Mon, Mar 25, 2019 13:14होमपेज › Kolhapur › जिल्ह्यात गुटखा बंदीचा उडालाय फज्जा!

जिल्ह्यात गुटखा बंदीचा उडालाय फज्जा!

Published On: Aug 02 2018 1:58AM | Last Updated: Aug 02 2018 12:12AMइचलकरंजी : प्रतिनिधी

राज्यात सर्वत्र लागू करण्यात आलेल्या गुटखाबंदीचा फज्जा उडल्याचे चित्र सर्वत्र पहावयास मिळत आहे. इचलकरंजीत पोलिसांनी केलेल्या सलग कारवाईत लाखो रुपयांचा गुटखा जप्‍त केला. यामुळे जिल्ह्यात गुटखाबंदीचा फज्जा उडाल्याच्या चर्चेवर शिक्‍कामोर्तब झाले आहे. परिणामी कागल, कोगनोळी, आप्पाचीवाडी, हुपरीसह आता वस्त्रनगरीतही या व्यवसायाने आपले जाळे पसरले आहे. त्यामुळे  गुटखा रॅकेटचा पर्दाफाश पोलिस करणार काय, असा प्रश्‍न उपस्थित होत असून नवे पोलिसप्रमुख डॉ. अभिनव देशमुख यांच्या कारवाईकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. 

तंबाखूजन्य पदार्थांमुळे कॅन्सरसारख्या दुर्धर रोगांचा झपाट्याने प्रसार होत असल्याने आणि अशा आजारांना तरुण पिढी बळी पडत चालल्याने राज्य सरकारने राज्यात सर्वत्र गुटखाबंदी लागू केली. याचा परिणाम म्हणून राज्यातील गुटखा उत्पादकांच्या कारखान्यांना टाळे लागले. परंतु, उत्पादकांनी आपले कारखाने शेजारच्या राज्यात हलवून तेथून गुटख्याची विक्री सुरूच ठेवली आहे. राज्यात गुटखा बंदी असल्याने शौकिनांची तलफ भागवण्यासाठी  गुटखा उत्पादन करण्याचा नवा फंडा वस्त्रनगरीतील एका तंबाखूजन्य पदार्थांच्या उत्पादकाने अवलंबला. 

गुटख्याच्या उत्पादनातून या उद्योजकाने कोट्यवधी रुपयांची माया जमवली. या उद्योजकाच्या कारखान्यावर अनेकवेळा धाडी टाकण्यात आल्या; परंतु त्याचा उद्योग काही थांबला नाही. त्याची सांपत्तीक प्रगती अनेकांच्या डोळ्यात भरू लागली. त्यामुळे गुटखा उत्पादनातून कोट्यवधींची माया जमवता येते, असा संदेश गुन्हेगारी वर्तुळात पोहोचला. त्यामुळे गुन्हेगारी वर्तुळात दबदबा असलेल्या काही बड्या धेंडांनी गुटखा उत्पादनाकडे मोर्चा वळवला आहे. यातून बड्या धेंडांनी लाखो रुपयांची माया जमवण्यास सुरुवात केली आहे. 
एकामागून एक बडी धेंडे या उद्योगात पाय रोवत असल्याने बाजारात त्यांच्या उत्पादनांमध्ये मोठी स्पर्धा सुरू आहे.

आपल्याच ब्रँडचा गुटखा खपावा, यासाठी दहा रुपयांमध्ये काहींनी चार तर काहींनी पाच पुड्या विक्रीचा फंडा अवलंबला आहे. महाराष्ट्रात गुटखा निर्मितीवर वॉच असल्याने काहींनी नामी शक्‍कल लढवत पोलिसांना गुंगारा दिला आहे. काहींनी शेजारच्या राज्यातील गावांमध्ये त्याचे उत्पादन सुरू ठेवले आहे. काही घरांमध्ये मिक्सर (गुटखा बनवण्याचे एक यंत्र) दिले असून तेथे फक्‍त गुटखा तयार करण्याचे काम केले जाते. नंतर हा माल पॅकिंगसाठी अन्य ठिकाणी पाठवला जातो. पॅकिंगचे ठिकाण वारंवार बदलले जाते. त्यामुळे गुटखा निर्मिती कोठे सुरू आहे, याचा शोध लावणे पोलिसांपुढे आव्हान बनले आहे. 

वस्त्रनगरीतील ज्या बड्या धेंडांनी गुटखा निर्मितीत पाय रोवले आहेत, त्यांची नावे जोरदार चर्चेत आहेत. त्यामुळे गुटखा उत्पादनातील बडी धेंडे कोण, याचा शोध पोलिसांना लागला नसेल असे म्हणणे धाडसाचे ठरणार आहे. गुटखा उत्पादनातील बडे धेंडे कोण, याची इत्यंभूत माहिती पोलिस दल व अन्‍न-औषध प्रशासनाला आहे. परंतु, त्यांच्याकडे फक्‍त कारवाईचे धाडस नसल्याने  गुटखा निर्मिती सुरूच असून हा बनावट गुटखा अनेकांचे आयुष्य पोखरत आहे. त्यामुळे अशा बड्या धेंडांचा शोध घेऊन त्यांच्यावर ‘मोक्‍का’सारखी कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे. 

घातक रसायनांचा होतोय वापर ...

बनावट गुटख्यामध्ये शरीराला पोखरणार्‍या घातक रसायनांचा सर्रास वापर करण्यात येत असल्याची चर्चा आहे. याशिवाय नारळाच्या बाह्य आवरणाचा कूट, सडकी सुपारी, नशिले पदार्थ आदींचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे गुटखा बंदीतून काय साधले, असा प्रश्‍न सर्वसामान्यांना पडला आहे. विक्रेत्यांनाही गुटखा विक्रीतून मोठी कमाई होत आहे. त्यामुळे गुटखा विक्रीसह गुटखा निर्मितीच्या रॅकेटचाही पर्दाफाश करण्याची गरज निर्माण झाली आहे. 

पोलिसप्रमुखांच्या कारवाईकडे लक्ष

जिल्ह्यात गुटख्याचे साम्राज्य दिवसेंदिवस वाढत असल्याचे उघड उघउ बोलले जात आहे. शिवाय तोकडी कारवाई होत असल्याने सामान्यांतून याबाबत पोलिसांवरच आरोप केले जातात. त्यामुळे पोलिसच गुन्ह्याचे धनी ठरत आहेत. त्यामुळे जिल्हा पोलिसप्रमुखपदी नवीन रूजू झालेल्या डॉ. अभिनव देशमुख यांच्या कारवाईकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. मराठा आरक्षण क्षमल्यानंतर यावर कारवाई होईल, असेही पोलिस दलातून बोलले जात आहे.