Thu, Apr 25, 2019 17:31होमपेज › Kolhapur › बारावी परीक्षेचा निकाल लांबणार?

बारावी परीक्षेचा निकाल लांबणार?

Published On: Feb 26 2018 1:15AM | Last Updated: Feb 25 2018 9:43PMकोल्हापूर : प्रवीण मस्के

कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक व कायम विनाअनुदानित शिक्षकांनी बारावी परीक्षा पेपर तपासणीवर बहिष्कार टाकल्याने लाखो उत्तरपत्रिका तपासणीविना पडून आहेत. यामुळे यंदा बारावी परीक्षेचा निकाल लांबण्याची शक्यता असून, याचा विद्यार्थ्यांना फटका बसणार आहे.

कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांची गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित न्याय्य मागण्यांसाठी अनेक आंदोलने सुरू आहेत. कायम विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालयीन मूल्यांकन प्राप्‍त शाळांच्या याद्या जाहीर झालेल्या नसून, वेतन अनुदान मिळालेले नाही. 2 मे 2012 नंतर नियुक्‍त शिक्षकांच्या मान्यतेचा प्रश्‍न प्रलंबित आहे. 2008 ते 2011 दरम्यानच्या वाढीव पदांमध्ये मंजूर शिक्षकांच्या वेतनाचा प्रश्‍न तसाच आहे. मागण्या मान्य होऊनही अंमलबजावणी होत नसल्याने बहिष्काराचा मार्ग कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी स्वीकारला असून, राज्यातील 72 हजार शिक्षक आंदोलनात सहभागी झाले आहेत.
विनाअनुदानित शिक्षकांचाही गेल्या 17 वर्षांपासून शासनाबरोबर संघर्ष सुरू आहे. विनाअनुदानित शिक्षक तुटपुंज्या वेतनावर काम करीत आहेत. 20 टक्के अनुदान घेणार्‍या 1,628 शाळा व 2,425 वर्ग तुकड्यांना प्रचलित नियमानुसार अनुदान मिळालेले नाही. अघोषित शाळांची घोषणा अद्याप झालेली नाही. शासनाच्या दुर्लक्षित कारभाराला कंटाळून राज्यातील 15 विनाअनुदानित शिक्षकांनी पेपर तपासणीवर बहिष्कार घातला आहे. 

बारावीची परीक्षा सुरू झाली आहे. राज्यस्तरावरील मुख्य नियामक व नियामकांच्या बैठका अद्याप झालेल्या नाहीत. इंग्रजी, मराठी, हिंदी व सहकार विषयाच्या सुमारे लाखो उत्तरपत्रिका प्राचार्यांच्या कस्टडीत पडून आहेत. जोपर्यंत बहिष्कार आंदोलन मिटत नाही, तोपर्यंत पेपर न तपासण्याच्या निर्णयावर अनुदानित, विनाअनुदानित शिक्षक ठाम आहेत.

कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या मागण्यांसंदर्भात लेखी आश्‍वसनांची पूर्तता करून शासनाने लेखी आदेश काढावेत. मागण्या मान्य होईपर्यंत बहिष्कार कायम राहणार आहे. पेपर तपासणी वेळेत न झाल्यास बारावी परीक्षेचा निकाल लांबणीवर पडेल.

- प्रा. अविनाश तळेकर, राज्याध्यक्ष, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघ
 
सरकारने अनुदानित शिक्षकांची थट्टा उडविली आहे. आश्‍वासनांचे गाजर दाखविण्याचे काम सुरूच आहे. मागण्यांच्या पूर्ततेसाठी विनाअनुदानित शिक्षक पेपर तपासणी बहिष्काराबरोबर सोमवार (दि. 26) पासून आझाद मैदानावर धरणे आंदोलनास बसणार आहेत. 
- खंडेराव जगदाळे, राज्य उपाध्यक्ष, कायम विनाअनुदानित कृती समिती