने परीक्षेची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. परीक्षा काळात कॉपीमुक्‍त अभियान राबवले जात आहे. यासाठी परीक्षा केंद्रांवर स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच प्रत्येक केंद्रावर पोलिस बंदोबस्त असणार आहे. भरारी पथके आणि दक्षता पथकांची नजर परीक्षा केंद्रांवर राहणार आहे.

बुधवारी पहिला पेपर असल्याने साहजिकच सर्वच परीक्षा केंद्रांवर विद्यार्थी व पालक यांची गर्दी होणार आहे. बैठक क्रमांक शोधण्यात अनेकांचा वेळ जातो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर किमान अर्धा तास अगोदर उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.